Gandhi Talks filmच्या पलिकडची कहाणी !
काय आहे Gandhi Talks filmची कहाणी? दिग्दर्शक किशोर बेळेकर यांचा गांधी टॉक्स चित्रपट बनवण्यापर्यंतचा प्रवास सांगताहेत लेखक बालाजी सुतार
X
Kishore Belekar किशोर बेळेकरांची आणि माझी ओळख श्रीनिवास नार्वेकरांनी करून दिली, त्याला आता बारातेरा वर्षे झालीयत. त्याआधी किशोरचा 'येडा' नावाचा सायको थ्रीलर सिनेमा आला होता. आशुतोष राणा, रीमा लागू, सतीश पुळेकर अशी तगडी कास्ट होती. आशुतोष राणांनी मराठीत केलेलं हे पहिलं काम. येडा हा माणसामधल्या अमानवाचा अतिशय थरारक आणि कमालीचा हिंस्त्र असा अविष्कार होता.
आम्ही पहिल्यांदा बोललो, त्यावेळी किशोर बेळेकर 'रिस्पेक्ट' नावाच्या चित्रपटाच्या कथेवर काम करत होते. त्यांच्या सांगण्यावरून मी त्यांच्यासोबत त्या चित्रपटाचे संवाद लिहिले. अतिशय सुंदर चित्रपट होता. वेगवेगळ्या स्तरांतल्या सहा मुलींच्या एकमेकींमधून चालू होणा-या सहा गोष्टी अशी त्या कथेची गुंफण होती. अगदी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या मुलीच्या जगण्याशी घडत असलेल्या झगड्याच्या गोष्टीपासून, खूप वेगळ्या स्तरातल्या एकमेकींशी प्रेमसंबंध असलेल्या मुलींच्या गोष्टीपर्यंत सहा गोष्टी रिस्पेक्टमध्ये आहेत. (सिगरेट ओढायची इच्छा असलेल्या आणि आपल्या आजोबांच्या मदतीने ती पुरी करणाऱ्या अठरा वर्षाच्या मुलीची एक अतिशय गोड गोष्ट यात आहे. ती मला प्रचंड आवडते.) नंतर किशोर बेळेकरांनी मुंबई महानगरपालिकेत उंदीर मारणारे लोक असतात त्यांच्यावर 'हाजरी' नावाचा एक चित्रपट केला. याही चित्रपटात मी त्यांच्यासोबत संवादलेखनाचं काम केलं.
रोजहजेरीवर काम करणाऱ्या आणि रात्रभर गल्लीबोळात फिरून उंदीर मारणाऱ्या या लोकांचं एक वेगळं जग त्यानिमित्ताने मला अनुभवायला मिळालं. सांगायचा मुद्दा असा की या सबंध दहा-बारा वर्षात किशोर बेळेकर वेगळे चित्रपट करत असले तरी, या सगळ्या काळात आम्ही जितक्या वेळा बोललो-भेटलो असू, त्या प्रत्येकवेळी ते एका वेगळ्या चित्रपटाबद्दलही सतत सतत बोलत असत. त्यांना करायचा असलेला महात्मा गांधींवरचा चित्रपट.
कितीतरी वेळा रात्री उशिरा किशोरचा फोन येतो आणि किशोर 'गांधी'बद्दल भरभरून आणि अतिशय उत्कटपणे बोलायला लागतो, हे या दहा-बारा वर्षात असंख्य वेळा पाहिलं. चित्रपटांच्या कुठल्याही प्रचलित ट्रेंडमध्ये वाहून न जाता स्वतःला करायचे असतील तेच सिनेमे करत राहणाऱ्या किशोरच्या मनात पार्श्वसंगीतासारखा वर्षानुवर्षे 'गांधी' झरत राहिला आहे.
गांधींवर 'मूकचित्रपट' करायचा असं किशोरचा मानस. आता या सांप्रतच्या अव्वाच्यासव्वा बोलभांड काळात कोण निर्माता तयार होणार मूकपट तयार करायला? ज्यांची अवहेलना करणं हेच राजमान्य धोरण आहे अशा गांधींवर चित्रपट? च्छ्याः!
कितीतरी वर्षे सरली, पण किशोरच्या मनातला गांधी सरला नाही. गांधी साकारण्याच्या धडपडीत एकदीड दशक सरलं, आणि मग केवळ एका ई-मेलवरून संपर्कात आलेले म्युझिक माएस्ट्रो ए. आर. रहमान किशोरला म्हणाले, आपण करूया हा सिनेमा!
साक्षात एआर रहमान!
रहमानच्या होकारानंतर दरम्यान काय काय झालं ते आत्ता इथे सांगायची गरज नाही. आज गांधींच्या स्मृतिदिनी किशोरच्या मनातला गांधी पडद्यावर येतो आहे.
'गांधी टॉक्स' या नावाने!
कमल हासनच्या 'पुष्पक' नंतर तब्बल पस्तीसेक वर्षांनी मुख्य प्रवाहातल्या हिंदी चित्रपटात मूक चित्रपट आला आहे. विजय सेतुपथी, अरविंद स्वामी, आदिती राव हैदरी, रोहिणी हट्टंगडी, आपला सिद्धार्थ जाधव आणि महेश मांजरेकर आणि उषा नाडकर्णी असले कसलेले कलावंत 'गांधी टॉक्स'मध्ये आहेत. चित्रपट मूक असला तरी यात गाणी आहेत आणि ती सिद्धहस्त कवी गीतकार समीर सामंतने लिहिली आहेत. आणि जादूगार एआर रहमानचं कमाल संगीत.
'गांधी टॉक्स' आज भारतात आणि बाहेरही अनेक देशांमध्ये प्रदर्शित होतो आहे. मराठी-हिंदी-तमिळ-तेलुगू आणि मल्याळम एवढ्या भाषांमध्ये.
जिथे शक्य असेल तिथे जाऊन बघा नक्की.
आपला सिनेमा आहे. आपला.
आपल्या गांधींचा.
नक्की नक्की नक्की बघा.
(लेखक- बालाजी सुतार)






