Home > Top News > इकडेही राष्ट्रवादी-शिवसेना, तिकडेही राष्ट्रवादी-शिवसेना; ‘NDA’ आणि UPA च्या दोन्ही बैठकीत होणार सहभागी

इकडेही राष्ट्रवादी-शिवसेना, तिकडेही राष्ट्रवादी-शिवसेना; ‘NDA’ आणि UPA च्या दोन्ही बैठकीत होणार सहभागी

पाटणा येथील बैठकीनंतर विरोधी आघाडीची बंगळूरमध्ये बैठकीचे आयोजन केले आहे. त्यापार्श्वभूमीवर भाजपनेही एनडीएची बैठक बोलावली आहे. मात्र या एनडीए आणि युपीए या दोन्ही बैठकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी होणार आहेत.

इकडेही राष्ट्रवादी-शिवसेना, तिकडेही राष्ट्रवादी-शिवसेना; ‘NDA’ आणि UPA च्या दोन्ही बैठकीत होणार सहभागी
X

पंतप्रधान मोदी विरोधी सर्व पक्षांना एकत्रित बांधण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांनी सुरु केला आहे. त्यातच पाटणा येथे झालेल्या बैठकीनंतर पुढील बैठक ही शिमला येथे होणार होती. मात्र शिमला येथे होणारी बैठक रद्द करून बंगळूर येथे आयोजित करण्यात आली. मात्र विरोधी पक्षाने बैठकीचे आयोजन करताच भाजपला अचानक एनडीएची आठवण झाली. त्यामुळे भाजपने एनडीएच्या बैठकीचे आयोजन केले आहे. मात्र दिल्ली आणि बंगळूर या दोन्ही ठिकाणी होणाऱ्या बैठकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होणार आहे.

राज्यात अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. तर शरद पवार यांनी ज्यांच्याविरोधात लढलो, त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस आमचीच असा दावा अजित पवार आणि शरद पवार यांच्या गटाने केला आहे. मात्र या दोन्ही गटाने राष्ट्रवादी काँग्रेस आपलीच असल्याचा दावा केला असला तरी दोन दिवसांपासून अजित पवार यांनी आधी मंत्र्यांसोबत आणि मग आमदारांसोबत शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे शरद पवार यांच्याविषयी संभ्रम निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच शरद पवार यांच्या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी मी आणि अजित पवार एनडीएच्या बैठकीत सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले.

दुसरीकडे जयंत पाटील यांनी अजित पवार गटाने शरद पवार यांच्या घेतलेल्या भेटीनंतर स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी शरद पवार हे संयुक्त पुरोगामी आघाडीच्या बंगळूर येथे होणाऱ्या बैठकीला जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार यांच्या गटाच्या वतीने स्वतः शरद पवार आणि सुप्रिया सुळे बंगळूर येथील बैठकीत सहभागी होणार आहेत. मात्र अजित पवार गट भाजपसोबत एनडीएमध्ये गेल्याने अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे दिल्लीत होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला हजर होणार आहेत.

शिवसेना दोन्हीकडे

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आपणच शिवसेना असल्याचा दावा केला. तर उद्धव ठाकरे यांचा गटही आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा करत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे बंगळूर येथे होणाऱ्या विरोधी आघाडीच्या बैठकीला गेले आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला जाणार आहेत. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एनडीए आणि युपीए या दोन्ही बैठकांना हजर असणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात ही अजब परिस्थिती पहिल्यांदाच दिसत आहे.


Updated : 18 July 2023 2:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top