Home > Top News > भाजपच्या आयटी सेलवाल्याकडे निवडणूक आयोगाचं सोशल मिडीया

भाजपच्या आयटी सेलवाल्याकडे निवडणूक आयोगाचं सोशल मिडीया

भाजपच्या आयटी सेलवाल्याकडे निवडणूक आयोगाचं सोशल मिडीया
X

देशात निष्पक्ष निवडणुका घेण्याची जबाबदारी असलेल्या निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. 2019च्या राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी भाजपच्या आयटी सेलचे काम करणाऱ्या फर्मला निवडणूक आयोगाच्या सोशल मीडियाचे काम देण्यात आल्याचा गंभीर आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांनी केला आहे.

दरम्यान साकेत गोखले यांच्या या आऱोपाची दखल केंद्रीय निवडणूक आय़ोगाने तातडीने घेतली आहे. तसंच राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी यासंदर्भात अहवाल देण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोग्याच्या प्रवक्त्या शेफाली शरण यांनी दिली आहे. “श्री. साकेत गोखले यांनी केलेल्या ट्विटनंतर निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून यासंदर्भात सविस्तर अहवाल मागवला आहे”, अशी माहिती शरण यांनी दिली आहे.

साकेत गोखले यांनी आपल्या ट्विटमध्ये काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. “निवडणूक आय़ोगाने आपले सोशल मीडिया अकाऊंट चालवण्याचे काम अशा फर्मला दिले ज्यांच्याकडे भाजपच्या आयटी सेलचे काम होते आणि धक्कादायक बाब म्हणजे या फर्मचे मालक भाजपचे नेते आहेत. निवडणूक आयोगाने सोशल मीडियावर दिलेल्या जाहिरातींचा उल्लेख करत साकेत गोखले यांनी सांगितले आहे की सर्व जाहिरातींवर एकच पत्ता आहे, ‘202 प्रेसमन हाऊस, विलेपार्ले, मुंबई’.

एवढेच नाही तर हा पत्ता Signpost India या सरकारच्या पॅनेलवर असलेल्या एजन्सीचा आहे आणि ही एजन्सी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळची आहे, असा आऱोपही गोखले यांनी केला आहे.

“202 प्रेसमन हाऊस या पत्त्याचा वापर Social Central नावाच्या डिजिटल एजन्सीकडून केला जातो. ही एजन्सी भाजयुमोच्या आयटी आणि सोशल मीडिया सेलचे राष्ट्रीय समन्वयक देवांग दवे यांच्या मालकीची आहे.” असा दावाही गोखले यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. “त्यामुळे भाजपच्या आयटी सेलच्या सदस्याकडे निवडणूक आयोगाने आपले सोशल मीडियाचे काम का दिले?”, असा सवाल गोखले यांनी विचारला आहे.

दरम्यान काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.

Updated : 24 July 2020 3:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top