Home > Top News > Sharad Pawar Ajit Pawar relation : काकांचा आदर अजितदादांची पत्नी आणि मुले पुढे ठेवतील का..?

Sharad Pawar Ajit Pawar relation : काकांचा आदर अजितदादांची पत्नी आणि मुले पुढे ठेवतील का..?

कोणत्याही परिस्थितीत दादांचा पहिला आणि अंतिम प्रयत्न एकच काकांचा आदर अबाधित राहावा. “माझा काका लई मोठा” ही भावना आयुष्यभर शब्दांनी नाही तर मनाने कायम ठेवली… काकांशिवाय सत्तेत स्थिरावल्यानंतर, भाजपशी जुळवून घेतल्यानंतरही, काकांचा सन्मान आणि काकांचा पक्ष एकत्र करण्याचे मन आणि नियोजन त्यांनी ठेवले. दुर्दैवाने ते पूर्ण करण्याआधीच काळाने त्यांना गाठले. काकांचा आदर दादांची पत्नी आणि मुले पुढे ठेवतील का..? - रफिक मुल्ला

Sharad Pawar Ajit Pawar relation : काकांचा आदर अजितदादांची पत्नी आणि मुले पुढे ठेवतील का..?
X

Sharad Pawar Ajit Pawar relation अजितदादांचा इरादा नेमका काय होता..? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्याचा...! ज्येष्ठ नेते तथा आपले काका शरद पवार यांचा अपमान होऊ नये, त्यांच्या उंचीचा मान त्यांना शेवटपर्यंत मिळत राहावा, याची काळजी त्यांनी आयुष्यभर घेतली. शरद पवारांपासून वेगळे होऊनही विधानसभेत यश मिळाले; तरी “आता आपण स्वतःच्या हिमतीवर राजकारण करू शकतो” असा अहंकार न बाळगता, काकांविषयीचे प्रेम आणि आदर दादांनी कायम ठेवले. यश मिळूनही अलीकडे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची इच्छा त्यांनी उघडपणे व्यक्त केलीच, तसेच त्यासाठीची प्रक्रिया सुरू ठेवली..

महायुतीत, सरकारमध्ये सामील असतानाही अलिकडच्या निवडणुकांमध्ये भाजपविरोधी प्रचार सुरू केला- त्यातून विचारांची स्पष्टता दिसली आणि कलही…दादांचा कल काकांकडे आहे, शेवटच्या टप्प्यात काकांचा आदर राखण्याकडेच त्यांचे मन झुकले आहे, हे महाराष्ट्राने पाहिले- लोकांना ते मन जाणवले..

अजितदादांच्या आयुष्यात काकांशी मतभेदांचे अनेक प्रसंग आले. हे मतभेद प्रामुख्याने कार्यशैली आणि राज्यातील व्यक्तींविषयीच्या भूमिकांवर होते. उदाहरणार्थ, उदयनराजे भोसले यांना खासदारकीचे तिकीट देऊ नये; पक्षासाठी त्यांचा उपयोग होत नाही, उलट डोकेदुखी वाढते. जुन्या नेत्यांना “सन्मान” म्हणून पदे देण्याची प्रथा बंद व्हावी, जातींचे कार्ड खेळून पक्षाला सतत ब्लॅकमेल करणाऱ्या नेत्यांना दूर केले पाहिजे, सन १९९० पासून अजितदादांसोबत राजकारण सुरू केलेल्या राष्ट्रवादीतील नेत्यांना सत्तेत सामील करताना, त्यांच्या उपयुक्ततेनुसार-मेरिटवर पदे द्यावीत, आणि अलीकडे दबावामुळे काही निर्णय घ्यावे लागत आहेत. त्यामुळे पवारसाहेबांनी आता आराम करावा, मार्गदर्शन करावे, इत्यादी. अशा स्वरूपाचे हे मतभेद होते..

मुळात दोन पिढ्यांच्या विचारप्रक्रियेतला हा फरक (जनरेशन गॅप) यातून हे मतभेद निर्माण होत असत. सन २००४ च्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाची संधी असतानाही, त्या निवडणुकीत पुढे होऊन राहिलेल्या आर. आर. पाटील यांना किंवा पुतण्या म्हणून अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याऐवजी, पक्षातील सर्व प्रकारच्या नेतृत्वाला बळ देण्यासाठी सर्व महत्त्वाची खाती घेत मुख्यमंत्रीपद काँग्रेसला देण्याचा शरद पवारांचा निर्णय अजितदादांना रुचला नाही. असे अनेक प्रसंग आहेत, ज्यातून अजितदादांनी त्रास करून घेतला..

अती त्रास झाला की दादा ‘नॉट रिचेबल’ होत. पण पुन्हा परत येत, मन मोठे करून काकांच्या चरणी आपली निष्ठा वाहत. “शेवटचा श्वास असेपर्यंत काकांना सोडणार नाही".. ही भावना ते बोलून दाखवत- राज्यातील इतर पुतणे काकांशी कटुता येताच वेगळे झाले; या पार्श्वभूमीवर हा पुतण्या आयुष्यभर अ‍ॅडजस्ट करत राहिला, आपल्या काकांचं वय, वकूब आणि अधिकाराचा सन्मान करीत राहिला.. अलीकडे शरद पवार निर्णय घेण्यास विलंब लावायचे- परस्परविरोधी निर्णय घ्यायचे- वयोमानाने धाडसी निर्णय घेण्याचे टाळायचे - ही जाणीव ठेवून अजितदादांनी त्यांना गृहीत धरून एकतर्फी निर्णय घेतले नाहीत. अपवाद केवळ- विभाजनाचा..पण त्यानंतर कटुता न आणता- एकत्र येण्याची पुन्हा प्रक्रिया सुरू केली.

भाजप प्रचंड बलवान होत असताना, अजित पवार प्रचंड आरोपांच्या जाळ्यात अडकलेले असताना, शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीचा विभाजनाचा प्रयोग करण्यासाठी प्रचंड दबाव असताना, अत्यंत व्याकुळ होऊन समजुतीचा प्रयत्न करणारे दादा जनतेने पाहिले. “पवारसाहेब मार्गदर्शक म्हणून राहतील, वय पाहता आराम करतील, तर तुम्हाला का नको रे..? असे व्याकुळ होऊन बोलताना त्यांची तगमग सर्वांनी पाहिली. अशी तगमग, द्विधा मनस्थिती आणि निर्णयांची गरज- दादांच्या राजकीय जीवनात असे असंख्य प्रसंग आले. त्यांचे संपूर्ण राजकीय आयुष्य अशा क्षणांनी भरलेले होते..

पण प्रत्येक वेळी कोणत्याही परिस्थितीत, दादांचा पहिला आणि अंतिम प्रयत्न एकच, काकांचा आदर अबाधित राहावा. “माझा काका लई मोठा” ही भावना आयुष्यभर शब्दांनी नाही तर मनाने कायम ठेवली… काकांशिवाय सत्तेत स्थिरावल्यानंतर, भाजपशी जुळवून घेतल्यानंतरही, काकांचा सन्मान आणि काकांचा पक्ष एकत्र करण्याचे मन आणि नियोजन त्यांनी ठेवले, ही साधी गोष्ट नाही..!

दुर्दैवाने ते पूर्ण करण्याआधीच काळाने त्यांना गाठले. काकांचा आदर दादांची पत्नी आणि मुले पुढे ठेवतील का..? ही शक्यता सध्याच्या परिस्थितीत कमी दिसते. दादांच्या अनेक सहकाऱ्यांची कामे अडकलेली आहेत. ज्या समझोत्यावर दादा भाजपसोबत गेले, ती कामे अपूर्ण राहिली आहेत. आणि आजच्या परिस्थितीत सत्तेत राहण्याचा पर्याय सहजपणे कुणीही निवडेल, काकांच्या पक्षातील नेत्यांनाही त्यांच्यासह तो पर्याय हवा आहे/ होता…तो काकांच्या शिवाय निवडला गेला आहे. भाजपने या संपूर्ण प्रक्रियेत आपल्या पुढील नियोजनाचा पहिला डाव यशस्वीपणे टाकला आहे..

असे असंख्य टाकलेले डाव भोवती असतानाही, अजित पवारांचा काकांविषयीचा आदर खरा होता, ओरिजिनल होता म्हणून त्यांनी एकत्रित येण्याची प्रक्रिया सुरू केली. माहितीनुसार १२ डिसेंबरला काकांच्या वाढदिवशी ती भेट अजितदादांना काकांना द्यायची होती…! खरे प्रेम आणि सन्मान असल्याशिवाय असा विचार करणे आणि आयुष्यभर त्यामध्ये सातत्य ठेवणे शक्य नसते. सख्ख्या मुलानेही एवढा सन्मान केला असता का..? कदाचित नाही…!! काकांवर वडिलांपेक्षा अधिक प्रेम करू शकणारा हा पुतण्या वेगळा होता….!

रफिक मुल्ला

Updated : 31 Jan 2026 2:04 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top