PM Cares Fund : मोदींना ५० हजार कोटींच्या खासगी निधीची आवश्यकता का ? – खा. साकेत गोखले
PM Cares Fund: Why does Modi need a private fund of Rs 50,000 crore? – Saket Gokhale
X
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०२० मध्ये पीएम केअर्स फंडाची घोषणा केली. त्यानंतर समर्थकांनी त्यात मोठ्या प्रमाणावर पैसे जमा केले. सुरुवातीला हा फंड केंद्र सरकारचा असल्याचं वाटत होतं. मात्र, माहिती अधिकारातून पीएम केअर्स हा सरकारी संस्थेचा नसून खासगी निधी असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याचा दावा, तृणमुल काँग्रेसचे राज्यसभा खासदार साकेत गोखले यांनी केलाय. या पीएम-केअर्स फंडामध्ये ३ वर्षात तब्बल ३० हजार कोटी रुपये ($३.४ अब्ज डॉलर्स) जमा झाल्याचा दावाही खा. गोखले यांनी केलाय.
www.pmcares.gov.in शासकीय वेबसाईट वाटावी असाच डोमेनही विकत घेण्यात आला असून त्यावर अशोक स्तंभही लावण्यात आलाय. यासंदर्भात माहिती अधिकारातून माहिती विचारण्यात आली होती, त्यावर पीएम केअर्स फंडांकडून दावा करण्यात आला की, हा खासगी निधी असून ही सरकारी संस्था नाही, अशी माहिती खा. गोखले यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिलीय.
आता धक्कादायक म्हणजे, पीएम केअर्सनं २०२३ पासून (मागील २ वर्षांपासून) त्यांचे खाते विवरण प्रकाशित करणं थांबवलंय. याच वेबसाईटवर प्रकाशित कऱण्यात आलेल्या वार्षिक अहवालांचा आधार घेतला असता, पीएम केअर्स फंडामध्ये २०२० ते २०२३ दरम्यान ३० हजार कोटी रुपये जमा झाल्याचं खा. साकेत गोखले यांनी सांगितलं.
पीएम केअर्स फंडात ३ वर्षात मिळालेल्या ३० हजार कोटी रुपयांमध्ये २० नवीन एम्स रुग्णालयांना निधी मिळू शकतो, सर्व भारतीयांना कोविड लसीचा १ डोस उपलब्ध होऊ शकतो आणि इतका खर्च केल्यानंतरही १० हजार कोटी रुपये शिल्लक राहू शकतात, असा अंदाजही खा. साकेत गोखले यांनी वर्तविलाय.
कोविड-१९ च्या लसीकरणासाठी केंद्र सरकारनं परदेशी बँकांकडून २७ हजार कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. हे बजेटमधून खर्च केलेल्या पैशांच्या व्यतिरिक्त होतं. आता या २७ हजार कोटी रुपयांच्या परदेशी बँकांकडून घेतलेल्या कर्जावर १५०० कोटी रुपयांचं वार्षिक व्याज भारतीय लोकं देत आहेत. विशेष म्हणजे १५०० कोटी रुपये दरवर्षी फक्त व्याजापोटी परदेशी बँकांना दिले जात आहेत, असा दावाही खा. गोखले यांनी केलाय.
पीएम-केअर्स फंडाकडे ३० हजार कोटी रुपये शिल्लक असतांना मोदी सरकारनं कोविड लसींसाठी २७ हजार कोटी रुपयांचं कर्ज परदेशी बँकांकडून का घेतलं ? असा थेट प्रश्नच खा. साकेत गोखले यांनी विचारलाय. मागील २ वर्षात पीएम-केअर्स फंडामध्ये किती पैसे जमा झाले, हे देखील स्पष्ट नसल्याचं सांगत खा. गोखलेंनी मागील ३ वर्षात या फंडात जमा झालेल्या सरासरी रकमेवरुन अंदाज बांधलाय की, २०२० पासून आतापर्यंत पीएम-केअर्स फंडामध्ये ५० हजार कोटी रुपये जमा झाले असतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरु केलेल्या ५० हजार कोटी रुपयांच्या निधीला सरकारी वेबसाईट आणि अशोक स्तंभ हे राष्ट्रीय चिन्ह म्हणून वापरले जात आहे, त्या निधीला खासगी निधी म्हणून वर्गीकृत केलंय. पंतप्रधान मोदींना ५० हजार कोटी रुपयांच्या खासगी निधीची आवश्यकता का आहे, असा थेट प्रश्नच खा. गोखलेंनी उपस्थित केलाय.