Home > मॅक्स ब्लॉग्ज > अग्रलेख > देवेंद्र फडणवीसांचं काय चुकलं..?

देवेंद्र फडणवीसांचं काय चुकलं..?

देवेंद्र फडणवीसांचं काय चुकलं..?
X

राज्यात गेल्या काही दिवसांत मोठमोठी आंदोलनं झाली. लाखोंच्या संख्येने लोकं रस्त्यावर येऊन आंदोलन करताना दिसू लागली. कधी शेतकरी, कधी मराठा, कधी धनगर .. सातत्याने लाखोंच्या संख्येने लोक रस्त्यावर येतायत. ज्याप्रमाणे प्रचंड विरोधानंतर या सर्व निवडणूका भाजपा का जिंकतंय? हे विरोधी पक्षांना समजत नाहीय तसंच इतक्या मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर का बरे येत असावेत? हेच देवेंद्र फडणवीस सरकारला समजत नाहीय.

यातील बऱ्याचश्या आंदोलनांची बीजं विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस यांनीच रोवली आहेत. याच आंदोलनांमुळे देवेंद्र फडणवीस यांना नेतृत्व मिळालं, याच आंदोलनांमुळे देवेंद्र फडणवीस काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकार सत्तेवर येऊ शकलं. आता हीच आंदोलनं देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षांचं षडयंत्र वाटू लागलंय. आता त्यांना वाटतंय की ते ब्राह्मण आहेत म्हणून आंदोलनं सुरू आहेत. मला वाटतं, अशा निष्कर्षापर्यंत पोहोचणं हीच देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कोअर टीमची चूक आहे.

देवेंद्र फडणवीस ब्राह्मण असतानाही महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना स्वीकारलं, खुल्या दिलाने स्वीकारलं. त्यांची जात पाहून मतदान झालं असतं तर देवेंद्र फडणवीस यांच राजकारण कुठल्यातरी कचराकुंडीत पडलं असतं. देवेंद्र फडणवीस यांनी या राज्यातल्या तमाम युवा वर्गाच्या आशा-आकांक्षांचं राजकारण केलं. त्यांना विश्वास दिला की राज्यात जे काही सुरू आहे त्यावर ते जादूची कांडी फिरवल्यासारखा तोडगा काढून देतील. आशा-आकांक्षांचं राजकारण नेहमीच असं असतं, तुम्ही कुणालाच १०० टक्के समाधानी करू शकत नाही. त्यामुळे आशा-आकांक्षांच राजकारण करायचं झालं तर हे सर्व होणारच.

देवेंद्र फडणवीस यांना २०१४ ची निवडणूक अशी ही जिंकता आली असती. मोदी लाट आणि राज्यात ज्या पद्धतीचं असंतोषाचं वातावरण होतं ते पाहता भारतीय जनता पक्षाचा विजयच होणार होता, अशा ही स्थितीत सोशल इंजिनिअरींग करण्याच्या नादात भारतीय जनता पक्षाने इथल्या जाती-पातींच्या राजकारणाला हवा देण्याचा निर्णय घेतला. सोशल इंजिनिअरींग करताना ही त्यातल्या सर्वांत ज्वलंत विषयाला भाजपाने प्रचाराचा मुद्दा बनवलं. तुम्हाला सर्वसमावेशक राजकारण करता आलं असतं, पण ते सर्वसमावेशक राजकारण करताना तुम्ही स्वत:च त्यातला सर्वांत आक्रमक भाग निवडला, आगीशी खेळण्याचा निर्णय घेतला.

आजही मराठा-धनगर आणि इतर जाती, शेतकरी, बेरोजगार अशा विविध घटकांची जी आंदोलनं सुरू आहेत, त्यातील आंदोलकांची वैयक्तिक देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल नाराजी नाहीय, पण सरकार काम करत नाही, ऐकून घेत नाही अशी तक्रार आहे. सरकारने आश्वासनं दिल्यानंतरही आंदोलनं मागे घेतली जात नाहीत याचा अर्थ सरकारवरचा विश्वास उडालाय. असं असलं तरी मतपेटीतून ते दिसत नाही, हा विरोधी पक्षांचा कांगावा आहे असा युक्तीवाद करणाऱ्यांना एकच सांगावंस वाटतं की इतका असंतोष जर विरोधी पक्ष पेटवू शकले असते तर ते निवडणूकाही जिंकू शकले असते. विरोधी पक्ष हे फक्त बहती गंगा में हात धुण्याचा प्रकार करत आहेत. जितकी आंदोलनं झाली ती नेतृत्वहीन झालीयत.

नेतृत्वहीन आंदोलन म्हणजे, सध्याच्या सरकारवर विश्वास नाही, मागच्या सरकारमध्ये असलेल्या विरोधी पक्षासोबत जायचं नाही, आणि आपल्या प्रश्नाचा इतर कुणाला राजकीय फायदा मिळू नये म्हणून नेतृत्व नको अशा भावनेतून रस्त्यावर आलेली जनता. या जनतेला फक्त तोडगा हवाय. देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत असलेले विविध सरदार हे सतत तोडगा काढण्याएवजी हेतूवर शंका घेत आलेयत, उलट-सुलट वक्तव्य करत आलेयत, जी मग्रूरी युपीए-२ मधल्या नेत्यांनीही दाखवली होती. २०१४ हा मोदींच्या विजयाबरोबरच मग्रुरीचा पराभवही होता. भारतीय जनता पक्षाची या मग्रुरीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे, यावर देवेंद्र फडणवीस यांनी नियंत्रण आणलं नाही तर नेतृत्वहीन आंदोलनं जशी भरकटतात, तसंच हे सरकारही भटकू शकतं.

Updated : 10 Aug 2018 10:00 AM GMT
Next Story
Share it
Top