Chandrapur | जिल्ह्यातील पराभवानंतर सुधीर मुनगंटीवार यांची भाजपवर नाराजी
X
चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या नगरपरिषद निवडणुकांमध्ये भाजपला दारुण पराभव स्वीकारावा लागल्यानंतर ज्येष्ठ भाजप नेते, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षावर उघड नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांना बळ दिले, मात्र माझ्याच पक्षाने माझी शक्ती हिरावून घेतली, असे गंभीर विधान करत त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्ष नेतृत्वावर निशाणा साधला.
पक्षाने गटबाजीला पोषक वातावरण तयार केल्याचा आरोप करत मुनगंटीवार यांनी पक्षातील धोरणांवरही टीका केली. शनि शिंगणापूरनंतर आमचा पक्ष असा एकमेव पक्ष आहे जिथे दरवाजे सतत उघडे असतात, असे म्हणत त्यांनी पक्षात बाहेरून येणाऱ्यांवर आणि या धोरणावर जोरदार प्रहार केला.
चंद्रपूर जिल्ह्यातील अकरापैकी बहुतांश नगरपरिषदा भाजपच्या हातून निसटल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. तसेच चंद्रपूर–गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या चारही जिल्ह्यांतून एकाही नेत्याला मंत्रिपद न मिळाल्याबाबतही त्यांनी कटाक्ष टाकला.
दरम्यान, काँग्रेसचे नवे लोकप्रतिनिधी नागरिकांच्या मूलभूत सुविधांचे समाधान करत असल्याने त्यांना हे यश मिळाले असावे, असा टोला लगावत भाजप आत्मचिंतन करेल, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
माझ्याच पक्षाने माझी शक्ती कमी केली..., चंद्रपूर जिल्ह्यात भाजपला मिळालेल्या दारुण पराभवानंतर सुधीर मुनगंटीवार यांचा पक्षाला घराचा आहेर pic.twitter.com/SimyyW2ozf
— Saamana Online (@SaamanaOnline) December 21, 2025






