Home > मॅक्स ब्लॉग्ज > अग्रलेख > उन्नाव प्रकरण – कायद्यावर विश्वास ठेवावा कसा?

उन्नाव प्रकरण – कायद्यावर विश्वास ठेवावा कसा?

उन्नाव प्रकरण – कायद्यावर विश्वास ठेवावा कसा?
X

वो मेरे परिवार को मरवा देंगे... उन्नाव च्या बलात्कार पिडीत मुलगी भाजपाचा आमदार कुलदीप सिंह सेंगर आणि त्याच्या भावाचं नाव घेऊन घेऊन रडत रडत सांगतानाचा व्हिडीयो अजूनही माझ्या डोळ्यांसमोरून जात नाहीय. 4 जून 2017 ला बलात्कार झाल्यानंतर बराच काळापर्यंत पोलीसांनी एफआयआर सुद्दा नोंदवली नव्हती. कुठेही जा पण तक्रार नोंदवून घेणार नाही असं तिला सांगण्यात आलं होतं. त्यानंतर तिच्याच वडिलांना जेलमध्ये टाकण्यात आलं आणि तिथे त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला.

परिवाराला संपवू अशी उघड धमकी देणाऱ्या आमदार आणि त्याच्या चट्ट्यापट्यांना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वेळीच धडा शिकवला पाहिजे होता. मात्र, भारतीय जनता पक्षाशी जोडले गेलेल्या आरोपींना तिथे रेड कार्पेट ट्रीटमेंट मिळताना दिसते. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला भगवे कपडे घातलेले नेते उघडपणे जेलमध्ये कुलदीप सेंगरला भेटून त्याचं राजकीय महत्व वाढवत होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातली कायदा-सुव्यवस्था कशी आहे याची प्रचितीच येत होती.

काल रात्री अचानक उन्नाव बलात्कार पिडीतेच्या गाडीला ट्रक ने ठोकर मारल्याची बातमी आली. या अपघातात ती गंभीर जखमी झाली. पिडीतेची आई, काकू आणि वाहनचालकाचा या अपघातात मृत्यू झाला, तर पिडीत तरूणी आणि तिचा वकील गंभीर जखमी झाला.

वरवर साधा अपघात आहे असं वाटावं. असं हे प्रकरण गंभीर वळणावर तेव्हा आलं जेव्हा या अपघातातील ट्रकचा नंबर खोडलेला आढळला. पाऊस असल्यामुळे अपघात झाला असावा असं पोलिसांचं म्हणणं होतं, मात्र ट्रक चा नंबर खोडलेला आणि चालक फरार झाल्यामुळे या प्रकरणातला संशय आणखी बळावला आहे. कुलदीप सेंगर याने आधीच या परिवाराला मारण्याची धमकी दिलेली होती, असं पिडीत तरूणीने वारंवार सांगितलेलं आहे.

ट्रक किंवा अपघातांमध्ये आरोपी, पिडीत किंवा साक्षीदारांचा मृत्यू होण्याचं प्रमाण देशभर वाढतंय. या आधीही काही अपघातांमध्ये घातपात असल्याचं समोर आलं होतं. मुंबईतल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकारी तर अशा पद्धतीने अपघात करवून घेण्यामध्ये माहीर मानला जात होता. अंडरवर्ल्डही अशा पद्धतीने अपघात घडवून आणतो हे सर्वश्रृत आहे. अशा परिस्थितीत उन्नाव प्रकरणातील पिडीत तरूणीचा अपघात हा साधा अपघात वाटत नाही. हा जर घातपात असेल तर बेटी बचाओ चा नारा देणारेच किती घातक आहेत. हे सिद्ध होईल.. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अत्याचाराच्या प्रकरणामध्ये तक्रार करायची की नाही. या भीतीपोटी तक्रार करायला महिला पुढेच येणार नाहीत. कायदा-सुव्यवस्था राखण्याबरोबरच कायद्यावरचा विश्वास वाढवणे, जिविताचा अधिकार अबाधित ठेवणे. या अधिकारांचं संरक्षण पण सरकारने करायचं असतं. उन्नाव प्रकरणातील हे अपघात-घातपात प्रकरण कायद्यावरील विश्वास उडवणारं आहे.

- रवींद्र आंबेकर

Updated : 29 July 2019 6:52 AM GMT
Next Story
Share it
Top