Share Market विमा कंपन्यांचे शेअर्समधील तेजी कशामुळे?
विमा शेअर्समध्ये ३ ते ५ टक्के वाढ
X
आरोग्य आणि जीवनविमा पॉलिसीवरील १८ टक्के जीएसटी रद्द करण्याचा प्रस्ताव अर्थमंत्र्यांच्या गटाने (GoM) केंद्र सरकारकडे मांडला आहे. या निर्णयामुळे नागरिकांवरील आर्थिक भार कमी होईल, तर विमा क्षेत्राला चालना मिळेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
सध्या आरोग्य व जीवनविमा पॉलिसीच्या प्रीमियमवर १८ टक्के वस्तू व सेवा कर (GST) आकारला जातो. हा कर माफ झाल्यास विमा पॉलिसी अधिक परवडणाऱ्या होतील आणि जास्तीत जास्त लोक विमा संरक्षणाखाली येऊ शकतील.
या घडामोडीनंतर आज शेअर बाजारात विमा कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात वधारले. एचडीएफसी लाइफ, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ, एसबीआय लाइफ आणि स्टार हेल्थ यांसारख्या प्रमुख विमा कंपन्यांच्या शेअर्समध्ये ३ ते ५ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
उद्योग तज्ज्ञांच्या मते, विमा क्षेत्राचा प्रसार वाढवण्यासाठी हा प्रस्ताव महत्त्वाचा ठरेल. सध्या भारतात जीवन व आरोग्य विमा घेणाऱ्यांची संख्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत अत्यल्प आहे. प्रीमियमवरील जीएसटी माफीमुळे सामान्य कुटुंबासाठी विमा स्वस्त होईल आणि दीर्घकालीन दृष्टीकोनातून विमा क्षेत्राचा विकास वेगाने होऊ शकतो.
सरकारकडून या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास तो आगामी जीएसटी परिषदेच्या बैठकीत सादर केला जाईल. अंतिम निर्णय परिषदेच्या मंजुरीवर अवलंबून असेल.
“आरोग्य आणि जीवनविमा हा प्रत्येकासाठी आवश्यक आहे. जर त्यावरील कराचा भार कमी झाला, तर विमा क्षेत्र अधिक लोकाभिमुख ठरेल,” असे तज्ज्ञांचे मत आहे.