NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का ?
X
शरद पवारांचं आजपर्यंतचं राजकारण अनाकलनीय असंच राहिलेलं आहे. काँग्रेसपासून विभक्त होऊन शरद पवारांनी तत्कालीन आघाड्या केल्या अन् येनकेनप्रकारे सत्ता केंद्राच्या भोवतालीच त्यांचं राजकारण राहिलेलं आहे. त्याला काही अपवादही आहेतच. मात्र, तडजोडीच्या राजकारणाकडेच त्यांचा ओढा राहिलेला आहे.
काँग्रेसच्या दिल्लीतल्या शीर्ष नेतृत्वालाच आव्हान देत शरद पवारांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यानंतर काँग्रेससोबतच महाराष्ट्रात सत्ताही स्थापन केली. १९९९ ते २०१४ पर्यंत मित्रपक्षांना घेऊनच राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात सत्तेत होती. मात्र, २०१४ नंतरच्या बदलत्या राजकारणाचा फटका भाजप-शिवसेना सोडून इतर पक्षांना बसत होता. २०१९ च्या नंतर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या राजकारणात दोन मोठे भूकंप झाले. त्यात पहिला हा शिवसेनेतली बंडखोरी अन् दुसरा राष्ट्रवादी पडलेली उभी फूट. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अशी अनाकलनीय फूट पडेल, असं कुणालाही वाटलेलं नव्हतं. या दोन्ही पक्षांमध्ये फरक फक्त इतकाच होता की, जेव्हा शिवसेनेत फूट पडली तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात नव्हते तर राष्ट्रवादी काँग्रेसमधली उभी फूट शरद पवार बघतच राहिले.
शरद पवारांनी आता सक्रिय राजकारणातून निवृत्ती घ्यावी, अशी मागणी अजित पवारांची होती. त्यामागे शरद पवारांचं वय आणि त्यांच्या प्रकृतीविषयी वाटणारी चिंता हे कारण होतं. मात्र, अनेकांनी त्याचा चुकीचा अर्थ काढला. शेवटी, नाईलाजानं अजित पवारांना वेगळा निर्णय घ्यावा लागला. दरम्यान, अपवादात्मक कौटुंबिक कार्यक्रम वगळता शरद पवार आणि अजित पवार हे क्वचितच एकत्र दिसले. त्यानंतर नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी केली ती पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत. तिथं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती निराशाच आली.
या दरम्यानचं मॅक्स वुमनच्या संपादक प्रियदर्शिनी हिंगे यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांसोबत प़ॉडकास्ट केला. यात प्रियदर्शिनी हिंगे यांनी अजित पवारांना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाविषयी थेट प्रश्न विचारला. त्यावर अजित पवारांनी थेट बोलणं टाळलं. मात्र, विलिनीकरणाची शक्यताही त्यांनी फेटाळली. अर्थात, तेव्हा महापालिकेच्या निवडणुका सुरु होत्या, त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घोषित झाल्या होत्या. त्यामुळं अजित पवारांनी विलिनीकरणावर थेट बोलणं टाळलं असावं. मात्र, शरद पवार हे आमचं दैवत असल्याचं त्या प्रश्नाच्या उत्तरात अजित पवार म्हणाले होते. यातच त्यांचा शरद पवारांविषयीचा आदर आणि आत्मीयता दिसून येते.
अजित पवारांचा राजकीय अनुभव आणि महाराष्ट्राच्या प्रश्नांचा अभ्यास असणारा त्यांचा समवयस्क नेता सध्याच्या घडीला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाहीये. शिवाय अजित पवारांच्या नंतर पक्षाला पुढे घेऊन जाईल, असा सक्षम पर्यायही सध्या दिसत नाही. अशा परिस्थितीत सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाची सूत्रं गेल्यास त्याचा फायदा हा राष्ट्रवादी काँग्रेसला होऊ शकतो, असं जाणकारांना वाटतं. विलिनीकरणाआधी शरद पवार आणि अजित पवारांच्या कुटुंबियांमध्ये मनोमिलन होणं गरजेचं आहे, तसं झाल्यास विलिनीकरण होण्याची शक्यता वाढू शकते. अर्थात सध्याच्या बदलत्या राजकारणाचा अंदाज लावणं तसं कठीणच आहे.
यावर ज्येष्ठ पत्रकार राही भिडे मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगतात की,
खरं म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र आले पाहिजे. मला वाटतं सध्याचं वातावरण पाहता योग्य तो विनियोग करून पुढील राजकारण करायचं असं हे लोक ठरवतील. शरद पवार यांच्याकडे पाहिलं तर आता त्यांचं वय झालं आहे. तरीही शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये सगळ्यांना चांगल्यापद्धतीने मार्गदर्शन करतील तो पर्यंत हा पक्ष एकत्रित राहील. आणि या नव्या पिढीला पुढच्या काळामध्ये तो जनतेचा विश्वास कमवता आला पाहिजे. अजितदादांनी ग्राऊंड लेवलला काम करून एक केडर निर्माण केलं. ज्या पद्धतीने अजितदादांनी पक्ष चालवला वाढवला त्या पद्धतीने पक्षही त्यांच्या पावलांवर पाऊल टाकेल असं वाटत आहे. सध्याचं राजकीय वातावरण पाहता राष्ट्रीय राजकारणात होणारे बदल, राज्यपातळीवर होणारे बदल या सगळ्या घडामोडींचा आढावा घेऊन हे दोन्ही पक्ष विचार करतील. आणि शरद पवार यांच्या नेतृत्वात दोघेही एकत्र येतील असं चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे. तसेच पवार कुटुंबिय यापुढे एकत्रच राहतील याची प्रचिती माध्यमांवर येणाऱ्या व्हिडिओ आणि फोटोमधून स्पष्ट दिसते आहे आहे असं मत राही भिडे यांनी व्यक्त केलं आहे.
Sharad Pawar politics, Nationalist Congress Party, NCP merger, Ajit Pawar, Sharad Pawar NCP, Maharashtra politics, Pawar family reunion, NCP factions unite, Sharad Pawar leadership, Ajit Pawar legacy, Maharashtra government, BJP Shiv Sena, NCP alliance, Pune municipal elections, Pimpri-Chinchwad elections






