Home > रवींद्र आंबेकर > देशाचा विवेक धोक्यात...

देशाचा विवेक धोक्यात...

देशाचा विवेक धोक्यात...
X

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी प्रसंगी महाराष्ट्र गहाण ठेवू असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच केलं आणि कधी नव्हे ती मला धडकी भरली. डॉ. बाबासाहेब यांच्या राष्ट्रीय स्मारकाशी एका जातसमूहाच्या भावना गुंतलेल्या आहेत. त्या समूहाला गाजर दाखवून राजकीय पोळी भाजण्याचे प्रकार या आधीही अनेक राजकीय पक्षांनी केले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे वक्तव्य राजकीयदृष्टा सहज मानावे लागेल. मात्र मला ते तितक्या सहजतेने घेता येत नाहीय. मला या वक्तव्याच्या अनुषंगाने एकूणच भारतीय राजकारण आणि देशाचा विवेक धोक्यात येताना दिसतोय.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलित समाजाचे उद्धारक नव्हते. त्यांचा वावर हा विविध क्षेत्रात होता. ते जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ ही होते. त्यांच्या आर्थिक मांडणीवर आज देशाची अर्थव्यवस्था उभी आहे. वेल्फेअर स्टेट म्हणजे लोककल्याणकारी राज्याच्या संकल्पनेतील अर्थशास्त्र कसं असावं याचा अतिशय सखोल अभ्यास त्यांनी केला होता. आर्थिक निकषावर आरक्षणाची मागणी करणाऱ्या तमाम लोकांना त्यांनी जात हा निकष लावून धुडकावून लावलं. ते जातीयवादी होते म्हणून त्यांनी जात हा निकष लावला नाही. तर त्यांना अर्थकारण खूप चांगल्या पद्धतीने माहीत होतं म्हणून त्यांनी जात हा निकष लावला. आर्थिक स्थिती व्हेरीएबल आहे, म्हणजे ती बदलू शकते. त्यामुळे परिमाणाची निवड करायची असेल तर स्थिर परिमाण निवडावं लागतं. जात हे इथलं स्थिर परिमाण आहे. त्याचं सोशल ऑडीट होऊ शकतं. पण डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची सर्व मांडणी ही अर्थशास्त्राच्या निकषावरही तपासून पाहिलेली होती. ज्यांनी प्रॉब्लेम ऑफ रूपीच्या निमित्ताने आपल्या अर्थव्यवस्थेला आकार दिला, त्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं उचित स्मारक व्हावं ही सर्वांची इच्छा आहे. त्या स्मारकाशी अनेकांच्या भावना ही गुंतलेल्या आहेत. मात्र, या भावनांशी खेळण्यासाठी जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी खेळ होणार असेल तर तो द्रोह आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्थकारणात एखाद्या स्मारकासाठी एखादं राज्य गहाण ठेवण्याची मुभाच नाही. ज्यांनी हा देश सर्वोच्च मानला, त्या देशातील पददलितांचा उद्धार म्हणजेच देशाच्या विकासाचं दुसरं चाक गतिमान करण्याचा प्रयत्न मानला, त्या आंबेडकरांच्या एकूण मांडणीला बुद्धी गहाण ठेवलेले राजकारणी खीळ घालण्याचा प्रयत्न करतायत. बाबासाहेबांचे गोडवे गायचे, बखरी लिहायच्या आणि त्यांच्या विचारांना हरताळ फासायचा धंदा सध्याच्या राजकारण्यांनी सुरू केला आहे. तो तात्काळ रोखला पाहिजे.

आज गरज आहे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याची. त्यांना जगातल्या सर्वांत उंच पुतळ्यात अडकवण्याची काही गरज नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतलं, ज्या सामाजिक स्थितीला तोंड दिलं, जी मांडणी केली तो लोकांसमोर मांडण्याची गरज आहे. देशाची राज्यघटना लिहित असताना त्यांनी या देशात समानतेची बीजे रोवली. नागरिक म्हणूनच नव्हे तर माणूस म्हणून आपल्याला उभं केलं. त्यांचं स्मारक पुतळ्याच्या स्वरूपात होऊच शकत नाही. त्यासाठी जर राज्य गहाण टाकावं लागणार असेल तर बाबासाहेबांनी त्याला कधीच मान्यता दिली नसती. आंबेडकरी जनतेने आता सावध व्हायला हवं. गांधींना चष्म्यात आणि स्वच्छता मोहीमेत बंद करणारे उद्या बाबासाहेबांना राज्यघटनेच्या पुस्तकात आणि पुतळ्यात बंद करतील. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यात-स्मारकात नाही तर आपल्या मेंदूत घुसले पाहिजेत.

- रवींद्र आंबेकर

Updated : 9 Oct 2018 5:00 AM GMT
Next Story
Share it
Top