Home > रवींद्र आंबेकर > भाजपाईंनो उत्तर द्या

भाजपाईंनो उत्तर द्या

भाजपाईंनो उत्तर द्या
X

भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या घरी शस्रे, बंदूका सापडतात. धनंजय कुलकर्णी असं त्या पदाधिकाऱ्याचं नाव. इतका शस्त्रसाठा कशासाठी घरी ठेवला, हे विचारायचं- सांगायचं सौजन्य भारतीय जनता पक्षाचे कुठलेच नेते दाखवायला तयार नाहीत. गृहमंत्रीपद सांभाळणारे देवेंद्र फडणवीस तर अशा वेळी कुठल्या तरी बिळात जाऊन लपतात. भाजपाईची वाचा बसते. असं, असलं तरी या भाजपाईंना काही प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागणार आहेत. धनंजय कुलकर्णीला नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांच्या राज्यात सुरक्षित वाटत नाही का, कशासाठी इतका शस्त्रसाठा, काय घडवायचं होतं, काय बिघडवायचं आहे. हे आणि असे बरेच प्रश्न आता उपस्थित होतायत.

धनंजय कुलकर्णी याच्या घरात इतका शस्त्रसाठा, तो ही भाजपाचंच सरकार असताना सापडणं याचे दोन अर्थ होतात. एक – धनंजय कुलकर्णीला सरकारवर भरवसा नाही. दोन – सरकार राहिल यावरचा भरवसा उडालाय आणि म्हणून अनागोंदी माजवण्यासाठी ही जमवाजमव सुरू केली असावी. विरोधी पक्षांनी आरोप लावलाय, राज्यात निवडणूकांच्या आधी दंगल भडकवण्याचा डाव होता म्हणून, तर सोशल मिडीयावर पोस्टचा भडीमार सुरूय.. कुलकर्णी होते म्हणून चर्चा नाही.. कांबळे किंवा खान असता तर मिडीया ने फाडून खाल्ला असता. शहरी नक्षलवादी, दहशतवादी ठरवून मोकळे झाले असते मिडीयावाले इतक्यात. पण दहशतवादाचा भगवा रंग अजून आपल्या माध्यमांना मान्य झालेला नाहीय. निळा किंवा हिरव्या रंगात रंगवायला सोप्पं जातं, केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्याने यावर फार भाष्य करणं एकूणच माध्यमांना आणि सत्ताधाऱ्यांना अडचणीचं जात असावं.

धनंजय कुलकर्णींनी शस्त्रसाठा दसऱ्याच्या शस्त्रपूजनासाठी निश्चितच नव्हता जमवला. कुलकर्णीचा आंतरराज्य शस्त्रविक्री टोळीशी संबंध आहे. तो भाजपाचा पदाधिकारी ही आहे. त्यामुळे आता सरकारची बोलती बंद आहे. मला हे फार आश्चर्यकारक वाटतं. मालेगावच्या बाँबस्फोटात ज्यांची नावे आली त्या भगव्या दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर मोहन भागवतांचं नाव ही होतं असं सांगितलं जातं. हे जर खरं असेल तर हे भगवे पक्ष या दहशतवाद्यांना का पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात..? की संशयाची सुई आपल्याकडे येऊ नये म्हणून एखादं नाव हिटलिस्टच्या यादीत घुसडून ठेवायचं आणि दिशाभूल करायची, असा तर हा कार्यक्रम नाही ना ? महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून भगव्या दहशतवाद्यांनी आपली पाळे-मुळे रुजवण्यास सुरूवात केलीय. धनंजय कुलकर्णीच्या निमित्ताने हिंदू धर्माच्या नावाखाली सुरू असलेली ही भाईगिरी मोडून काढली पाहिजे. सतत मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मियांची भीती दाखवून भगवे राजकीय पक्ष नागरिकांना घाबरवत असतात. हिंदू धर्माला खरी भीती या भगव्या राजकीय पक्ष आणि संघटनांमुळे आहे. त्याचमुळे भगवा दहशतवाद शब्द पुढे आला आहे. सामान्य हिंदूंनी भगवा दहशतवाद पसरवणाऱ्या या राजकीय पक्ष आणि विचारधारांपासून लांब राहण्याची गरज आहे.

लक्षात ठेवा निवडणुकातला बाजार उठताना दिसतोय म्हणून हे सुरू असू शकतो. कदाचित या हत्यारांचा पुढचा बळी तुम्ही ही असू शकता. आज जर या घटनांकडे दुर्लक्ष केलंत तर हे भगवे पक्ष-संघटना हा देशच संपवतील.

- रवींद्र आंबेकर

Updated : 17 Jan 2019 2:11 PM GMT
Next Story
Share it
Top