महायुतीचे ६८ नगरसेवक बिनविरोध ! काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल
X
मुंबई : राज्यातल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणूकांमध्ये सध्या प्रत्यक्ष मतदानाआधीच सत्ताधारी महायुतीनं आघाडी घेतलीय. कारण तब्बल ६८ जागांवर फक्त महायुतीचेच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. काँग्रेसनं या ‘बिनविरोध’ निवडणूकीवरुन भाजपविरोधात सोशल मीडियावर मोहीम उघडलीय. ‘बिनविरोध’ निवडणूक ही देखील मतांची चोरीच असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय.
भाजपनं ED, CBI चा धाक दाखवून अनेक इच्छुकांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावले आहेत. त्यामुळंच महायुतीचे तब्बल ६८ नगरसेवक एकही मत पडण्याआधीच निवडून आलेले आहेत. नामनिर्देशन पत्र माघारीच्या शेवटच्या दिवशी विरोधी उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात अर्ज मागे घेतल्याने महायुतीचे तब्बल ६८ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यांवर सत्ताधारी महायुतीकडून दबाव आणल्याचा आरोपही काँग्रेसनं केलाय. बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये भाजपचे ४४, शिवसेना (शिंदे) २२ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या २ नगरसेवकांचा समावेश आहे.
या बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये कल्याण-डोंबिवली, पुणे, पिंपरी-चिंचवड, पनवेल, भिवंडी, धुळे, जळगाव आणि अहिल्यानगर या महापालिकांचा समावेश आहे. या बिनविरोध निवडीनंतर भाजपच्या केशव उपाध्ये यांनी "भाजपची गती कायम आहे. महायुतीचे ६८ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. यात भाजपचे सर्वाधिक योगदान असल्याची पोस्ट केलीय. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यातील बिनविरोध विजयाला पक्षाच्या कामगिरीचे प्रमाणपत्र म्हटले असून, पुण्याचा पुढचा महापौर भाजपचाच असेल, असा दावा केला.
मात्र, या घडामोडींवर विरोधी पक्षांनी तीव्र हल्लाबोल केला आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटले, "फक्त महायुतीचेच उमेदवार बिनविरोध का? यात पैसा आणि सत्तेचा दबाव आहे. काही प्रकरणांत निवडणूक अधिकारी चुकीचे निर्णय देत आहेत. निवडणूक आयोगाने याची चौकशी करावी." काँग्रेसचे इतर नेते आणि महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनीही निवडणुकीत तक्रारींचा पूर आला असून, सत्ताधारी पक्ष मुक्त व निष्पक्ष निवडणुकीची अपेक्षा धाब्यावर बसवत असल्याचा आरोप केला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी याला "लोकशाहीची हत्या" म्हटले. ते म्हणाले, "विरोधी उमेदवारांना ५ कोटी रुपयांपर्यंत ऑफर देऊन किंवा ईडी-सीबीआयच्या धमकीने अर्ज मागे घ्यायला लावले जात आहे. अटल बिहारी वाजपेयी, वसंतदादा पाटील किंवा नरेंद्र मोदीसुद्धा बिनविरोध निवडून आले नव्हते. महाराष्ट्रात नवीन परंपरा सुरू झाली आहे." त्याचबरोबर शिवसेना (यूबीटी) खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी निवडणूक आयोग निवडणुकीत गप्प का ? असा सवाल उपस्थित केला. मनसेनेही यावर आक्रमक भूमिका घेत कोर्टात जाण्याची घोषणा केली असून, नोटा पर्याय असतानाही बिनविरोध निवडी का, असा प्रश्न विचारला आहे.या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने बिनविरोध निवड झालेल्या सर्व जागांवर सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दबाव किंवा आमिष दाखवून अर्ज मागे घेतले गेले का, याची तपासणी होणार असून, चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध विजयी उमेदवारांची अधिकृत घोषणा होणार नाही. आयोगाने संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागवला आहे.१५ जानेवारीला होणाऱ्या मतदानापूर्वीच महायुतीला मिळालेल्या या आघाडीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विरोधकांचे आरोप आणि आयोगाची चौकशी यामुळे निवडणुकीच्या रणधुमाळीत नवीन वाद निर्माण झाला आहे. पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






