Home > रिसर्च > ग्रामिण महिलांच्या मुलभूत समस्या आणि उपाय

ग्रामिण महिलांच्या मुलभूत समस्या आणि उपाय

ग्रामिण महिलांच्या मुलभूत समस्या आणि उपाय
X

जगातील सर्वच समाजात स्त्रीचे अस्तित्व महत्वाचे आहे. तिच्याशिवाय पर्याय नाही असे उर्दूतील प्रसिद्ध कवी अलामा इकबाल यांनी म्हटले आहे.

वजुदे जन से है तस्वीरे कायनात मे रंग

परंतु तरीही जगभरात आपल्याला स्त्री-पुरुष समानता आढळत नाहीत. अगदी वेषभुषा, केशभुषा यामध्येच फरक आढळतो असं नव्हे तर त्यांच्या इच्छा-आकांक्षा, हक्क-कर्तव्य, त्यांचा दर्जा - भूमिका यामध्येसुद्धा फरक करण्यात आला आहे.

आपल्या भारतीय व्यवस्थेला सुमारे 5000 वर्षांचा इतिहास आहे. आणि तेव्हा पासूनच आपल्या व्यवस्थेने पुरुषांना स्त्रियांपेक्षा श्रेष्ठ ठरवूंन त्यांना अनेक हक्क बहाल केले आहेत. व त्याचवेळेस स्त्रियांना मात्र कनिष्ठ दर्जा दिला व या हक्कापासून वंचित ठेवले. व त्याचा परिणाम म्हणजे स्त्रियांवरील होणारे अत्याचार.

कुटुंब- कुटुंब एकत्रित असो किंवा विभक्त. केंद्रस्थानी पुरुषच असतो. कुटुंबप्रमुख म्हणून पुरुषच असतो. त्या कुटुंबामध्ये महत्वाचे निर्णय तो पुरुष घेत असतो. कुटुंबातील मुलीचे विवाह झाल्यानंतर तिला पतीच्या घरी जावे लागते. म्हणजेच भारतीय कुटुंबव्यवस्थेमध्ये स्त्रीला नगण्य स्थान आहे. भारतीय समाज पुरुषप्रधान आहे. पितृसत्ताक व्यवस्थेमुळे कुटुंबामध्ये मुलाचा जन्म झाल्यास जितका आनंद होतो तितका आनंद मुलगी झाल्यास होतोच असा नव्हे. काही कुटुंबाबामध्ये तर चिंतेचं वातावरण असते. याला कुटुंबातील स्त्रियासुद्धा अपवाद नसतात. यामुळेच स्त्रीभूण हत्येचे प्रमाण चिंता वाटावी इतके अधिक आहे. काही आकडेवारी नुसार १९०१साली दर हजार पुरुषामागे ९७२ स्त्रिया होत्या ते प्रमाण १९११ साली ९२७ पर्यंत घसरले होते. २०११साली स्त्रियांचे प्रमाण प्रत्येक हजार पुरुषामागे स्त्रियांचे प्रमाण ९४० इतके पोहोचले होते. आज स्त्रियांचे घटते प्रमाण ही देशापुढची एक महत्वाची समस्या बनली आहे.

विवाह- भारतीय समाजात मुलींचा विवाह लवकर केला जाई. आज सुद्धा बऱ्याच भारतीय कुटुंबामधून मुलीचा विवाह लवकर करण्याचा कल आहे. पूर्वीच्या काळी भारतात बालविवाह केले जात असत. त्याचा परिणाम या लहान मुलींचा बाळंतपणात मृत्यू होत असे. बऱ्याचवेळेस दुर्दैवाने नवऱ्याचा मृत्यू झाल्यास बालविधवा म्हणून त्या कुटुंबात आयुष्य काढावे लागे. त्यावेळेस या दुर्दैवी मुलींना कुटुंबामध्ये अनेक प्रकारे त्रास भोगावे लागत असत. भारतामध्ये पूर्वी सती प्रथा होती. त्यामुळे या स्त्रीस एक तर सती जावे लागत असे किंवा कुटुंबातीलच पुरुषांच्या भोगाची वस्तू म्हणून कुटुंबात राहावे लागत असे. आधुनिक भारतामध्ये खेड्यातून आजही काही प्रमाणात मुलीचा विवाह लवकर केला जातो. आधुनिक भारतात राजस्थानमध्ये एका विधवेस सती जाण्यासाठी सक्ती केल्याचे उदाहरण आहे. आजही भारतामध्ये स्त्रियांचे शिक्षण ही समस्या आहे. २०११ सालच्या जनगणनेनुसार पुरुषांचे शिक्षणाचे प्रमाण ८२% असून स्त्रीचे प्रमाण ६५% इतके आहे. ग्रामीण भारतात मुलांच्या शिक्षणाकडे ज्या प्रमाणात पालक लक्ष देतात त्या प्रमाणात मुलीकडे दिले जात नाही. मुलींच्या आरोग्याकडे सुद्धा नीट लक्ष दिले जात नाही. अगदी कुटुंबातील स्त्री आणि पुरुष यांच्या आहाराकडे सुद्धा भेदभाव केला जातो. कुटुंब नियोजनाच्या वेळी बऱ्याचवेळेस हे नियोजन स्त्रीलाच करावे लागते. उदा. तांबी बसविणे, निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया. बऱ्याच वेळेस गर्भपात अथवा गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने स्त्रीला तिच्या आरोग्यावर दुष्परिणाम भोगावे लागतात.

श्रम विभाजन - हल्ली सर्व समाजातील स्त्रिया घरातून बाहेर पडून अर्थार्जन करीत असून आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावीत आहेत. याला कोणतेही कुटुंब अपवाद नसेल. महत्वाचा फरक म्हणजे स्त्री अर्थार्जन करीत असताना कौटुंबिक जबाबदारी देखील पार पाडत असते. त्यापासून तिची सुटका नसते. यामुळे कुटुंबातील पुरुषापेक्षा तिला मानसिक आणि शारीरिक त्रास अधिक असतात. शारिरीक आणि मानसिक थकवा जाणवणे, शरीरातील रक्त कमी होणे, किंवा रक्तस्त्राव वाढणे, पाठ व कंबर दुखणे असे आजार होतात.

मालमत्ता - स्त्रिया कमवू लागल्या तरीही त्यांच्या स्वतःच्या कमाईवर त्यांची मालकी असतेच असे नाही. अनेकवेळा त्यांची कमाई ही पतीच्या किंवा वडिलांच्या हवाली करावी लागते. तिच्या उत्पनातून घेतलेले घर वा इतर वस्तूवर तिचा अधिकार अथवा मालकी असतेच असे नाही.

हुंडा पद्धत - भारतामध्ये पूर्वापार हुंडा पद्धत अस्तित्वात आहे. भारतातील प्रत्येक प्रांतात, जातीत अगदी धर्मात सुद्धा आजदेखील ही प्रथा मूळ धरून आहे. या प्रथेचे रूपांतर वैवाहीक जीवनामध्ये एका भयानक समस्येत झाले आहे. प्रामुख्याने स्त्री याचा बळी ठरत आहे. यासाठी जाती व्यवस्था, कुळी-घराण्यातील पद्धत, धार्मिक कारण, सामाजिक अनुकरण, सुयोग्य भरपाई, संसारास मदत, रूढी परंपरा, मुलींमधील कमतरता (कमी शिक्षण, सौंदर्य इ )आदी करणे दिली जातात .

वैवाहिक जीवन - स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवीत आहेत. त्याच बरोबर कौटुंबिक जबाबदाऱ्या देखील समर्थपणे पार पाडत आहेत. स्त्रिया घराबाहेर यशस्वी ठरत असतील तर त्यांचे ते यश मोठ्या आनंदाने मान्य करण्याऐवजी त्यांच्या मनात संशय बळावतो व त्यातून घरामध्ये कलह निर्माण होतो. व या कलहाची पहिली बळी ही स्त्रीच असते.

पुरुषांची व्यसनाधिनता - अनेक कुटुंबाबतील पुरुष व्यसन करित असतात. पुरुष असल्याने त्यांना याचा जाब विचारला जात नाही. कुटुंबप्रमुख म्हणून त्यांनी व्यसन करणे ग्राह्य धरले जाते. परंतु या व्यसनामुळे कुटुंब उध्वस्त होत असते कधी कधी कुटुंबातील स्त्रीला मानसिक त्रास शारीरिक इजा होते. कालांतराने त्याच स्त्रीला कुटुंबाची जबाबदारी घ्यावी लागते. परंतु या वाताहतीला जबाबदार असण्याऱ्या पुरुषाला मात्र कोणी बोल लावत नाही.

अपत्य न होणे - एखाद्या दाम्पत्याला अपत्य न होणे यामध्ये पती-पत्नी यापैकी कुणामध्ये तरी दोष असू शकतो. मात्र आजही स्त्रीलाच जबाबदार धरले जाते. वैद्यकीय दृष्ट्या ती स्त्री जबाबदार नसली तरीही कुटुंबात, समाजात तिच्याकडे वांझ म्हणून पाहिले जाते. याची ती कुठेही वाच्यता करू शकत नाही. तसेच एखाद्या दाम्पत्यास फक्त मुलीच झाल्या तरीही त्या स्त्रीस जबाबदार ठरविले जाते. काही वेळेस पुरुष वैद्यकीय दृष्ट्या नपुसंक असतो मात्र त्याचे खापर पुन्हा फक्त स्त्रीवरच फोडले जाते. व ही बाब त्या स्त्रीला कायम लपवून ठेवावी लागते.

प्रेमविवाह - आधुनिक भारत खूप पुढारलेला आहे असे आपण कितीही म्हटले तरीही आजही प्रेमविवाह सहज मान्य केला जात नाही. त्यातही परधर्मीय, आंतरजातीय, आंतरप्रांतीय विवाह होताना कुटुंबातून प्रखर विरोध दिसून येतो. तिला घरामध्ये कोंडून ठेवले जाते. ती शाळा-महाविद्यालयात शिकत असेल तर तिचे शिक्षणदेखील थांबवले जाते. व तिचा विरोध डावलून आपल्या जाती-धर्मातील मुलाशी विवाह लावला जातो. एखाद्या मुलीने असा विरोध झुगारून स्वतःच्या इच्छेने विवाह केला तर त्या मुलीस बऱ्याचदा आपले घर कायमच मुकावं लागतं. हल्ली तर आपण "ऑनर किलिंग" सारखे प्रकार वाढलेले पाहतो.

लैंगिक अत्याचार - पत्नीच्या इच्छिविरोधात संभोग करणे असले अनैतिक प्रकार बऱ्याच कुटुंबामध्ये घडत असतात. पत्नीला अनैसर्गिक कृत्य करण्यास जबरदस्ती करणे किंवा अनैसर्गिक संभोग करणे, अशील फोटो काढणे आदी घटना कुटुंबात घडतात. प्रत्येकवेळेस स्त्री बळी ठरत असते.

अशा प्रकारे भारतीय समाजातील स्त्री कौटुंबिक आणि सामाजिक अत्याचारांना बळी ठरत असते. यासाठी काही उपाय योजना राबवता येतील.

कायदेशीर उपाय योजना

१) कौटुंबिक हिंसाचारातून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 हा कायदा 26 ऑक्टोबर 2006 पासून लागू करण्यात आला आहे. या कायदान्वये एक वर्षाची कैद आणि २०,००० रुपये दंड होऊ शकतो.

2) भारतीय दंड संहितेच्या कलम 498 (अ) नुसार हुंडा किंवा अन्य हिंसाचार करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली जाते

3) महिला संघटनाची स्थापना करून स्त्री शक्ती द्वारे पीडित महिलांना मदत करता येते

4) जनजागृती- सरकार, अशासकीय संघटना, समाजसेवक, कार्यकर्ते आदी महिला हिंसाचाराच्या विरोधात लोकांमध्ये प्रसारमाध्यम द्वारे जाणीव आणि जागृती निर्माण केले जाऊ शकते. यासंदर्भात (बेल बजाओ) अशा प्रकारची योजना किंवा ठराविक नंबरवर फोन करणे असे उपक्रम घेतले जातात.

उस्मानाबाद शहरात डॉ. स्मिता शहापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांची प्रगती व अत्याचार, बेटी बचाओ असे कार्यक्रम SUNDAY CALTURAL या संघटनेद्वारे दर महिन्याच्या दुस-या रविवारी आयोजित करण्यात येतात. चांगल्या कामगिरी करणा-या महिलांचा सत्कार तर पीडित महिलांचे प्रश्न हाताळण्याचे काम हे मंडळ करते मी ही याची सदस्य आहे.

5) सरकारनं हुंडाप्रतिबंधक कायदा संमत केलेला आहे. हुंडा देण्या-घेण्यास प्रोत्साहन देणा-या व्यक्तींना 5 वर्ष कैद 15,000 रू दंडची शिक्षा होऊ शकते.

6) कलम 306 नुसार पतीने किंवा नातेवाईकांनी छळ करणे गुन्हा ठरतो.

7) कलम 498 (अ) नुसार पतीने किंवा त्याच्या नातेवाईकांनी विवाहित स्त्रीचा शारिरीक किंवा मानसिक छळ केल्यास 2 वर्ष कैद व दंडाची शिक्षा होऊ शकते.

8) आर्थिक स्वावलंबन-मुलींना उच्च शिक्षण देणे. पायावर उभे करणे म्हणजे आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवून त्यांचा विवाह करणे

9) ACT 1956 नुसार स्त्रीला कुटुंबाच्या मालमत्तेत वाटा देण्यात आला आहे.

10) ACT 1991 नुसार गर्भवती स्त्रीला मुल नको असल्यास 12 आठवड्याच्या आत गर्भपात करवून घेता येतो.

11) ACT 1955-56 नुसार बालविवाहास बंदी व पुनर्विवाह करता येतो

12) कलम 19 नुसार पुरुषाप्रमाणे स्त्रियांनाही व्यवसाय स्वातंत्र्य दिले आहे.

13) कलम 45 नुसार 14 वर्षापर्यतच्या सर्व मुला मुलींना मोफत शिक्षण दिले जाते. पालकांनी मुलींना अवश्य शिकवावे

14) कलम 14 ते 18 नुसार सर्वाना समतेचा हक्क आहे

डॉ. सय्यद तबस्सूम सुलताना

( लेखिका स्वतः राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षिका आहेत. तसंच ग्रामिण महिलांच्या स्थितीबाबत त्यांनी संशोधन केले आहे. )

Updated : 2 Feb 2017 8:03 PM GMT
Next Story
Share it
Top