Can I meet Mrs. Belsaray? सर मार्क टुली घरी आल्याचा किस्सा सांगताहेत श्रद्धा बेलसरे !
एका बातमीच्या निमित्ताने सकाळ सकाळ घरी आलेले मार्क टुली... त्यांच्या स्मरणार्थ माजी अधिकारी श्रद्धा बेलसरे यांची सोशल मीडियावर विशेष पोस्ट
X
BBC Journalist Sir Mark Tully आज बी.बी.सी. चे जेष्ठ पत्रकार मार्क टुली यांच्या निधनाची बातमी वाचली आणि त्यांच्याबाबतची एक आठवण मनात तरळून गेली. मी 1991 साली धुळ्याला जिल्हा माहिती अधिकारी होते. एका भल्या सकाळी माझ्या दारावरची बेल वाजली. मला वाटले दूधवाला आला असावा. मी अर्धवट झोपेतच दार उघडले आणि पातेले पुढे केले.
समोरून अनोळखी आवाज आला. "गुड मॉर्निंग.
Can I meet Mrs. Belsaray?"
मी चमकून पाहिले तर समोर एक उंचापुरा युरोपियन गोरा माणूस सस्मित चेहऱ्याने समोर उभा होता.
"मी मार्क टुली." त्यांनी ओळख करून दिली.
मला आश्चर्य वाटले. मनात विचार आला यांचे माझ्याकडे काय काम असेल? खान्देशी पाहुणचाराच्या पद्धतीने मी त्यांना आत बोलावले खुर्ची दिली आणि "आलेच" म्हणून आत गेले. चहा घेऊन बाहेर आले आणि चहा घेत आम्ही बोलू लागलों. माझा अंदाज बरोबर होता. त्यांना सरदार सरोवरच्या पुनर्वसनाबाबत माहिती हवी होती. मी सरकारी पद्धतीने त्यांना माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्याची नावे सांगून त्यांना विचारण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यावर ते म्हणाले तूम्हीच शक्य असेल तर मला ती कामे दाखवा. मी त्यासाठी आलो आहे.
मी म्हणाले, "ते माझे कामच आहे. सरकार जे चांगले काम करत आहे ते तुमच्यासारख्या वाहिनीने जगासमोर आणले तर मला आनंदच होईल." मग मी त्यांना घेऊन तळोदा इथे गेले. दिवसभर त्यांना पूनर्वसनाची कामे दाखवली.
दुसऱ्या दिवशी बी. बी. सी. वरून एक रिपोर्ट प्रसिद्ध झाला. त्यात टुली यांनी बातमीची सुरुवात करताना म्हटले होते, "Shraddha Belsaray,, a young and talanted District Information Officer from Dhule, India, told me....".अशी केली होती. त्यानंतर लगेच मला मंत्रालयातून फोन आला. टिपिकल सरकारी पद्धतीने मला 'वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी न घेता BBC शी बोलल्याबद्दल कानउघडणी करण्यात आली. सगळा उत्साह मावळला.
त्या दिवशी दिवसभर तीनचार महाभागांनी केलेली कान उघाडणी सहन केल्यावर अजून एकदा मुख्यालयाचा फोन खणखणला. माझ्या मनाची तयारी झालेलीच होती. आता त्यावेळेचे संचालक श्री दिनकर कचरेसाहेब यांचा फोन होता. पण तो फोन दुसऱ्याच कामासाठी होता. कचरेसाहेबानी अनेक मंत्र्यांकडे त्यांचे सचिव म्हणून काम केल्याने त्यांची वागण्याची पद्धत वेगळी होती. मी मग त्यांना सकाळपासून झालेल्या गोष्टीची कहाणी सांगितली. त्यावर ते म्हणाले, "बिलकुल काळजी करू नका. हे जळणारे लोक असेच असतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे असते. तुम्ही शासनाच्या चांगल्या कामाची माहिती माध्यमाना दिली हे योग्यच केले आहे. याचे तर कौतुक व्हायला हवे होते. यासाठी तुम्हाला कुणी मेमो देऊ शकत नाही.बिनधास्त रहा."
त्यांच्या त्या आश्वासक शब्दांनी मनाला केवढा दिलासा मिळाला! दिवसभराचे मळभ एका क्षणात निघून गेले. आजही मला टुली यांचा धीरगंभीर आवाज आठवतो. त्यांनी एका बातमीसाठी घेतलेली मेहनत आठवली. त्यांची माझ्या लक्षात आलेली त्या दिवशीची ग्रेसफूल प्रोफेशनल वागणूक आठवून फार छान वाटले.
मला आठवते तेही दिवस असेच संक्रांतीच्या आसपासचेच होते. मी दिलेला तिळाचा लाडू टूलींनी आवडीने खाल्ला होता.
भारताविषयी विशेष प्रेम असलेल्या त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली






