Fact Check : Zee न्यूजचा खोटारडेपणा, पाकिस्तानी पायलट पकडल्याचं सांगत तुर्कीचे फोटो दाखवले
X
भारतीय सैन्यानं ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून ६ आणि ७ मे रोजी पाकव्याप्त काश्मीरमधल्या ९ दहशतवादी छावण्या जमिनदोस्त करण्यात आल्या. त्यामुळं भारत आणि पाकिस्तानमधला संघर्ष अधिक वाढलाय. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ल्याच्या बातम्या प्रसारित होऊ लागल्या आहेत.
यासंदर्भात Zee News ने आपल्या बातमीमध्ये भारतीय सैन्याद्वारे पाकिस्तानी पायलटला पकडण्यात आल्याचं सांगितलं होतं. झी राजस्थान या प्रादेशिक वृत्तवाहिनीनेही याच दाव्यासह बातमी प्रसारित केली होती.

INKHABAR न्यूजनं देखील याच दाव्यासह बातमी प्रसारित केली होती.



जबलपूर, पनागर विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार सुशील कुमार तिवारी ऊर्फ इंदुभैय्या, हिंदुस्तान टाइम्सचे लेखक, पत्रकार अभिषेक अस्थाना यांनी त्यांच्या X-हँडल @GabbarSingh वर आणि भाजप समर्थक जितेंद्र प्रताप सिंह याने देखील हाच फोटो शेअर करत दावा केलाय. मात्र, @GabbarSingh या अकाऊंटवरुन नंतर ही पोस्ट डिलीट करण्यात आली. (आर्काइव लिंक-1, लिंक-2) याशिवाय X-हँडल @IndiaWarMonitor नं देखीलही फोटोसह ही पोस्ट शेअर केली.

उजव्या विचारसरणीचे इन्फ्लुएन्सर आलोक तिवारी यांनी देखील जी न्यूज च्या बातमीला सौजन्य देत एक पोस्ट लिहिली. त्या पोस्टमध्ये तिवारी यांनी दावा केला की, “पकडण्यात आलेल्या पाकिस्तानी पायलटचा हा पहिला फोटो आहे”. नंतर तिवारी ही पोस्टच डिलीट केली.

सुमारे १६ लाखापेक्षा अधिक सब्सक्राईबर असणाऱ्या ‘देखो देखो’ नावाच्या युट्युब चॅनेलनंही त्यांच्या व्हिडिओमध्ये हाच दावा केला होता.
फॅक्ट चेक
ऑल्ट न्यूजने हा कथित फोटो रिवर्स इमेजमध्ये जाऊन तपासला. त्यानुसार हा फोटो १२ डिसेंबर २०१६ रोजी gettyimage या वेबसाईटवर अपलोड करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, AFP या वृत्तसंस्थेचे पत्रकार इलियास अकेनगिन यांनी हा फोटो काढला होता. १२ डिसेंबर २०१६ रोजी तुर्कीच्या F16 या लढाऊ दुर्घटनाग्रस्त विमानातून तुर्कीच्या सैनिकांनी पायलटला सुरक्षित बाहेर काढलं होतं, तेव्हाचा हा फोटो होता.

Postimees या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार दक्षिण-पूर्वेतील दिआबाकिर या शहरातून प्रशिक्षणाच्या हेतूनं उड्डाण केलेलं F16 विमान काही वेळानंतर दुर्घटनाग्रस्त झालं होतं. या दुर्घटनेमागचं कारण मात्र समजू शकलेलं नव्हतं.

याचाच अर्थ, हा फोटो साधारणतः ९ वर्ष जुना आहे. तुर्की इथं प्रशिक्षणा दरम्यान उड्डाण घेतलेल्या F16 या लढाऊ विमानाच्या दुर्घटनेनंतरच्या फोटोला भारतीय माध्यमांनी कुठलीही खातरजमा न करता बातमी प्रसारित केल्यानं हा फोटो अधिक व्हायरल झाला. कारण सरकार किंवा कुठल्याही भारतीय सुरक्षा संस्थांकडून यासंदर्भातली कुठलीही माहिती अधिकृतरित्या देण्यात आली नाही. त्यामुळं Zee News सह इतर भारतीय माध्यमांनी तुर्कीच्या अपघातग्रस्त विमानाच्या फोटोचा वापर करुन चुकीची बातमी प्रसारित केल्याचं सिद्ध झालेलं आहे.
https://www.altnews.in/hindi/zee-news-shares-old-image-of-turkiye-as-first-image-of-pakistani-pilot-captured-india-pak-conflict/