Home > रवींद्र आंबेकर > सर्जिकल स्ट्राइकचा राजकीय फायदा कुणाला?

सर्जिकल स्ट्राइकचा राजकीय फायदा कुणाला?

भारतीय वायुसेनेने पाकिस्तानच्या हद्दीत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याच्या बातम्या आल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांमध्ये चुळबूळ सुरू झाली. या कारवाईवर काय प्रतिक्रीया द्यायची इथपासून ऐन निवडणूकीच्या तोंडावर करण्यात आलेल्या या धाडसी कारवाईचा राजकीय अन्वयार्थ कसा निघेल इथपर्यंत दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. आजच्या दिवसात या कारवाईबद्दल कुणीही काही बोललं तर त्याला देशद्रोहाचं सर्टीफिकेट आपसूक मिळणार आहे. त्यामुळे गल्ली ते दिल्ली या हल्लाच्या राजकीय प्रतिक्रीयेबाबत असलेला संभ्रम राहुल गांधी यांनी तोडला आणि भारतीय वायुसेनेच्या पायलट ना सॅल्यूट केला. राहुल गांधींचं एका ओळीचं ट्वीट राजकीय स्टेटमेंट म्हणून पाहता येईल..

राहुल गांधी यांच्या ट्वीट नंतर मग सर्वच राजकीय पक्षांनी या सर्जिकल स्ट्राइकचं स्वागत केलं. मागच्या सर्जिकल स्ट्राइकवर संशय व्यक्त केल्यामुळे ट्रोल झालेल्या संजय निरूपम यांनी ही सैन्याचं अभिनंदन केलं. मागच्या सर्जिकल स्ट्राइकच्या वेळी विरोधी पक्षांमध्ये जनमताचा अंदाज नव्हता त्यामुळे त्यांना भाजपाचे ट्रोल्स, सोशल मिडीया वरचा आउटक्राय आणि सामान्य लोकांमध्ये असलेला संताप यांचा वेध घेता आला नाही, आणि ते स्वत:च्या ट्रॅप मध्ये फसले.

यंदाची स्थिती तशी बरीचशी क्लिअर होती. सर्वच विरोधी पक्षांना काय होणार आहे याचा अंदाज होताच, त्यामुळे प्रतिक्रीया काय द्यायचं हे जवळपास पक्कं होतं, त्यामुळे यंदा पाकिस्तान वर झालेल्या सर्जिकल स्ट्राइकचा बळी इथले राजकीय पक्ष ठरले नाहीत. तरी सुद्धा चाळीस पैसे वाले ट्रोल्स पत्रकारांच्या टाइमलाइनवर जाऊन वातावरण गरम करायचा प्रयत्न करत होते.

जवळपास सर्वच माध्यमांनी गेल्या काही महिन्यांपासून युद्धज्वर पोसला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारत राजकीय मुत्सद्देगिरी दाखवणार की थेट प्रत्युत्तर देणार याचा अंदाज सर्वांनाच होता. निवडणूकांचं प्रेशर सर्वच राजकीय पक्षांवर असल्याने तसं प्रेशर भाजपावरही जास्त आहे. त्याचमुळे पुलवामा हल्ल्यानंतर काँग्रेसने सरकार सोबत राहण्याची जाहीर भूमिका घेतली. थोडा काळ गेल्यानंतर काँग्रेसने सरकारच्या अपयशांवर प्रश्न विचारायला सुरूवात केली.

आजच्या घडीला सरकारच्या अपयशांच्या बाबतीत प्रश्न विचारणं म्हणजे थेट पाकिस्तानच्या अजेंड्याला मदत करणं, देशद्रोही वागणं असं सरळ समिकरण जोडलं गेलेलं असल्यामुळे कुणाला काही बोलण्याची संधीच उपलब्ध नाही. लोकशाहीतील विरोधाची भूमिका या युद्ध ज्वरात कुणी समजून घेताना दिसत नाही, आणि अशा वातावरणात लोकानुनय करण्याशिवाय राजकीय पक्षांना पर्याय राहत नाही. सध्या सर्व राजकीय पक्ष तेच करताना दिसतायत.

मोदी किती प्रभावी

विकास, रोजगार, अर्थव्यवस्थेवरील दबाव, आर्थिक क्षेत्रातला घाईघाईने घेतलेले आर्थिक निर्णय अशा विविध पातळ्यांवर मोदी सरकारवर प्रचंड टीका होत आहे. नुकत्याच झालेल्या निवडणूकांमध्ये जनतेच्या रोषाचा प्रत्यय ही आला. त्यामुळे मोदी निवडणूकांच्या आधी छोटं युद्ध करू शकतात असा आरोप त्यांच्यावर काही राजकीय नेत्यांनी वारंवार केलेला आहे.

या पार्श्वभूमीवर बॅकफूटवर गेलेल्या मोदी यांना पुलवामाच्या निमित्तानं नव्यानं रणनिती आखायला मिळाली. आता पाकिस्तानला धडा शिकवण्याची जनतेतूनच मागणी होऊ लागली आणि त्यापद्धतीने सरकारची पावले पडायला सुरूवात झाली. ज्या पद्धतीची वातावरणनिर्मिती विविध वृत्तवाहिन्या आणि प्रसार माध्यमांनी तयार केली होती, ते पाहता पाकिस्तानला थेट प्रत्युत्तर दिलं जाईल हे स्पष्ट झालं होतं. सर्जिकल स्ट्राइक नंतर पुन्हा एकदा याचा राजकीय फायदा मोदी घेऊ शकतात असं चित्र स्पष्टपणे दिसायला लागलं. मोदींच्या रॅलींमधील, तसंच जाहीर समारंभांमधील भाषणांमध्ये त्यांनी आवर्जून हा मुद्दा आणला. लोकांमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी ‘आजका दिन खास हैं’ हे वाक्य त्यांनी आवर्जून उच्चारलं आहे. देश सुरक्षित हातात आहे हे सांगून त्यांनी हात जोडून नमस्कार ही केलाय. त्यामुळे मोदींचा अजेंडा अतिशय साफ आहे. सर्जिकल स्ट्राइकचा फायदा होणार नसेल तर दुसरा अजेंडा म्हणून राममंदिर पुढं आणलं जाईल, हे ही स्पष्टपणे दिसतंय.

सध्या देशाचा मूड हा मोदी लाटेचा नाहीय, मात्र असं असलं तरी तो काँग्रेस लाटेचाही नाहीय. त्यामुळे भावनात्मक मुद्दे पुढे आले तर मोदींना शक्ती मिळणार आहे, पण अगदीच 2014 सारखी स्थिती पुन्हा होणार नाही.

काँग्रेसला बेरोजगारीचा मुद्दा लोकांमध्ये घेऊन जायचंय हे आता स्पष्ट दिसतंय. गरीबी, बेरोजगारी हे काँग्रेसचे जुनेच विषय आहेत. इतक्या वर्षाच्या शासनात काँग्रेसला काही लोककल्याणकारी योजनांच्या पुढे जाऊन ठोस काही पावलं उचलता आलेली नाहीयत. फायदा एकच, काँग्रेसचा चेहरा बदललाय. अगदीच स्पर्धेतून बाद झालेल्या काँग्रेसला राहुल गांधींनी स्पर्धेत जरूर आणलंय.

सर्जिकल स्ट्राइकवर राहुल गांधींनी जी भूमिका घेतलीय त्यावरून हा निवडणूकीचा मुद्दा बनता काम नये अशीच त्यांची रणनिती दिसतेय. काहीशी अशीच रणनिती इतर मित्रपक्ष आणि तिसऱ्या आघाडीची ही राहिल. ही तिसरी आघाडी कदाचित ऐनवेळी मोदींसाठी काम करताना दिसेल. त्यामुळे निवडणूकांचा सर्जिकल स्ट्राइक एकाचवेळी अनेक ठिकाणांवरून होणार आहे. यात सध्या तरी मोदींचं पारडं जड दिसतंय.

Updated : 26 Feb 2019 2:27 PM GMT
Next Story
Share it
Top