Home > Top News > 'रस्सीवाली' सावरीया शाळेतून थेट सासरी गेली : रुतुजा अहिरे

'रस्सीवाली' सावरीया शाळेतून थेट सासरी गेली : रुतुजा अहिरे

कंजारभाट (kanjarbhat) समाजात आजही अघोरी प्रकार घडतात. मुलगी ‘कोरी’ आहे की नाही हे ठरवण्यासाठी तिची कौमार्य चाचणी (Verginity) घेतली जाते. जर ही चाचणी फेल ठरली की जातपंचायत भरते आणि लग्न मोडलं जातं. कोविड लॉकडाऊनच्या काळात १३ वर्षाच्या सावरीयाचे आयुष्य बदलले, ते सांगणार रुतुजा अहिरे यांचा रिपोर्ताज...

रस्सीवाली सावरीया शाळेतून थेट सासरी गेली : रुतुजा अहिरे
X





कंजारभाट (kanjarbhat) समाजात आजही अघोरी प्रकार घडतात. मुलगी ‘कोरी’ आहे की नाही हे ठरवण्यासाठी तिची कौमार्य चाचणी (Verginity) घेतली जाते. जर ही चाचणी फेल ठरली की जातपंचायत भरते आणि लग्न मोडलं जातं. कोविड लॉकडाऊनच्या काळात १३ वर्षाच्या सावरीयाचे आयुष्य बदलले, ते सांगणार रुतुजा अहिरे यांचा रिपोर्ताज...

2019ची गोष्ट. 13 वर्षांची सावरीया इयत्ता 4थी मध्ये शिकत होती. घरातील सगळी कामे आटपून शाळेत जाणे आणि घरी आल्यावर पुन्हा त्या इवल्याशा खांद्यावर घराचा भला मोठा भार. आई बाहेरगावी गेली असल्या कारणाने, आता संपूर्ण कामाची जबाबदारी सावरीया वर आली. हळू हळू 'खिचडी' साठी शाळेत जाणे बंद झाले. कारण फक्त घरकाम नव्हे तर बेरीज, वजाबाकी कारणे देखील तिच्यासाठी एक अवघड गोष्ट होती. कारण फक्त गणित विषय नव्हता. मातृभाषा कंजारी आणि शाळेत शिकवण्याचे माध्यम मराठी. शिवाय, शाळेत मिळणारी हिन वागणूक! 'रस्सीवाले' असे या समाजतल्या लोकांना चिडवले जायचे. किंबहुना, ही परिस्थिती आणखी बिकट झाली जेव्हा लॉकडाऊन मध्ये, सावरीया सारख्या बऱ्याच मुलींना शिक्षणा पासून वंचित राहावे लागले.

2021मध्ये जेव्हा सगळे सुरळीत होऊ लागले, तेव्हा मी देखील कॉलेज सुरू झाले म्हणून पुण्यात आले. आठवडाभरात, मी वडार वस्ती मध्ये या मुलांची भेट घ्यायला गेले. एक मोठा बदल झालेला दिसून आला. परकर-पोरके घालणाऱ्या मुली आता साडी आणि संपूर्ण साज करून वावरत होत्या.बहुतांश मुलींच्या हातातून पुस्तकाच्या ऐवजी आता संसाराचा गाडा होता. अशात माझी नजर सावरीया ला शोधत होती.-





पण बरीच चौकशी करून देखील कोणी काही सांगेना. मग जेव्हा आठवडा भराचा काळ उलटला आणि जेव्हा इतर मुलींशी थोडी जवळीक झाली तेव्हा कळाले की सावरिया चे लग्न लॉकडाऊन मध्ये झाले आणि आता ती तिच्या सासरी गेली आहे.


कंजारभाट या समाजावर ब्रिटिशांनी 1871 मध्ये क्रिमिनल ट्राइब्ज अॅक्ट आणि इतर कायदे करून भटक्या विमुक्तांना जन्मजात गुन्हेगारीचा शिक्का उमटविला. आणि तो शिक्का अजून देखील त्यांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीतून दिसून येतो. मूळचा हा समाज राजस्थान मधला असून, कामानिमित्त महाराष्ट्रातील ठाणे, पुणे या जिल्ह्यांमध्ये स्थलांतरीत झाला आहे. दोन खंड बनवणे हा त्यांचा मूळ व्यवसाय असला तरी देखील त्यात पारंगत आहेत त्या फक्त महिला. पण आताच्या औद्योगिकरण्याच्या काळात दोरखंडाला पुरेशी मागणी नाही आणि त्यामुळे धंद्यात पैसा नाही. अशा वेळी घरची पुरुष मंडळी पुण्यातील z-ब्रिज वर कानातील मळ साफ करणे, पिंपरी-चिंचवड मध्ये छोटे-मोठे कारकुनाचे काम, भाडे तत्वावर रिक्षा चालवणे असे काम करतात. हा समाज एक 'क्लोज ग्रुप' आहे, म्हणजे आजूबाजूच्या लोकांसोबत सरमिसळ अतिशय कमी.

या वस्तीतील मुले गोखले नगर येथील वीर बाजी प्रभू देशपांडे या महापालिकेच्या शाळेत जातात. मात्र तिथे देखील या मुलांचा मोठ्या प्रमाणात ड्रॉप आऊट दिसून येते. याचे मुख्य कारण भिन्न भाषा. कंजारभाट समाजाची मातृभाषा कंजारी आणि शाळेत मात्र मराठी माध्यमात शिकवले जाते. दुसरे कारण म्हणजे, 'रस्सीवाले' या नावाने त्यांना चिडवले जाणे.

अशा परिस्थितीत अभ्यास करण्याची इच्छा असून देखील भाषा, संस्कृती या फरकामुळे बहुतांश मुले ही ड्रॉप आऊट होत आहेत. आणि या सगळ्यामध्ये मुलींची संख्या सगळ्यात जास्त आहे. या सगळ्यांच्या मुळाशी वर्षानुवर्षे चालत आलेली एक कुप्रथा आहे आणि ती म्हणजे क्रौमार्य चाचणी. लग्नाच्या पहिल्या दिवशी, क्रौमार्य चाचणी मध्ये नापास होऊ नये यासाठी, त्यांना त्यांच्या शिक्षणाची आहुती द्यावी लागते.

समाजशास्त्राच्या दृष्ष्टिकोनातून बघता, याला पुरुसत्ताक संस्कृती आणि महिलांना 'सेकंड सेक्स' म्हणून मिळणारी वागणूक, यामुळे त्यांचे आयुष्य हे चूल आणि मूल या परिघात कैद केले जाते. लग्नाआधी परपुरुषाशी संबंध नको आणि त्यामुळे चारित्र्यावर उठवण्यात येणारे प्रश्न चिन्ह हे सगळे नको, म्हणून या मुलींवर लहानपणी पासूनच नाना प्रकारची बंधने लादली जातात. 100 लोकांच्या वस्तीबाहेर न पडणे, शाळेत मुलांशी न बोलणे, जेमतेम शिक्षण घेणे मात्र घरकामात "पीएचडी" असणे हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय त्यांच्या साठी ठरवून दिले जाते.





भारतीय संविधानामध्ये घटनादुरुस्ती करून आर्टीकल 21 अ च्या माध्यमातून शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत हक्क म्हणून देण्यात आला. याच्या मागचे मुख्य कारण बघितले तर आर्टीकल 21 च्या माध्यमातून दिले जाणारे जीवनाचा हक्क. यातला एक मुख्य मुद्दा म्हणजे 'लाईफ विथ डीगनिटी'. पण या समाजतील मुलींना मात्र दोघेही हक्क आपल्याच लोकांमार्फत नाकारण्यात येत आहे. इथे एक मूलभूत प्रश्न उपस्थित करता येईल आणि तो म्हणजे क्रौमार्य चाचणी का केली जाते?

जेव्हा पासून प्रायवेट प्रॉपर्टी ची संकल्पना अस्तित्वात आली तेव्हपासून, स्त्रिया या खासगी मालमत्ता आणि या मालमत्तेच्या चारित्र्यावर काही डाग पडणार नाही याची जबाबदारी पुरुषमंडळींची! पण जस जशी प्रगती होत गेली, तस तसे, महिलांना सन्मान आणि उचित दर्जा देण्यात आला. कंजारभाट समाजाच्या बाबतीत मात्र तसे दिसून येत नाही. या समाजाचा, बाहेरच्या लोकांशी अगदी कमी संपर्क आणि त्यामुळे नवीन विचारसरणीचा प्रभाव या समाजावर पडलेला दिसून येत नाही.

दुसरे कारण असे सांगता येईल की समाजात असलेली 'रोल मॉडेल्स' चा अभाव. पुण्यातील या वस्तीमध्ये कल्चर ऑफ पोवेर्टी दिसून येते. गरिबीच्या या गर्तेतून बाहेर पडावे यासाठी रोल माडेल्स म्हणून कोणी बघण्यासारखे नाही. शिवाय, बाहेरच्या लोकांशी संबंध कमी असल्या कारणाने, आयुष्य हे विहिरीतल्या बेडकसारखे झाले आहे.





आतापर्यंत पहिला आपण 'थर्ड पर्सन' पॉईंट ऑफ व्ह्यू. कंजारभाट समाजाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास असे दिसून येते की, ही जीवनशैली त्यांची संस्कृती जपण्याचे एक माध्यम आहे. सतत होणाऱ्या स्थलांतरामुळे, संस्कृती हरवून जाऊ नये म्हणून, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात जरी राहत असले तरी देखील त्यांच्या जीवन शैली मध्ये बऱ्यापैकी साम्य दिसून येते.या समाजामध्ये अजून देखील पिढ्यानपिढ्या जपल्या जाणाऱ्या रूढी परंपरा यांचा पगडा दिसून येतो.

एक सावरिया या बालविवाहाची बळी पडली पण अशा बाकी सावरिया होऊ नये म्हणून या समाजातील मंडळी ही इतर समाजातील घटकांसोबत संपर्कात आली पाहिजे. आणि हे साध्य करायचे असेल तर एक गोष्ट अजून देखील ब्रिटिश निघून गेले तरी आपल्या वागणुकीतून दिसून येते आणि ती म्हणजे, आदिवासी ना लावले जाणारे, क्रिमिनल ट्राईब चे शिक्के. अशा या शिक्क्यांमुळे, आदिवासींना वाटत असून सुद्धा, समाजासोबत एकरूप होता येत नाही. कुठे ना कुठे डोक्यात ती गोष्ट घर करून असते आणि ही हीन वागणूक, त्यांना समाजापासून दूर ठेवते.

महापालिकेच्या शाळेमध्ये स्थलांतरित विद्यार्थ्यांसाठी भाषा ओळख होण्यासाठी खास सुविधा असो किंवा इतर विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या बद्दल आपुलकी, असे काही विशेष प्रयत्न आपल्याला आपणहून करण्याची गरज आहे. भारत देश, जो आता युवा शक्तीच्या जोरावर महासत्ता होऊ पाहत आहे, अशा वेळी समाजाच्या एक वर्गाची, युवापिढी मात्र अशी मागे राहता कामा नये. कांजरभाट समाजातील विद्यार्थी फक्त प्राथमिक शिक्षण घेऊन ड्रॉप आऊट न होता, उच्च शिक्षण घेऊन त्यांनी त्यांच्या समजातील मुला-मुलींसाठी रोल मॉडेल झाले पाहिजे. या माध्यमातून फक्त प्रगती नव्हे तर संस्कृती आणि भाषेची जपणूक सध्या करता येईल.

Updated : 4 April 2023 1:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top