Home > Top News > ‘पशु सौंदर्याची परंपरा 'बंद्रीझिरा' बैल पोळा विशेष...

‘पशु सौंदर्याची परंपरा 'बंद्रीझिरा' बैल पोळा विशेष...

‘Tradition of animal beauty’ ‘Bandrizira’ Bail Pola special...

‘पशु सौंदर्याची परंपरा बंद्रीझिरा बैल पोळा विशेष...
X

Bull Bueaty Parlour विविध सौंदर्य प्रसाधनांचा उपयोग करून स्वतःचे शरीर, चेहरा सजविण्याची कला मानवाला अगदी उत्क्रांतीच्या काळापासूनच लाभली आहे. ही कला मानवी जीवनात केवळ सजून-धजून राहण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर जागतिकीकरणाच्या प्रवाहात ‘ब्युटी पार्लर’ या वैश्विक नावाने ही कला जगातील खेड्या-पाड्यात अक्षरशः मुरली आहे. ‘ब्युटी पार्लर’ हा तर अलीकडे दैनंदिन जीवनातला परवलीचा शब्द झाला आहे, म्हणूनच कोणतेही शहर अथवा खेडे असे नाही जेथे आज महिला व पुरुषांसाठी ब्युटीपार्लर नाही. एखाद्या निमित्ताने मुले-मुली,तरुण-तरुणी,स्री-पुरुषांनी सजणे आणि सजवणे व त्यासाठी जागोजागी ब्युटी पार्लर असणे यात कुठलेही नाविन्य उरलेले नाही किंबहुना आधुनिक नागरी असो वा ग्रामीण जीवनशैलीच्या समाजाची ती गरजच बनली आहे. परंतु ज्याच्या कष्टसाध्य परंपरागत जीवनशैलीने मानवी जीवन-संस्कृती अक्षरशः समृध्द झाले, बहरले, फुलले त्या बैल पाळीव प्राण्याचेही ‘बुल ब्युटी पार्लर’ सातपुड्याच्या डोंगरराजींमध्ये आहे; तेही मानवी उत्क्रांतीच्या इतिहासाप्रमाणे समृद्ध परंपरा लाभलेले आहे, हे ऐकल्यावर मात्र या आगळ्या वेगळ्या ‘बुल ब्युटी पार्लर’ची नवलाई आपली जिज्ञासा शिगेला पोहचवते ना ? होय! भारतातल्या पहिल्या उत्तर हडप्पन मानवी वसाहतींचा, कृषी संस्कृतीचा उदय ज्या नंदुरबार जिल्ह्यातील तापी व नर्मदा नद्यांच्या खोऱ्यांत झाला त्या नंदुरबार जिल्ह्यातील एका गावात हे बुल ब्युटीपार्लर आहे.


देशातल्या गावागावात आणि घराघरात ‘पोळा’ हा सण श्रावणी अमावस्येला बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या नंदूरबार जिल्ह्यातील बंद्रिझिरा गावातल्या घराघरात बैल सजविण्यासाठी लागणाऱ्या लोकरीच्या रंगीबेरंगी गोंड्यांची आणि बैलांच्या साजाची (बैलांच्या सजावटीची साधने, प्रसाधने) निर्मिती केली जाते. पोळ्याच्या पार्श्वभूमीवर बंद्रिझिरातल्या रस्तोरस्ती विविधरंगी गोंड्यांचे दर्शनाने गावाचे सौंदर्य अक्षरशः खुललेले असते. पोळ्याच्या दोन दिवस आधी बैलांच्या खांद्यांना तेल, तूप लावून मळले जाते, शिंगांना, खुरांना शस्राने टोकदार केले जाते. बैलांकडून दोन दिवस कुठलेही काम करवून घेतले जात नाही त्यांच्या अंगाखांद्यावर ‘दुष्यर’ (जू) ठेवले जात नाही,या विधीला ‘खांदेपूजा’असे म्हणतात. बैलांच्या शेपटीला असलेल्या केसांना विविध गोंड्याचा आकार देऊन त्या पद्धतीने कापले जाते.


सातपुडा पर्वतराजीत वसलेल्या नंदुरबार शहरालगत मिरचीच्या पथारीचे दृश्य जसे डोळ्यांना सुखावते तेवढेच किंबहुना त्याहून अधिक नेत्रसुखाचा आनंद शहरापासून अवघ्या दहा किलोमीटरवर असलेल्या बंद्रिझिरा या गावाला भेट दिल्यावर मिळू शकतो. मिरची ही तर नंदुरबारची खास वैश्विक ओळख. परंतु बंद्रिझिरा गावाची ओळख याहूनही अधिकच वेगळी. बैल आणि पशु सजविण्यासाठी लागणाऱ्या लोकरीच्या रंगीबेरंगी गोंड्यांची आणि पूरक साहित्य-साजाची निर्मिती या ठिकाणी घराघरात केली जाते. अनेक पिढ्यांपासून अव्याहतपणे चालत आलेल्या या परंपारिक व्यवसायाला किती वर्षांची परंपरा आहे याबाबत अधिकृत कुठेही नोंद नाही. गावातील बुजुर्गांकडून दोन-तीन पिढ्यांपासूनचे संदर्भ मिळतात तेही अत्यंत त्रोटक. परंतु तापी म्हणजे खान्देशाची गंगा, तापी खोऱ्यात महाराष्ट्रातील पहिल्या शेतकरी वसाहतीचा शोध उत्खननीय पुराव्यावरुन लागला. त्यात बैलाचे अवशेषही आढळून आले आहेत. खान्देशवासीयांच्या दृष्टीने महत्वपूर्ण बाब म्हणजे प्रकाशा, सावळदा (नंदुरबार) येथे उत्तर हरप्पन काळात मानवी संस्कृती विकसीत झाले ती सावळदा-प्रकाशा म्हणूनच (इ.स. २२०० ते १८००) उदयास आले. खान्देशात एका स्वतंत्र संस्कृतीच्या त्या काळात उदय झाला असा ऐतिहासिक वारसा अतिप्राचीन काळापासून धुळे व नंदुरबारला लाभला आहे. उत्तर हरप्पन संस्कृती ४ ते ५ हजार वर्षापूर्वी येथेच विकसीत झाली. त्याचे पुरातनीय अवशेष या बंद्रीझिरापासून अवघ्या ५० किलोमीटर अंतरावर कवठे (साक्री) येथील उत्खननात मिळाले. साक्री येथील अश्मयुगीन हत्यार आजही मुंबईच्या वस्तुसंग्राहलयात प्रथम दर्शनी भागात काचेच्या शोकेसमध्ये ठेवले आहे. त्यामुळे बंद्रीझिराच्या या परंपरेचा त्या संस्कृतीशी काही संबंध आहे का याचाही शोध घेण्याचे मोठे आव्हान संशोधकांपुढे आहे. आपल्या व्यावसायिक परंपरेचा इतिहास,भुगोल, वर्तमान, भविष्य काहीही असो मात्र बंद्रीझिरा गावाच्या कुटुंबातील सदस्य पोळा सणाची चाहूल लागली की आपल्या कारागीरीत गढून जातात. या गोंड्यांनी आणि साजाने जिल्ह्याची, राज्याची सीमा कधीच पार केली असून महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश व राजस्थान राज्यांतील अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांची ख्याती पसरलेली आहे. मध्यप्रदेशातील शेती औजारांसाठी देशभर प्रसिद्ध असलेली खेतिया येथील बाजारपेठ बंद्रीझिरा च्या पशु सजावटीच्या वस्तूंनी सजलेली असते.


बंद्रिझिरा गावामध्ये बंजारा समाजाची लोकसंख्या अधिक आहे. या समाजातील लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंतच्या सर्वाना लोकरीचे सुंदर गोंडे तयार करण्याचे कौशल्य आत्मसात आहे. परंपरागतपणे गोंडे, साज तयार करण्याच्या व्यवसायामुळे ‘गोंडेवाला बंद्रिझिरा’ अशी गावाची ओळख बनली आहे. आजी-आजोबा, आई-वडील यांना रंगीबेरंगी लोकरीचे गोंडे सफाईदारपणे वीणताना पाहून लहान मुलांचे औत्सुक्य कृतीमध्ये रूपांतरित होते. मग चिमुकल्या हातांनाही गोंडे, साज तयार करण्याचे प्रशिक्षण घरात मिळू लागते. या गावातील ५० ते ६० कुटुंबांचा हा गेल्या शेकडो वर्षांपासूनचा परंपरागत व्यवसाय. पूर्वी हा व्यवसाय बाराही महिने तेजीत असायचा परंतु अलीकडच्या काळात शेती व्यवसायातील मंदी, आधुनिक शेतीमुळे बैलांची जागा यंत्र-औजारांनी घेतल्याने या गोंडे आणि साज बनवायच्या व्यवसायाला थोडी उतरती कळा आली असली तरी या गोंड्यांची-साजाची विक्री केवळ नंदुरबार जिल्ह्यात नव्हे तर राज्याबाहेरही प्रमाणावर होते. गोंड्यांसाठी लागणारी रंगीत लोकर कारागीर सुरतमधील व्यापाऱ्यांकडून खरेदी करतात. त्यापैकी काही जण या व्यापाऱ्यांकडून मजुरी ठरवून त्यांना गोंडे-साज बनवून देतात. गोंडे अतिशय आकर्षक बनविले जात असले तरी सध्या लोकरीच्या वाढलेल्या किमतीचा फटका कारागिरांना अस्वस्थ करतो आहे.


साधारणत: आषाढात या कामाला सुरुवात केली जाते. काही वेळा व्यापाऱ्यांच्या मागणीप्रमाणे गोंडे-साज बनवून देताना दमछाकही होते. पण आता शेतकऱ्यांच्या एकंदर आर्थिक अडचणींचा विचार करता पूर्वीसारखी गोंड्यांना मागणी नसल्याचे व्यापारी सांगतात. एका पिढीने दुसऱ्या पिढीला आपले आकर्षक गोंडे बनविण्याचे शिक्षण देण्याचे कार्य अव्याहतपणे सुरू आहे. त्यासाठी एखादे कुशल व सुलभ असे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिल्यास इतरही शोभेच्या वस्तूंची निर्मिती कारागिरांचे कुटुंबीय लिलया करू शकतील.


शेतात ज्या बैलजोडीकडून आपल्या उदरनिर्वाहाची कामे करवून घेतली जातात, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलांना पोळ्याच्या दिवशी सकाळपासून रानात मनसोक्त चरायला सोडतात. त्यांना नदीत, तलावात अथवा गावकुंडात अंघोळ घालतात. त्यांना घरी आणल्यावर सजवले जाते. बैलांच्या शिंगांना रंग लावतात. ऑईल पेंटचे रंग सर्वदूर सर्रास वापरले जात असले तरी पारंपरिक रंग म्हणून ‘गेरू’ अथवा ‘ढाव’चा वापर काही ठिकाणी केला जातो. जुन्या ‘नाथां’ना काढून नवीन ‘नाथ’ बैलांच्या नाकात ओवली जाते. गोंडे, आरसे, पायात तोडे, गळ्यांत घागरमाळा, चंग, गेठा, घोगर, घण्टी, पितळाची साकळी, शिंगाला फुगे, कणकेचे शेंगाळे, फुले, पायाला केसारी, तोडे, पाठींवर लोकरेपासूनबनवलेली मखमली झुल, माथोटी, दोर लावले जातात. बैलांच्या डोळ्यांत सुरमा भरला जातो. रूईच्या फुलांच्या माळादेखील घातल्या जातात. सजवलेल्या बैलांना घरांसमोर आणले जाते. घरोघरी शेतीच्या साधनांची, अवजारांची पूजा केली जाते.खाटेवर दुसर ठेवून विविध कडधान्ये, डाळींच्या मूठ मूठ राशी ठेवल्या जातात. धान्यांच्या सात प्रकारच्या राशींना ‘शिधा’ म्हणतात. बैल ज्या धान्याला सर्वप्रथम तोंड लावेल ते पीक चांगले येईल असा समज आहे. घर मालकीण बैलांचे औक्षण करते. बैलाला पुरणपोळीचा नैवेद्य खायला घालते. पायांवर पाणी टाकते. रानफळांचा वापर करून बनवलेली माळ शिंगांत अडकावली जाते. दृष्ट लागू नये म्हणून केसारीमध्ये ‘भिलावा’ अडकावून पायांत अथवा शिंगांत गुंफले जाते. प्रत्येक बैलाला घंटी असलेला पट्टा, फुलाचा हार, शिंगांना चमकदार लाल रंग आणि माथ्यावर सुंदर आकर्षक रंगाचा गोंडा असा साज चढविला जातो.


गावातला मानाचा बैल वेशीपर्यंत वाजत-गाजत परतल्यावर गावातले इतर बैल वेशीपर्यंत जातात. त्यालाच ‘पोळा फुटणे’ असे म्हणतात. पोळा फुटल्यावर घरमालक पुरणपोळीचे जेवण करून उपवास सोडतो. नंतर ज्या आप्तेष्ट मित्रांनी बैलाला जेवणाचे आमंत्रण दिलेले असते, अशांकडे घरोघरच्या बैलांना नेले जाते बैलांना औक्षण, नैवेद्य दिल्यावर भेट म्हणून ‘श्रीफळ’- नारळ अथवा पैसे दिले जातात. गावातल्या जुन्या भव्य ऐतिहासिक दरवाजाच्या खिडकीतून बैल कुदवला जातो. शेकडो वर्षांपासूनची परंपरा कायम टिकून आहे. पोळ्याच्या दिवशी घरोघरी कुंभाराकडून आणलेल्या मातीच्या बैलांचे पूजन होते. त्यांनाही नैवेद्य दाखवला जातो. इतर जनावरांनाही अंघोळ घालून त्यांचे औक्षण केले जाते. मानाच्या बैलाची गावभर मिरवणूक निघते. त्यालाच ‘बाशिंग्या बैल’ म्हणतात. त्याच्या माथ्यावर शिंगांमध्ये मोठे बाशिंग बांधले जाते. त्याला अंगभर सजवले जाते. संध्याकाळी ‘तोरण तोडण्या’ची स्पर्धा आयोजित केली जाते. गावाबाहेरच्या मैदानात अथवा महादेव मंदिरासमोर नारळांचे तोरण लावले जाते. गावातले तरुण शेतकरी एकेक करून आपापल्या बैलासमवेत धावत जाऊन उडी मारत तोरण तोडण्याचा प्रयत्न करतात. गावागावात, घराघरात आनंद आणणारा ‘पोळा’ सातपुड्यातील प्रत्येक शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा सण आहे.


सध्या हा व्यवसाय ठराविक काळापुरता मर्यादित असल्याने मेहनतीच्या मानाने होणारे अर्थाजन समाधानकारक नसल्याची खंत कारागिरांकडून व्यक्त होते. इतर वेळी ही सारी मंडळी शेतीची कामे करून आपला चरितार्थ चालवितात. शेतीची कामे सांभाळून आपल्या कौशल्याला न्याय देण्यासाठी लोकरीची कमी दरात उपलब्धता अथवा लोकर खरेदीसाठी आर्थिक मदत अनुदान म्हणून द्यावी अशी कारागिरांची अपेक्षा आहे. सकाळी उजाडल्यापासून रात्री उशिरापर्यंत सातत्याने प्रत्येक घरात हे काम सुरू असते. एका वेगळ्याच उर्मीने संपूर्ण कुटुंब गोंडे-साज तयार करण्यासाठी झटत असते. सत्तरीहून अधिक असलेली एखादी वृद्धा रंगीत लोकरीला हातांत घेऊन तिला विशिष्ट पद्धतीने अत्यंत गतीने कापून सुबक आकर्षक गोंड्यात किंवा साजमध्ये रूपांतरीत करते त्या वेळी क्षणभर का होईना पाहणारा मंत्रमुग्ध होऊन जातो.


कृषीप्रधान देशात पोळा या सणाचे शेतकऱ्यांना वेगळेच महत्त्व आहे. ज्या बैलजोडीकडून आपल्या उदरनिर्वाहाची कामे करवून घेतली जातात , त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळ्याच्या दिवशी प्रत्येक बैलाला घंटी असलेला पट्टा, फुलाचा हार, शिंगांना चमकदार लाल रंग आणि माथ्यावर सुंदर आकर्षक रंगाचा गोंडा असा साज चढविला जातो. संस्कृतीचे जतन करण्यासाठी गोंडे व साज निर्मितीच्या या व्यवसायाला परंपरेने पुढे चालविणाऱ्या कारागिरांना आर्थिक बळ देण्याची, या परंपरेच्या इतिहासाची शोध घेण्याची खरी गरज आहे. नंदुरबार हा खान्देशातील अतिशय प्राचिन संस्कृती, परंपरा, इतिहास भुगोल लाभलेला महाराष्ट्राचा मोठा भुभाग आहे. भारताचा इतिहासात आणि नकाशात तो आजही आपले स्थान टिकवून आहे. इतिहासाच्या अनेक प्रवाहातून निघून वादळांचा सामना करत खान्देशाने आपला भुभाग टिकवलाय तेही आपल्या वैशिष्ट्यांसह. या भुभागावर अनेक परिवर्तनाच्या पावुलखुणा ठळकपणे दिसतात. नव्या अश्मयुगापासून या भुप्रदेशाच्या इतिहास सुरु होतो. सावळदा, उत्तर सिंधु, माळवा, जोर्वे अशा संस्कृती पचवत आणि मिरवत हिंदु, जैन, बौद्ध संस्कृतीशी हात मिळवत हा प्रदेश इथपर्यंत पोहोचला आहे. दरम्यानच्या काळात मुस्लीम, सुफी आणि वेगवेगळ्या संस्कृतीचा, धर्माचा पंथाचा येथे खोलवर वावर झाला. ऋषीकदेश, कंददेश, खांडदेश, खांडवदेश, खान्देश, कन्नदेश, अभिरदेश, अशा वेगवेगळ्या नावानं या प्रदेशाचा प्रवास चालू झाला. कोणी याला कान्हाचा देश म्हणून कान्हदेशाचा अपभ्रंश खान्देश म्हणतात. पण या कन्हाच्या गाई बैलांचे परंपरागत सौंदर्य जपणाऱ्या बंद्रिझिरा गावाने मात्र पशुधन सौंदर्य साधन-प्रसाधनाच्या निर्मितीतून राज्याच्या सिमा कधीच ओलांडल्या आहेत, चार राज्यांच्या शेती बाजाराला प्रभावित करणाऱ्या या बंद्रिझिरात शेकडो वर्षांपासून सुक्ष्म हालचालींत ‘कुशल भारत’ घडला आणि घडतो आहे. इथल्या तरुण पिढीने त्याला कृषी पर्यटनाची जोड दिली नाहीतर सातपुड्याच्या आणि तापी खोऱ्याच्या कृषी संस्कृतीची शान असलेले हे बुल ब्युटीपार्लर येणाऱ्या पिढीसाठी दंतकथा बनून राहील.

रणजितसिंह राजपूत

जिल्हा माहिती अधिकारी नंदुरबार

Updated : 22 Aug 2025 4:19 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top