Home > रवींद्र आंबेकर > शतप्रतिशत मध्ये शिवसेनेला हवा 50% वाटा

शतप्रतिशत मध्ये शिवसेनेला हवा 50% वाटा

शतप्रतिशत मध्ये शिवसेनेला हवा 50% वाटा
X

विधानसभा निवडणुकीच्या आधी शिवसेनेने पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर कुरघोडी करायला सुरूवात केली आहे. केंद्रात दुसऱ्यांदा आणि राज्यात सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेनं आता हिस्सेदारीची भाषा बोलायला सुरूवात केली आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युती 229 विधानसभा जागांवर आघाडीवर आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला 23 जागा मिळाल्या होत्या तर शिवसेनेला 18 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागा मिळाल्या होत्या. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आघाडीला 122 आणि शिवसेनेला 63 जागा मिळाल्या होत्या.

काँग्रेसला 42 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या होत्या.

लोकसभा 2019 निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची दाणादाण उडालेली दिसतेय. काँग्रेसला राज्यात केवळ एकच जागा मिळवता आली तर राष्ट्रवादी काँग्रेस ला 4 जागा मिळाल्या. ( राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या नवनीत कौर राणा या सातत्याने भाजपाच्या संपर्कात असतात ).

लोकसभेच्या निकालावरून जर विधानसभा मतदार संघांचा आढावा घेतला तर भारतीय जनता पक्ष 124 जागांवर तर शिवसेना 105 जागांवर आघाडी घेताना दिसतेय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मिळून 40 जागा मिळताना दिसतायत. काँग्रेसला 19 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 21 जागांवर आघाडी मिळाली होती. वंचित आघाडीने लोकसभेत 1 जागा जिंकली होती, विधानसभेच्या 9 मतदार संघात वंचितने आघाडी घेतलीय. राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष विधानसभेच्या 4 जागांवर आघाडीवर दिसतोय.

याचाच अर्थ असा की 2014 च्या निवडणुकीपेक्षा शिवसेनेच्या जागा वाढतायत. शिवसेनेला 2014 मध्ये 63 जागा होत्या त्या वाढून 105 होताना दिसतायत, तर भाजपाला 2014 च्या तुलनेत केवळ दोनच जागांचा फायदा होताना दिसतोय. भाजपाला 2014 विधानसभेत 122 जागा मिळाल्या होत्या, त्या वाढून 124 होताना दिसतायत.

2014 च्या तुलनेत शिवसेनेची ताकत वाढताना दिसतेय. याचा संपूर्ण अभ्यास केल्यानंतर शिवसेनेने आता राज्यातल्या सत्तेत 50 टक्के वाटा मागितला आहे. एकीकडे भाजपा शतप्रतिशत भाजपाचा नारा देत आहे, मात्र त्याचवेळी शिवसेना त्यातला आपला वाटा घेण्यासाठी संघर्षासाठी तयार झाली आहे.

रवींद्र आंबेकर, संपादक, मॅक्स महाराष्ट्र

Updated : 18 July 2019 10:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top