रत्नागिरीत ‘कॅन्सर’चे सावट ? इटलीत बंदी आलेली ‘मिटेनी’ कंपनी लोटे परशुराममध्ये
X
रत्नागिरी
कोकणातील निसर्गरम्य पर्यावरणावर गंभीर विषारी संकटाचे ढग दाटू लागले आहेत. इटलीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण केल्यामुळे बंद करण्यात आलेली ‘मिटेनी’ (Miteni) ही केमिकल कंपनी आता रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम एमआयडीसीमध्ये दाखल झाल्याचा गंभीर आरोप आता स्थानिक नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून करायला सुरुवात केलीय. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र भीती आणि संतापाचे वातावरण आहे.
इटलीतील विसेन्झा येथील ‘मिटेनी’ कंपनी PFAS (पेर-अँड पॉलीफ्लोरोअल्काइल सबस्टन्सेस) या घातक रसायनांचे उत्पादन करत होती. हे ‘फॉरेव्हर केमिकल’ म्हणून ओळखले जाते, कारण ते निसर्गात किंवा मानवी शरीरात नष्ट होत नाही. या रसायनांच्या प्रदूषणामुळे इटलीत सुमारे साडेतीन लाख नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला असून कॅन्सर, वंध्यत्व आणि हृदयविकाराचे प्रमाण वाढल्याचे निष्पन्न झाले होते.
या प्रकरणात इटलीच्या न्यायालयाने ‘मिटेनी’ कंपनी बंद करण्याचा आदेश देत ११ जबाबदार अधिकाऱ्यांना एकत्रित १४१ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर कंपनीची यंत्रसामग्री आणि पेटंट्स लिलावात काढण्यात आली. हीच यंत्रसामग्री भारतीय कंपनी ‘लक्ष्मी ऑर्गॅनिक्स’च्या माध्यमातून खरेदी करून ‘विवा लाइफ सायन्सेस’ या उपकंपनीमार्फत लोटे परशुराम एमआयडीसीमध्ये आणल्याचा दावा केला जात आहे.
सर्वात गंभीर बाब म्हणजे PFAS या घातक रसायनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतात सध्या ठोस कायदे नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे इटलीत बंदी घातलेले हे रसायन उत्पादन भारतात सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लोटे परशुराम परिसरातील नद्या आणि भूगर्भातील पाणी आधीच प्रदूषणाच्या विळख्यात असल्याचे बोलले जाते. अशा परिस्थितीत ‘फॉरेव्हर केमिकल्स’चे उत्पादन सुरू झाल्यास पिण्याचे पाणी, नागरिकांचे आरोग्य, तसेच शेती आणि मासेमारी यावर दूरगामी व कायमस्वरूपी परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणावर शासन आणि प्रदूषण नियंत्रण यंत्रणांची भूमिका काय असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.






