Home > Election 2020 > वारे कुठल्या दिशेला वाहतायत...

वारे कुठल्या दिशेला वाहतायत...

वारे कुठल्या दिशेला वाहतायत...
X

किरीट सोमय्या यांचं तिकीट पक्षाने कापलं, किरीट सोमय्या पत्रकार परिषद घेऊन ज्याला तिकिट मिळालं त्या मनोज कोटक मोठ्या बहुमताने विजयी होईल म्हणून सांगतात, तिकडे शिवसेना भवनातून सर्व प्रवक्त्यांना ९ तारखे पर्यंत कोणी किरीट सोमय्या विषयावर बोलायचं नाही अशा आदेशवजा सूचना जातात. शिवसेना प्रतिक्रिया देत नाही, पण किरीट सोमय्या यांच्या तिकिट-कटामागे शिवसेनाच आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. मुद्दा हा आहे, की सर्व शक्तीमान असलेला भाजपा शिवसेनेसमोर का झुकला... हे संपूर्ण प्रकरण वारे कुठल्या दिशेला वाहतायत याचं निदर्शकच आहे.

किरीट सोमय्या यांचं तिकिट कापल्यानंतर शिवसेना किती प्रभावी आहे याची उजळणी होतय. मला या निमित्ताने आधी किरीट सोमय्या यांच्या कर्तृत्वाची उजळणी करणं महत्वाचं वाटतं. मुंबई महापालिकेच्या निवडणूकीदरम्यान किरीट सोमय्या यांना पक्षाने पूर्ण सूट दिली होती. त्याअनुसार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर प्रखर हल्ला चढवला. उद्धव ठाकरे यांच्या परिवाराच्या आर्थिक हितसंबंध आणि व्यवहारांवर किरीट सोमय्या यांनी हल्ला चढवायला सुरूवात केली. मुंबई महापालिका कसं भ्रष्टाचाराचं केंद्र बनलंय यावर किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदा घेतल्या. ईडी पासून इतर तपास यंत्रणांनी ठाकरे परिवाराच्या व्यवहारांची चौकशी करायला पाहिजे अशी सोमय्या यांची तेव्हा भूमिका होती.

शिवसेनेच्या नेत्यांशी संबंधित सहा कंपन्यांवर किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले होते. शिवसेना-भाजपाची युती होत असताना ज्या महत्वाच्या अटी शिवसेनेच्या होत्या त्यात किरीट सोमय्या यांचं तिकीट कापणं ही महत्वाची अट होती. भाजपाने शिवसेनेची ही अट मान्य केली. त्याचप्रमाणे यंदा फार खळखळ न करता युती करून टाकली. याचाच अर्थ वारे बदलले आहेत. भाजपाला बदलत्या परिस्थितीत एकेक जागा महत्वाची आहे. मोदी लाटेत भाजपाने कोण नाराज होतंय आणि कोण काय बोलतंय याकडे लक्ष दिलं नव्हतं. मित्रपक्षांना अपमानास्पद वागणूक दिली. त्या अपमानाचा जितका त्रास मीडियाला झाला तितका तो मित्रपक्षांना झाला नाही. कसंही करून सत्तेत राहायचं यासाठी मित्रपक्षांचा आटापिटा सुरू होता. कारण मोदी, पॉवरफुल होते. शक्तीमान होते, मात्र या लोकसभा निवडणूकीच्या आधी स्वतः मुख्यमंत्री सर्व मित्रपक्षांना भेटून समजवत होते. साहजिकच सर्व सर्वेक्षण भाजपाला असं करायला भाग पाडत होते. वाऱ्याची दिशा बदलत होती, त्यात किरीट सोमय्या यांचा बळी जाणं भाग होतं.

किरीट निवडणूक लढणार नसले तरी भाजपाचीच एक सीट पाडण्यासाठी ते काम करतील अशी शक्यता कमी आहे. किरीट सोमय्या यांच्याकडे आता काम करण्यासाठी बरंच काही आहे. शिवसेनेच्या नेत्यांच्या कंपन्या, मातोश्रीचे व्यवहार, ठाकरे परिवाराचे आर्थिक हितसंबंध यावर त्यांनी जे मुलभूत काम केलं आहे, त्या कामावर त्यांनी आता लक्ष द्यायला हवं. न खाऊंगा न खाने दूँगा या नरेंद्र मोदींच्या ब्रीदवाक्यासाठी किरीट सोमय्या यांना आता मुलभूत स्वरूपाचं काम उभं करता येईल. किरीट सोमय्या सिलेक्टिव्ह काम करतात. त्यांनी सदैव भाजपातील त्यांच्या सहकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराकडे कानाडोळा केला आहे. त्यांचे स्वतःचे आर्थिक व्यवहार ही संशयास्पद असल्याचं बोललं जातं. त्यांचं सत वसई-विरार पट्टयात वावरणं मधल्या काळात चर्चेला विषय होता. अशा ही परिस्थितीत भ्रष्टाचारावर ( दुसऱ्यांच्या ) बोलणारे जे काही थोडे-थोडके लोक आहेत त्यात सोमय्या आहेत. आता मिळालेला मोकळा वेळ त्यांनी सत्कारणी लावायला हवा. काळ-वेळ-वारे सगळंच बदलू शकतात.

Updated : 4 April 2019 6:10 AM GMT
Next Story
Share it
Top