Home > मॅक्स ब्लॉग्ज > अग्रलेख > महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘कॅटॅलिस्ट’

महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘कॅटॅलिस्ट’

महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘कॅटॅलिस्ट’
X

2014 मध्ये देशात सत्तांतर झालं यामध्ये महत्वाचा वाटा नरेंद्र मोदीं इतकाच अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांचाही राहिलाय. 2009 च्या निवडणूकांमध्येही काळा पैसा हाच प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा होता. स्वीस बँकेतील अकाऊंट, काँग्रेसच्या नेत्यांनी जमवलेली अमाप माया, भ्रष्टाचार इ.इ. मुद्द्यांनंतरही 2009 मध्ये जनतेने युपीए ला पसंती दिली.

या सर्व बाबींची बारिक कारण-मिमांसा केली तर लक्षात येतं की 2009 मध्ये जनतेला भारतीय जनता पक्ष पर्याय वाटत नव्हता. मग असं काय घडलं की 2014 मध्ये अचानक भारतीय जनता पक्षाला लोकांनी भरभरून मतदान केलं? 2014 च्या निवडणूका देशभरातील अभूतपूर्व अशा इंडिया अगेन्स्ट करप्शन च्या पार्श्वभूमीवर होत होत्या. नरेंद्र मोदींचा राष्ट्रीय राजकारणात उदय होत असतानाच देशातील राजकीय जमीन नांगरून ठेवायचं काम अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांनी केलं होतं. कॅटॅलिस्ट म्हणजे उत्प्रेरक. कॅटॅलिस्ट रासायनिक प्रक्रिया घडवून आणण्यासाठी काम करतं, मात्र त्या कॅटॅलिस्ट-उत्प्रेरकाचे स्वत:चे गुणधर्म बदलत नाहीत. अण्णा-केजरीवालांनी नेमकं हेच केलं.

काँग्रेसप्रमाणेच भारतीय जनता पक्ष ही दुर्गुणांनी माखलेला एक पक्ष आहे ही सामान्य लोकांची भावना होती. मात्र इंडिया अगेन्स्ट करप्शन चा झालेला उदय, त्याच काळात कॅग ने काँग्रेस सरकारची केलेली अडचण, भ्रष्टाचाराची रोज बाहेर पडणारी प्रकरणे या सर्वांमुळे दात सत्तापरिवर्तनच नव्हे तर क्रांती होण्याची गरज अनेकांना वाटू लागली होती. यातूनच आप ची राजकीय चळवळ जन्माला आली, इंडिया अगेन्स्ट् करप्शन ची वाताहात झाली. शेवटी बुडणारा माणूस भक्कम आधार शोधत असतो. आप हा काही भक्कम आधार नाही हे लोकांच्या लक्षात आलं होतं आणि त्याचमुळे भाजपचा मार्गही मोकळा झाला. इतर कुठल्याही प्रमुख विरोधी पक्षापेक्षाही जास्त मिडीया कव्हरेज आप ला मिळालं. आपची प्रासंगिकता अजूनही कायम आहे.

महाराष्ट्रात आज 2018 च्या सुरूवातीलाच अशी परिस्थिती दिसून येतेय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरी गतीमान सरकार, आपलं सरकार असं आपलं ब्रँडींग केलेलं असलं तरी हे सरकार त्या वेगाने पुढे जात नाहीय. नरेंद्र मोदी पूर्ण फॉर्म मध्ये असतानाही राज्यात 50 टक्के पेक्षा जास्त जागा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात निवडून आल्या आहेत. त्यानंतरच्या विविध निवडणूकांमध्ये भारतीय जनता पक्षाने आयात धोरण स्वीकारून उमेदवार निवडून आणलेयत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची खरी ताकत आणि निवडून आलेली ताकत यामध्ये तफावत नेहमीच दिसणार आहे. निवडून आलेली ताकत हीच खरी ताकत मानून जर राजकीय विश्लेषण करायचा प्रयत्न केला तर भारतीय जनता पार्टी नेहमीच अजेय वाटेल. वास्तविकता मात्र तशी नाहीय. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस किंवा इतर पक्षांमधून मोठ्या प्रमाणात लोक भारतीय जनता पक्षात गेले आहेत. हे सर्व लोक एकतर आपल्या केसेस पासून संरक्षण मिळावे म्हणून, जिंकण्याची खात्री आहे म्हणून, राजकीय सोय म्हणून किंवा अशाच काहीशा राजकीय कारणांमुळे भारतीय जनता पक्षा सोबत आहेत. भाजपाची राजकीय विचारधारा पटलीय म्हणून सोबत आलेले हे लोक नाहीत. त्यामुळे भरतीला चढणारं पाणी ओहोटीला तितकंच आत जाऊ शकतं, ते ही निमिषार्धात हा सृष्टीचा नियम आहे.

राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसने आणि काही प्रमाणात शिवसेनेनं भारतीय जनता पार्टीला अडचणीत आणण्यासाठी मोर्चे बांधणी केली आहे. मात्र मला हे पक्ष 2009 च्या निवडणूकीतील लालकृष्ण अडवाणींसारखे वाटतात. ते लढू शकतात, जिंकू शकत नाहीत. लोकांचा या सर्व पक्षांवरचा विश्वास उडाला आहे. अशा वेळी त्यांनी केलेला संघर्ष, हल्ला याकडे लोक सहानुभूतिपूर्वक जरी बघत असले तरी मतदानाच्यावेळी दगडापेक्षा मऊ असलेल्या वीटेलाच पसंती दिली जाते. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस लोकांच्या मनातून उतरले आहेत. अशा वेळी भाजपाला वाट कठीण असली तरी सध्या या पक्षाला धोका नाहीय.

अशा वेळी अरविंद केजरीवाल यांची महाराष्ट्रात एन्ट्री होत आहे. अरविंद केजरीवाल या आधीही अनेक वेळा राज्यात आले होते, मात्र यावेळेस त्यांचं येणं पूर्णत: राजकीय आहे, आणि एका गंभीर राजकीय अजेंड्यानिशी ते राज्यात येतायत. आप ने राज्यातील जातीय समिकरणांचा बारिक अभ्यास करून रणनिती बनवलीय. जिजाऊंना अभिवादन करून केजरीवाल राज्यातल्या राजकीय लढाईला सुरूवात करतील. केजरीवालांचा पक्ष याआधी भाजपच्या गुडबुक्स मध्ये होता. सध्या ही आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आप जास्त सॉफ्ट आहे असा आप वर आरोप होत असतो. यंदा मात्र परिस्थिती वेगळी आहे. आप जरी भाजपाच्या गुडबुक्स मध्ये असला तरी सध्या हा पक्ष कॅटॅलिस्टसारखं काम करेल असं दिसतंय. आप पक्ष वाढण्यासाठी जितके प्रयत्न करेल तितका भारतीय जनता पार्टीला त्रासच होईल.

आप साठी मात्र महाराष्ट्रात पाय रोवणं तितकं सोप्पं नाहीय. आपला स्थानिक नेतृत्वामध्ये गुंतवणूक करावी लागणार आहे. जातीय समीकरणं लक्षात घेऊन जरी पक्षाने आपली रणनिती बांधायचं ठरवलं असलं तरी ही दुधारी तलवार आहे. ती आप ला पेलवेल असं वाटत नाही. राज्याला सध्या विरोधी पक्षाची गरज आहे. ज्याची राजकीय ताकद कमी असली तरी न्युसंस व्हॅल्यु जास्त असेल असा पक्ष. ज्या पक्षाच्या नेत्यांवर बॅगेज नाही, आरोप नाहीत, घोटाळे नाहीत. जो पक्ष ही जागा घेईल तो पक्ष छोटा असला तरी मोठा चमत्कार करू शकतो. सध्या आप मध्ये ती ताकद दिसतेय.

रवींद्र आंबेकर

Updated : 10 Jan 2018 5:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top