Home > Top News > राजभवनातील ब्रिटिशकालीन बंकरच्या पुनर्शोधाची ९ वर्षे !!

राजभवनातील ब्रिटिशकालीन बंकरच्या पुनर्शोधाची ९ वर्षे !!

राजभवनातील ब्रिटिशकालीन बंकरच्या पुनर्शोधाची ९ वर्षे !!
X

दिनांक १२ ऑगस्ट २०१६ रोजी राज्यपाल विद्यासागर राव यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र राजभवनातील किमान तीन दशके बंद असलेल्या भुयाराचे पूर्वेकडील निर्गमन द्वार (Exit Gate) तोडण्यात आले. आणि आपण काय खोदत आहो, याचा काहीच अंदाज नसलेल्या कामगारांना तसेच उपस्थित पर्यवेक्षकांना धक्का बसला.

एक भव्य दिव्य परंतु गूढ ब्रिटिशकालीन भुयार (Underground British Era Bunker) कामगार व अधिकाऱ्यांच्या दृष्टीस आले. सर्वत्र अंधार. भुयारावरच्या हिरवळीतून वर्षानुवर्षे पाणी व माती झिरपल्यामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य. भुयारातून वाट कुठे जाते काहीच अंदाज नाही. काही खोल्या डावीकडे, काही उजवीकडे, मध्येच छोटेखानी जिने, वर पाहिले तर ठराविक अंतरावर हवेसाठी व प्रकाशासाठी झरोखे (Vents / Air Ducts). किमान तीस वर्षे बंद असल्यामुळे बंकरच्या प्रवेशद्वाराचे लोखंडी ग्रील गंजून गेले.



साधारणपणे १५० मीटर लांब या बंकरमध्ये विविध लहान मोठ्या आकाराच्या खोल्या, पॅसेजेस दिसत होते. तेथील कक्षांच्या बाहेर दारावर लावलेल्या पाट्यांच्या नावांवरून हे बंकर जुन्या काळातील संरक्षण व्यवस्थेचा भाग असल्याचे उघडपणे जाणवत होते.

शेल स्टोअर, गन शेल, कार्ट्रिज स्टोअर, शेल लिफ्ट, पंप, सेंट्रल आर्टिलरी स्टोअर, वर्कशॉप अशी कक्षांना नावे होती. आत शिरताना मोबाईल टॉर्च शिवाय इतर मार्ग नव्हता. सर्वत्र निसरडे असल्याने घसरून पडण्याची भीती. लाकडी दारे ओली होऊन इतकी खराब झाली होती की लाकडाचे लाडू वळता आले असते !

एक एक करीत १३ कक्ष प्रकाशात आले व शेवटी दगडी किल्ल्यासदृश वीस फूट उंच प्रवेश परिसर. त्या लगत थक्क करणारा रॅम्प व शेवटी दरबार हॉल कडे उघडणारे कमी उंचीचे प्रवेशद्वार दृष्टीस पडले. पहिल्या दिवशी कामगारांसोबत बंकरमध्ये जाणारे सां. बां. विभागाचे अधिकारी कृष्णा घोगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार बंकर मधील भिंतीला काही ठिकाणी सफेदी असल्यासारखी दिसत होती. भिंती बऱ्यापैकी सुस्थितीत होत्या. आश्चर्य म्हणजे पाण्याचा निचरा होण्याची व जमिनीवरून हवा येण्याची उत्तम व्यवस्था त्याठिकाणी होती.



राजभवनातील कर्मचारी अधिकारी त्यांचे कुटुंबीय भुयार सापडल्याची चर्चा करीत होते. एक एक समूह घोळक्याने येऊन 'नवा शोध' पाहत होते. राज्यपाल विद्यासागर राव हे त्यावेळी स्वातंत्र्यदिनासाठी पुणे येथे होते. त्यांना बंकर दाखविण्यापूर्वी विद्युत विभागाने तात्पुरती प्रकाश व्यवस्था केली.

दिनांक १६ ऑगस्ट रोजी राज्यपाल विद्यासागर राव यांनी सकाळी बंकर पहिले आणि लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलावून त्यांना राजभवनाखाली सापडलेल्या गूढ भुयाराबद्दल सांगितले व पाहण्यास बोलावले. त्याच दुपारनंतर मुख्यमंत्री आले व त्यांनी राज्यपालांसोबत बंकरची पाहणी केली.


इतक्या मोठ्या ऐतिहासिक ठेव्याचे रिस्टोरेशनचे काम हाती घेण्यात आले. तज्ज्ञांची मदत घेण्यात आली. रिस्टोरेशनचे काम मोठे होते. अनेक ठिकाणी होत असलेली पाण्याची गळती, झिरपणी थांबवणे आवश्यक होते. त्यासाठी बंकरवरचे लॉन पूर्ण काढावे लागले. ते काढल्यावर तोफांसाठी असलेले गन प्लॅटफॉर्म देखील दृष्टीपथात आले. बंकरमध्ये स्क्चट्रर कमजोर असल्याने काही ठिकाणी गर्डर टाकण्यात आले. त्यापूर्वी आयआयटी मुंबईच्या मदतीने बंकरचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. संवर्धन वास्तुविशारद विकास दिलावरी यांनी बंकरचा अभ्यास करून आपला अहवाल तयार केला.


अजगराचे वास्तव्य :

घोगरे यांच्या आठवणीनुसार बंकर मध्ये सुरुवातीला प्राण्याची विष्ठा सापडली. ती नेमकी कोणत्या प्राण्याची याचा शोध घेण्यासाठी ती हाफकिन इन्स्टिट्यूट येथे तपासणीसाठी पाठविण्यात आली. तेथून ती बंगलोर येथे पाठविण्यात आली. शेवटी ती विष्ठा अजगराची असल्याचे समजले. थोडक्यात, बंकर बंद असताना तेथे अजगराचे वास्तव्य होते. राजभवनात किमान दोनदा लोकांना अजगर दिसले आहेत. हे अजगर बंकरमध्ये वास्तव्यास होते हे उशिरा समजले !!


ऑडिओ व्हिजुअल म्युझियम

बंकरचा जीर्णोद्धार रिस्टोरेशन पूर्ण झाल्यानंतर तेथे आभासी वास्तवतादर्शक (Virtual Reality) संग्रहालय तयार केले गेले. त्यातून अभ्यागतांना तोफ चालविण्याचा आभासी अनुभव घेण्याची व्यवस्था करण्यात आली. राज्यातील गडकिल्ल्यांचा इतिहास तसेच राजभवनाचा इतिहास देखील या ठिकाणी दाखविण्याची व्यवस्था करण्यात आली. तोफांच्या प्रतिकृती व त्रिमितीय जवानांच्या आकृती देखील याठिकाणी ठेवण्यात आल्या.


या संग्रहालयातील अन्य कक्षामध्ये राजभवनच्या इतिहासाची झलक देखील दाखविण्यात आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिनांक १८ ऑगस्ट २०१९ रोजी बंकर येथे संग्रहालयाचे उदघाटन केले.

क्रांतिगाथा दालन

कालांतराने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या सूचनेनुसार त्या ठिकाणी स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या ज्ञात व अज्ञात क्रांतिकारकांचे दालन करण्याचे ठरले. लेखक व इतिहासकार डॉ विक्रम संपत यांच्या मार्गदर्शनाखाली दालन तयार करण्यात आले व दिनांक १४ जून २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दालनाचे उदघाटन केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील दिनांक ७ जुलै २०२३ रोजी दालनाची पाहणी केली.

पूर्वेतिहास:

विकास दिलावरी यांनी राजभवनातील बंकर ब्रिटिश गव्हर्नर जॉर्ज सिडनहॅम क्लार्क (१९०७-१९१३) यांनी आपल्या कार्यकाळात केले असावे, असे मत व्यक्त केले. 'राजभवन्स इन महाराष्ट्र' या सदाशिव गोरक्षकर यांनी लिहिलेल्या ऐतिहासिक ग्रंथानुसार सन १८२६ साली मलबार हिल येथे असलेल्या वास्तू व बांधकामाच्या यादीत 'गन प्लॅटफॉर्म' अस्तित्वात होते असे दिसून येते. गोरक्षकर यांनी बंकर उघडण्याच्या १५ वर्ष आधीच बंकरचे अचूक वर्णन केले आहे:

"The 1868 site plan shows a structure with five vents at the southern tip, seen even today. An underground passage leads from outside the Durbar Hall to the southern tip and after turning east opens below the Point bungalow - Jal Chintan. Quite likely the underground chamber served as an ammunition store and the gun was mounted on the gun-deck above, strategically located to keep a watch on the approach to the harbour."

मलबार हिल समुद्र किनारी वसलेले आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात किनाऱ्यावरील सुरक्षा बळकट करण्याच्या दृष्टीने मलबार हिल शिवाय मुंबईत अन्य सहा अन्य ठिकाणी 'कोस्टल बॅटरी'चा भाग म्हणून तोफा ठेवण्यात आल्या असल्याचे आढळते.

बंकरचा वापर कधी झाला का, ते समजायला मार्ग नाही. "सन १९७१ साली भारत पाकिस्तान युद्धाच्या अली यावर जंग यांचेसह आमचे संपूर्ण कुटुंब बंकरमध्ये दोन दिवस थांबले होते," अशी आठवण त्यावेळी राज्यपाल असलेले अली यावर जंग यांचे नातू फिरोज दुबाश यांनी अलीकडेच सांगितली.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कृष्णा घोगरे यांनी बंकरच्या भिंतीवर पेन्सिलने सावंत / शेख / १९८४ असे लिहिल्याचे पाहिल्याचे सांगितले. त्याअर्थी, बंकर १९८४ नंतर बंद केले असल्याचे लक्षात येते.


तोफाही सापडल्या

सन २०१८ साली राजभवनाच्या पश्चिम दिशेला खडकाळ भागात दोन अजस्त्र तोफा दुर्लक्षित स्थितीत सापडल्या. त्यांचे रिस्टोरेशन करून तोफा दर्शनी भागात ठेवण्यात आल्या. अशा प्रकारे नागरी वास्तुशास्त्राचा ऐतिहासिक वारसा व जुन्या काळच्या तोफा जमिनीखालून प्रकाशात आल्या ! आज १२ ऑगस्ट २०२५ रोजी बंकरच्या पुनर्शोधाला ९ वर्षे पूर्ण झाली.

Updated : 13 Aug 2025 2:54 PM IST
Next Story
Share it
Top