विम्या करारातील ‘ग्रेस पिरियड’ काय आहे?
हप्ता भरण्यास उशिर झाल्यास किती दिवसात हप्ता भरल्यास पॉलिसी सुरू राहते
X
विमा प्रीमियम वेळेवर भरण्यात उशीर झाल्यास पॉलिसीधारकाचे नुकसान होऊ नये यासाठी विमा कंपन्या ‘ग्रेस पिरियड’ ही सोय उपलब्ध करून देतात. या कालावधीत प्रीमियम भरल्यास पॉलिसी लागू राहते आणि विमा संरक्षणावर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे पॉलिसीधारकांना दिलासा मिळतो.
विमा क्षेत्रातील तज्ञांच्या मते, बहुतांश जीवन विमा पॉलिसींमध्ये १५ ते ३० दिवसांचा ग्रेस पिरियड देण्यात येतो. तर आरोग्य विमा योजनांमध्ये साधारणतः १५ दिवसांचा कालावधी मिळतो. या दरम्यान ग्राहकांनी प्रीमियम भरल्यास त्यांच्या कडून उशीर झाला तरी पॉलिसी रद्द होत नाही.
ग्रेस पिरियडचा एक मोठा फायदा म्हणजे या काळात जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला, तर त्याचा कुटुंबीयांना विम्याचा लाभ मिळतो. मात्र, न भरलेला प्रीमियम रकमेतील कपात करूनच दाव्याची (क्लेम) रक्कम दिली जाते. उदाहरणार्थ, एखाद्या पॉलिसीधारकाचा प्रीमियम १०,००० रुपये बाकी असेल आणि मृत्यू दावा १० लाख रुपयांचा असेल, तर न भरलेला प्रीमियम वजा करून उर्वरित रक्कम कुटुंबीयांना मिळते.
जर ठरलेल्या ग्रेस पिरियडमध्ये प्रीमियम भरला गेला नाही, तर पॉलिसी लॅप्स होते. अशावेळी विमा संरक्षण तात्पुरते बंद होते आणि पुन्हा सुरू करण्यासाठी कंपनीच्या अटींनुसार पॉलिसीचे पुनरुज्जीवन (Revival) करावे लागते. यासाठी अतिरिक्त शुल्क आणि वैद्यकीय तपासणीसुद्धा करावी लागू शकते.
विमा कंपन्या प्रीमियम भरण्याच्या अंतिम तारखेची आणि ग्रेस पिरियडची माहिती ग्राहकांना एसएमएस किंवा ई-मेलद्वारे कळवतात. तरीदेखील पॉलिसीधारकांनी वेळेत प्रीमियम भरण्यावर भर दिला पाहिजे, कारण ग्रेस पिरियड ही केवळ दिलेली मुभा आहे, कायमस्वरूपी सुविधा नाही.
विमा करारातील ‘ग्रेस पिरियड’ ही संकल्पना पॉलिसीधारकांच्या संरक्षणासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे अचानक आर्थिक अडचण किंवा विसर पडल्याने पॉलिसी रद्द होणार नाही, याची खात्री होते. तज्ञांच्या मते, योग्य माहिती व नियोजनामुळे विमा संरक्षण अखंड सुरू ठेवणे प्रत्येकासाठी शक्य आहे.