Home > Top News > कोरोना लसीकरण: तुमचा नंबर कधी लागणार?

कोरोना लसीकरण: तुमचा नंबर कधी लागणार?

कोरोना लसीकरण धिम्या गतीने केल्यास पुन्हा एकदा लसीकरण मोहिम राबवावी लागेल का? कोरोना व्हायरसने गुणधर्म बदलल्यास लसीमध्ये बदल करावे लागतील का? याच गतीने लसीकरण सुरु राहिल्यास तुम्हा आम्हाला लस मिळायला 10 वर्षे लागतील हे तुम्हाला माहिती आहे का? काय आहे जगभरात कोरोना आणि लसीकरणाची स्थिती? महाराष्ट्रात कोरोना का वाढला? काय आहेत जागतिक दर्जाच्या तज्ज्ञांची मतं वाचा मॅक्समहाराष्ट्रचा स्पेशल रिपोर्ट

कोरोना लसीकरण: तुमचा नंबर कधी लागणार?
X

राज्यात दररोज 2 ते 2.5 लाख लोकांना कोरोना लसी दिल्या जात आहे. तरीही राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.? लसीकरणाचा वेग अधिक आहे तर कोरोनाचे आकडे का वाढत आहेत. राज्याकडे कोरोना लसीचे पुरेसे डोस नाहीत का? याच वेगाने कोरोना लसीकरण सुरु राहिले तर आपल्याला लस कधी मिळणार असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो.

गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. या वर्षभरात 30 लाखांपेक्षा अधिक लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे .तर देशात 1 लाख 59 हजार लोकांनी कोरोनामुळे प्राण गमावले. पैकी महाराष्ट्रात 53 हजार 138 लोकांना कोरोनामुळं आपला जीव गमवावा लागला. कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू होत असताना कोरोनावर लस कधी येणार? असा प्रश्न लोक उपस्थित करत होते. अखेर जगातच नाही तर भारतात स्वत:ची लस तयार झाली. जागतीक आरोग्य संस्थेने लसीला मान्यता देखील दिली. मात्र, लोकांची लसीकरणाबाबत मागणी असल्याचं दिसून येत नाही.

आपल्याच राज्याचा विचार केला तर एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. तर दुसरीकडे एका दिवसात 2 ते 2.5 लाख लोकांचं लसीकरण होत आहे. तरीही राज्यात कोरोनाचे आकडे वाढत आहेत? त्यामुळे आपल्या राज्यात लसीकरणाचा वेग कमी आहे का? राज्यात कोरोना रुग्ण वाढीची काय कारण आहेत? जर लसीकरणाचा वेग अधिक आहे तर कोरोनाचे आकडे का वाढत आहेत. राज्याकडे कोरोना लसीचे पुरेसे डोस नाहीत का? याच वेगाने कोरोना लसीकरण सुरु राहिले तर आपल्याला लस कधी मिळणार असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो.

कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये आणि दुसऱ्या लाटेमध्ये मोठा फरक पाहायला मिळत आहे. कारण पहिल्या लाटेमध्ये आपल्याकडे लस नव्हती. मात्र, दुसऱ्या लाटेमध्ये आपल्याकडे कोरोनाची लस आहे.

दुसऱ्या लाटेमध्ये आपल्याकडे कोरोनाची लस असतानाही राज्यात कोरोनाचे रुग्ण का वाढत आहेत? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

राज्य शासनाच्या माहिती नुसार 11 कोटी पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात 17 मार्चपर्यंत फक्त 36 लाख 39 हजार 989 लोकांना लस देण्यात आली आहे. मध्यंतरी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे दर आठवड्याला 20 लाख कोरोना लसीची मागणी केली. महाराष्ट्राने दररोज 3 लाख लोकांना लस देण्याचं लक्ष्य ठेवल्याची माहिती दिली.

सध्या राज्यात दुसऱ्या टप्प्यात 60 वर्षावरील तसंच ज्या लोकांना गंभीर आजार आहेत अशा 45 वर्षावरील लोकांना लस दिली जात आहे. या लोकांची संख्या 1 कोटी 77 लाख आहे. या सर्व लोकांना लस देण्यासाठी साधारण 2 कोटी 20 लाख डोस उपलब्ध करण्याची मागणी राजेश टोपे यांनी केंद्राकडे केली आहे.

तरीही इतर लोकांना लस कधी मिळणार असा सवाल उपस्थित होतो. पहिल्या टप्प्यात कोव्हीड योद्धांना लस देण्यात आली. यामध्ये फक्त आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. मात्र, कोराना काळात दूध टाकणारा, भाजी विकणारा, लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून बॅकेत काम करणारा कर्मचारी, लोकांपर्यंत कोरोनाची योग्य माहिती देणारे पत्रकार हे कोरोना योद्धा नाहीत का? या लोकांना कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात लस का देण्यात आली नाही. विशेष बाब म्हणजे कोरोनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं असताना लोक कोरोना लसीकरणाबाबत मागणी का करत नाही.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 18 वर्षा पुढील सर्व लोकांना लस देण्याची मागणी केंद्राकडे केली आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 45 वर्षापुढील सर्व लोकांना कोरोनाची लस द्या अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. त्यामुळं लसीकरणाबाबत सरकारमधील प्रमुख नेत्यांची एकवाक्यता नसल्याचं दिसून आलं.

तरीही या वेगात लस दिली तर सर्व लोकांपर्यत लस पोहोचायला काही वर्ष जातील. 11 कोटी जनतेपैकी दररोज 2.5 लाख लोकांना कोरोनाची लस दिली जाते. असं गृहीत धरलं तरी सध्याच्या वेगाने साधारण 440 दिवस लागतील. मात्र, सरकार सरसकट लसीकरण करत नसल्यानं पहिला टप्पा जाहीर झाल्यानंतर दुसरा टप्पा, दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर तिसरा टप्पा असे लसीकरणाचे टप्पे केले जात आहे. आणि ठरावीक वयातील लोकांना आजार पाहून लसीकरण केलं जाक आहे. त्यामुळे राज्यात लसीकरणाला काही वर्ष लागतील.

त्यातच राज्यात कोरोनाचे प्रमाण वाढलेले असताना त्या दरम्यान किती लोकांना मृत्यूला सामोरं जावं लागेल. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन लावलं गेलं तर किती लोक रस्त्यावर येतील? किती लोकांचे संसार उद्वस्थ होतील. किती लोकांच्या पोटाचा प्रश्न निर्माण होईल? याचा विचार करायलया हवा.


तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी एक ट्विट केलं असून ते या ट्विटमध्ये म्हणतात...

महाराष्ट्राला लसीचे एकूण 54 लाख डोस पाठवण्यात आले होते. त्यापैकी फक्त 23 लाख डोस वापरण्यात आले. 56% लस वापरण्यात आलेली नाही. आणि आता शिवसेनेचे खासदार राज्यासाठी अधिक लशी मागत आहेत. आधी ही जागतिक साथ नीट हाताळली नाही, आता लस देण्याचं व्यवस्थापन योग्य नाही. असं म्हणत राज्य सरकारवर टीका केली आहे.

त्यातच विविध कारणामुळे लस वाया जाण्याचे प्रमाण मोठं आहे. काही राज्यांत २० टक्क्यांपर्यंत लस वाया जाते. महाराष्ट्रात हे प्रमाण 6 टक्के आहे. यासाठी झिरो वेस्टज पॉलिसी राबविण्यात येणार आहे.संपुर्ण देशाचा विचार केला तर कोरोना लस वाया जाण्याचं प्रमाण 6.5 टक्के इतके आहे. दरम्यान राज्यात कोरोनाचे लसीकरण वाढावे म्हणून राज्यातील 134 खासगी रुग्णालयांना केंद्राने लसीकरणासाठी मान्यता दिल्याची माहिती राज्य सरकारने म्हटलं आहे.

राज्यातील कोरोना लसीचं प्रमाण कमी आहे. याची जाणीव राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आहे. म्हणूनच त्यांनी 19 मार्चला पत्रकारांशी बोलताना जनतेला लस घेण्याचं आवाहन केलं आहे.

मुख्यमंत्री म्हणाले?

"राज्यात कोरोनाचा धोका वाढला आहे. त्यावर सध्या लॉकडाऊन हा मार्ग आहे. मात्र जनता मला सहकार्य करणार याची खात्री आहे. कोरोना लस ही एक ढाल आहे. त्यामुळे लोकांनी ही लस टोचून घ्यावी. कोणतीही भीती मनात ठेवू नका. पण लस घेतली तरी मास्क वापरणं बंधनकारक असणार आहे.

महाराष्ट्रात सरकार करणार लसीची निर्मिती...?

महाराष्ट्रात कोरोना लस कमी पडणार नाही, याची खात्री केंद्र सरकारने दिली आहे. केंद्राने पुरवठा नियमित होईल असे सांगितले आहे. तसेच ICMR मार्गदर्शनाखाली भारत बायोटेक जी कोरोना लस बनवत आहे. तिचं उत्पादन महाराष्ट्रात करु इच्छितो, तर त्याला परवानगी द्या, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींकडे केले आहे. यावर पंतप्रधान मोदींनी याबाबतचा प्रस्ताव द्या त्याला मंजूरी देतो, असे सांगितल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आता हा प्रस्ताव जायला आणि प्रत्यक्षात तो मंजूर व्हायला आणि लसनिर्मिती करायला किती दिवस जातील. हा संशोधनाचा भाग आहे.

लस घेऊनही कोरोना झाला...

राज्याच्या 'कोव्हिड टास्क फोर्स'चे सल्लागार डॉ. सुभाष साळुंके यांना कोव्हिडच्या दोनही डोस घेतल्यानंतर 23 दिवसांनी करोना झाला आहे. असा प्रकार राज्यातील अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये झाल्याचं बोललं जात आहे.

असं का झालं?

कोणतीही लस शंभर टक्के प्रभावी नसते. त्यामुळे अशा घटना समोर येणे असामान्य नाही असे तज्ज्ञांचं मत आहे.

लस घेऊन कोरोना झाला लसीचा उपयोग काय?

लसीमुळे संबंधित व्यक्तीच्या शरीरात तयार होणाऱ्या अँटीबॉडीजमुळे करोना संसर्ग झाला तरी, त्याची तीव्रता कमी असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे कोरोनाच्या लढाईत लस हे प्रभावी शस्त्र आहे. असं मत तज्ज्ञ व्यक्त करतात.

महाराष्ट्रात काय आहे परिस्थिती?

महाराष्ट्रात दैनंदिन कोरोना रुग्णांची आत्तापर्यंतची सर्वोच्च संख्या 18 मार्चला पाहायला मिळाली. गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये सर्वाधिक 24 हजार 896 रुग्ण एका दिवसात आढळले होते. त्यानंतर 18 मार्चला 25 हजार 833 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात कोरोनामुळं 18 मार्चला 58 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्याचा 2.22 टक्के आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 90.79 % एवढा आहे.

देशातील एकूण कोरोनाच्या रुग्णांचा विचार केला तर महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. देशात 18 मार्चला 39 हजार 726 रुग्ण आढळले आहे. देशातील एकूण रुग्णांच्या जवळजवळ 65 टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. देशातील कोरोनाची एकूण रुग्ण संख्या 2 लाख 71 हजारांवर पोहोचली आहे. 18 मार्चला कोरोनामुळे देशात 154 लोकांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रानंतर सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण पंजाबमध्ये आहेत.

एकंदरींत देशाची परिस्थिती पाहता महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभागाने महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट जाहीर केली आली आहे.

देशात लसीकरणाची काय स्थिती आहे?

जर देशाचा विचार केला तर 3 कोटी 71 लाख 43 हजार 255 लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. यामध्ये 3 कोटी 6 लाख 787 लोकांनी कोरोनाचा पहिला डोस घेतला आहे. तर 65 लाख 42 हजार 468 लोकांना कोरोनाचा दुसरा डोस घेतला आहे. थोडक्यात 135.5 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात कोरोनाचे लसीकरण झालेले 65 लाख 42 हजार 468 लोक आहेत. देशाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात विचार केला तर पहिला डोस घेतलेल्या लोकांचे प्रमाण 2.3 टक्के इतकेच आहे. तर पूर्ण लस घेतलेल्या लोकांचं प्रमाण अवंघ 0.5 टक्के इतकेच आहे.

त्यामुळं तुम्हाला आम्हाला सर्वसामान्य लोकांना लस कधी मिळणार? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

जर याच गतीने देशातील जनतेला लस देण्यात आली तर देशातील 70 टक्के लोकांना लसीचे दोनही डोस घेण्यासाठी 10.8 वर्षे लागतील. असं एकंदरीत या आकडेवारीवरून स्पष्ट होतं.

देशात काय आहे लसीकरणाची स्थिती?

राजस्थान: 3.35 मिलियन

महाराष्ट्र: 3.33 मिलियन

उत्तर प्रदेश: 3.14 मिलियन

वेस्ट बंगाल: 2.89 मिलियन

गुजरात: 2.81 मिलियन

मात्र, प्रत्येक राज्याच्या लसीकरणाचा विचार करता प्रति दशलक्ष नागरिकांमागे लसीचे किती डोस दिले आहेत. याचा विचार केला तर अनेक राज्य आपल्या पुढे आहेत. या राज्यातील लसीकरणाची टक्केवारी आपल्या पेक्षा अधिक आहे.

लसीकरणात महाराष्ट्र कुठं आहे...

यामध्ये सिक्कीम, त्रिपुरा मिझोराम, अंदमान निकोबार, दिल्ली, गोवा, केरळ, अरूणाचल प्रदेश, राजस्थान यासारखी 13 राज्य लसीकरणाच्या बाबतीत आपल्या पुढे आहेत.. आपला लसीकरणाच्या बाबतीत देशात 14 व्वा क्रमांक लागतो. विशेष बाब म्हणजे कोरोनाची लस महाराष्ट्रात पुणे येथे तयार होते. आणि हाच महाराष्ट्र लसीकरणामध्ये मागे आहे.

थोडा जगाचा विचार करूया...

सध्या जवळ जवळ 139 देशांमध्ये कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. 400 मिलीयन (१ मिलियन: १० लाख) लोकांना आत्तापर्यंत लस देण्यात आली आहे. चीन मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर अनेक देशांनी अब्जावधी रुपये खर्च करुन कोरोनाची लस तयार केली आहे. मात्र, जगामध्ये कोरोना लसीकरणाचा वेग पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपण कोरोनाच्या लसीकरणामध्ये किती मागे आहोत.

लसीकरणामध्ये कोणत्या देश कुठं? (देशातील एकूण लोकसंख्येतील किती टक्के लोकांनी लस घेतली. त्यानुसार आकडेवारी)

जगामध्ये गीब्राल्टर (Gibraltar) या प्रदेशात 58.1 टक्का लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. त्यानंतर इस्राइलमध्ये Israel 50.9 टक्के लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. लसीकरणामध्ये अमेरिकेचा (USA) 10 व्वा क्रमांक लागतो. अमेरिकेत आत्तापर्यंत 12 टक्के लोकांनी लस घेतली आहे. भारताचा विचार केला तर लसीकरणात भारताचा 47 व्वा क्रमांक लागतो. आपल्या देशात 0.5 टक्के लोकांनीच कोव्हीडची लस घेतली आहे. याचे कारण इतर देशाच्या तुलनेत आपल्या देशाची लोकसंख्या अधिक आहे. असं सांगितलं जात आहे. तरीही आपल्या देशातील लसीकरणाचा वेग मंद आहे का? असा सवाल उपस्थित होतो.

जगातील लसीकरणामध्ये लोकसंख्येचा विचार करता...

1 मिलियन = 10 लाख

अमेरिका: 111 मिलियन

चीन: 65 मिलियन

भारत: 35 मिलियन

युनायटेड किंग्डम: 27 मिलियन

एकंदरीत लोकसंख्येचा विचार करता अमेरिकेत सर्वांधिक लोकांनी लस घेतली आहे. अमेरिकेत 111 मिलियन लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. त्यानंतर चीन मध्ये 65 मिलियन आणि आपल्या देशात 35 मिलियन लोकांनी लस घेतली आहे. वरील सर्व देशांच्या लसीकरणाचा विचार केल्यास आपल्या देशाच्या तुलनेत या देशाचा लसीकरणाचा वेग अधिक असल्याचं दिसून येतं.

या आकडेवारीवरुन आम्ही काही तज्ज्ञांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

लंडन येथील प्रसिद्ध डॉक्टर संग्राम पाटील सांगतात... कोरोनाची लस प्रभावी आहे. मात्र, त्यात आपल्या देशात लसीचं प्रमाण किती आहे? याचा विचार करायला हवा. आपल्या देशात पहिला डोस दिला गेला आहे. पहिला डोस घेतल्यास 76 टक्के प्रॉटेक्शन राहते. दुसरा डोस घेतल्यास इतकंच प्रॉटेक्शन राहतं. तीन आठवड्यानंतर साधारण आपल्याकडे दुसरा डोस घेतात. मात्र, दोन डोसमध्ये दोन महिने तीन महिन्याचं अंतर ठेवलं तर 80 टक्के प्रोटेक्शन राहते.

कोरोनाची लस घेतली तरीही कोरोना का होतो?

यावर संग्राम पाटील सांगतात... कोणत्याही लसीने साधारणपणे 100 टक्के लोक संरक्षित होत नाही. काही लोक संरक्षित होण्याचे राहतात. मात्र, कोरोनाची लस घेतली असता, तुम्हाला कोरोनापासून होणारा धोका कमी होतो. मृत्यूचं प्रमाण ही लस घेतल्यास जवळ जवळ नगण्य आहे.

कोरोना लसीकरणाचे प्रमाण वाढवणं गरजेचं...

संग्राम पाटील सांगतात, व्हायरसचं स्वरुप बदलतंय का? यावर सरकारने लक्ष द्यायला हवं त्याचबरोबर सरकारने लसीकरण वाढवावं, जास्तीत जास्त लोकांनी लस दिली तर कोरोना आटोक्यात येऊ शकतो.

कोरोना आणि कोरोनाच्या लाटी...

कोरोनाच्या साधारण तीन लाट येतील. 100 वर्षापुर्वी आलेल्या स्पॅनिश फ्लूमध्ये सेकंड व्हेव ही मोठी होती. त्यामुळं दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा मोठी असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. युरोप आणि अमेरिकेत देखील हीच परिस्थिती आहे. मात्र, दुसऱ्या लाटेत मृत्यू दर कमी आहे. असं मत संग्राम पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

कोरोना व्हायरस बदलतो आहे का? या संदर्भात लसीकरणाच्या बाबत शास्त्रज्ञ असलेले डॉ. नानासाहेब थोरात सांगतात. जर कोरोना व्हायरस बदलला असेल तर आपल्याला लसीमध्ये देखील बदल करावे लागतील. कारण व्हायरस मध्ये साधारण लेअर असतात. त्याचं सरफेस प्रोटीनचं असते. सरफेसमध्ये थोडे फार बदल झाले तर हरकत नाही. मात्र, जर आतमध्ये काही बदल झाले तर आपल्याला लसीमध्ये देखील बदल करावे लागतील.

सुरुवातीला आपण चीनमधून आलेल्या व्हायरसच्या गुणधर्मानुसार लस तयार केली. मात्र, त्यानंतर आता साऊथ आफ्रीका, फ्रान्स या देशामध्ये व्हायरस चे गुणधर्म बदलत आहेत. त्यामुळं लसीमध्ये व्हायरसच्या गुणधर्मानुसार लस तयार करावी लागते. आणि हे स्वाभाविक आहे.

सध्या युके मध्ये 2.5 कोटी लोकाना लसीकरण झालं. तर दीड महिन्यात 90 टक्के हॉस्पिटलायजेशन कमी झालं आहे. सध्या दिवसाला युके मध्ये 4 ते 5 हजार रूग्ण आढळतात. आणि मृत्यूदरही घटला आहे. हा कोरोना लसीकरणाचा परिणाम आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचे आकडे वाढतात. यावर ते म्हणतात महाराष्ट्रात युरोप सारखी सिस्टीम आहे. या ठिकाणी केसेस लपवल्या जात नाहीत. मोठ्या प्रमाणात टेस्टींग होत आहेत. यातील asymptomatic रुग्णांचं प्रमाण अधिक आहे. मात्र, सरकारने कोरोना व्हायरसच्या गुणधर्माकडे लक्ष देण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात मास स्केलवरती लसीकरण सुरु केलं पाहिजे. जे महाराष्ट्रात होत नाही. मला हे कळत नाही महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण का होत नाही. युरोपीय देशात क्रीडांगणावरती लार्ज स्केलवरती लसीकरण सुरु आहे.

कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांना लसीकरण करा, अन्यथा पुन्हा एकदा लसीकरण करावे लागेल. मोठ्या प्रमाणात लसीकरण झालं नाही. तर व्हायरसची स्ट्रेन्थ वाढत जाते. व्हायरस गुणधर्म बदलले तर नवीन व्हायरसला तोंड देण्यासाठी नवीन प्रतिकारक क्षमता शरीरात निर्माण होणं गरजेचं आहे. त्यामुळं लसीकरण हे मोठ्या प्रमाणात कमी कालावधीत करणं गरजेचं असल्याचं मत डॉ. नानासाहेब थोरात यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सांगितलं.

Updated : 20 March 2021 3:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top