Home > रवींद्र आंबेकर > केतकी चितळेच्या निमित्ताने... 

केतकी चितळेच्या निमित्ताने... 

केतकी चितळेच्या निमित्ताने... 
X

केतकी चितळे नावाच्या एका अभिनेत्रीने सोशल मिडीयावर पोस्ट केलेल्या व्हिडीयोनंतर सध्या प्रचंड टीका केली जात आहे. केतकी चितळेचा ‘तो’ व्हिडीयो जशाच्या तसा दाखवला म्हणून मॅक्समहाराष्ट्र वर ही काही लोकांनी जोरदार हल्ला चढवला आहे. काहींनी मॅक्समहाराष्ट्र अनफॉलो करत आहोत असं ही म्हटलं आहे. ज्यांनी मॅक्समहाराष्ट्र अनफॉलो करण्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत त्यांनी खुशाल मॅक्समहाराष्ट्र अनफॉलो करावं. जे महिलांचा सन्मान ठेऊ शकत नाहीत, अशा वाचकांनी मॅक्समहाराष्ट्र सोबत असणं हेच आम्हाला जास्त त्रासदायक आहे.

केतकी चितळे यांनी त्यांच्या व्हिडीयोवर आलेल्या प्रतिक्रिया वाचून दाखवल्या. त्या प्रतिक्रिया इतक्या खालच्या पातळीवरच्या होत्या की माथंच ठणकलं पाहिजे. मात्र केतकी या प्रतिक्रिया वाचत असताना काही वाक-प्रेक्षक शब्दछलामध्ये अडकवायचा प्रयत्न करत होते. शिवाजी महाराज-मावळे यांचा काय संबंध वगैरे वगैरे. छत्रपती शिवाजी महाराजांचा संदर्भ यासाठी होता की शिवरायांचे मावळे अशा प्रतिक्रिया देऊच शकत नाही यावर अख्ख्या महाराष्ट्राचा विश्वास आहे. अशा वेळी नव्याने जन्माला आलेली ट्रोल जमात जय जिजाऊ-जय शिवराय अशा घोषणा देत सर्रास शिव्या देत असते. रोज सोशल मीडियावर असे अनेक लोक जन्म घेत आहेत. यापैकी कोणालाच ही शिव्यांची भाषा खटकत नाही. कोणीच कोणाला थांबवत नाही.

मॅक्समहाराष्ट्रच्या अनेक बातम्यांवर अशाच घाणेरड्या शब्दांतल्या प्रतिक्रिया येत असतात. मॅक्समहाराष्ट्र मध्ये काम करत असलेल्या महिला या प्रतिक्रिया वाचत असतात. अनेकदा त्या प्रतिक्रियांना आम्ही उत्तरे देतो की चांगल्या भाषेतही हा मुद्दा मांडता येऊ शकेल, मात्र मुद्दा मांडण्यामध्ये या लोकांना रस नसतो. हे काही अजेंडा चालवणारे लोक असावेत, ज्यांचा चर्चेवर विश्वास नाही.

मी सार्वजनिक जीवनात वावरतो. मी लोकांचा टीका करण्याचा अधिकार मान्य करून चालतो. त्यामुळे रचनात्मक टीका नेहमीच ऐकतो, त्यावर विचार करतो. उलट मी टिकांना टीका न समजता सूचना समजतो. सामाजिक कार्यकर्ते कितीही जहाल असोत अशा भाषेत बोलताना मी कधीही पाहिलेले नाहीत. वैचारिक विरोधकांशी मी नेहमीच बोलत असतो. मला कधीही त्यांनी स्तर सोडलेला दिसला नाही, मग अचानक अशा भाषेत बोलणारे नवे लोक जन्माला कुठून आलेले आहेत. हे नक्की खरे आहेत की खोटी पैदास आहे, हा प्रश्न मला पडतो.

या ऑनलाइन ट्रोलबाबत आणखी एक जाणवलेली गोष्ट म्हणजे, या ट्रोल्सची भाषा जहाल, अश्लील, हिंसक असतेच पण अशुद्धही असते. बोली म्हणावी तर तशीही ही भाषा नसते. सर्वसाधारणपणे मराठी शाळेत नीटपणे शिकलेल्या लोकांच्या काही मुलभूत चुका होत नाहीत. हे ट्रोल्स लेखी मराठीत खूप गंभीर चुका करतात. त्या चुकांवर बोट ठेवलं की बोली भाषेचा हंगामा करतात, ब्राह्मणी ठरवण्याचा प्रयत्न करतात. मी स्वतः प्रमाण भाषेचा पुरस्कर्ता नाही, परंतू अर्थ बदलेल अशा चुकांचा मी समर्थक नाही. ऱ्हस्वदीर्घच्या चुका तर आता मोजण्याची सोयच राहिलेली नाही. पण हे ट्रोल सरसकत मराठी भाषेची अस्मिता जागवत कधी शिवाजी महाराज, कधी बाबासाहेब, कधी विविध नेत्यांची नावे घेऊन आक्रमक बोलत असतात आणि या सर्व महान लोकांच्या शिकवणुकीच्या विपरित शिवीगाळ करतात. आश्चर्य म्हणजे अशा ट्रोल्सच्या समर्थनार्थ मग चांगले शिकले-सवरलेले लोक येतात. केतकीच्या निमित्ताने मला या प्रवृत्तीवर चर्चा करावीशी वाटते. केतकी यांनी आलेल्या प्रतिक्रिया जशाच्या तशा वाचल्या यावर अनेकांना संस्कृती बुडाल्याचा साक्षात्कार झाला. एखाद्या महिलेल्या आणि तिच्या आईच्या पार्श्वभागात बांबू टाकणे वगैरे बोलायचं ज्यांना सुचू शकतं त्यांचा सामाजिक बहिष्कार करायला हवा, मात्र होताना उलटचं दिसतंय. ज्यांनी अशा प्रतिक्रिया दिल्या त्यांचं समर्थन केलं जातंय.

केतकी चितळे किंवा इतर कुणीही जर त्यांच्या वक्तव्यात काही वादग्रस्त असेल किंवा बेकायदेशीर असेल तर कायदेशीर कारवाईचा मार्ग केव्हाही मोकळाच आहे. टीका करायची असल्यास योग्य भाषेत ती करताही येईल, पण म्हणून पातळी सोडून बोलणं आणि त्याचं समर्थन करणं योग्य नाही. अशा प्रवृत्तींचा मॅक्समहाराष्ट्र तीव्र शब्दांत निषेध करतं. एखाद्या समाजाची प्रगती त्या समाजात महिलांना काय सन्मान मिळतो यावर ठरते, खुद्द छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा आदर्श घालून दिला आहे. अशा वेळी भाषेचा स्तर सोडून प्रतिक्रिया देणाऱ्या आणि त्यांचं समर्थन करणाऱ्या झुंडींला वेळीच रोखलं पाहिजे. मॉब लिंचींग प्रमाणेच हे सोशल लिंचींग आहे. याचं गांभीर्य ज्यांना समजतं अशाच प्रेक्षक-वाचकांची मॅक्समहाराष्ट्र ला गरज आहे. अशा विचारी, विवेकी लोकांसाठीच मॅक्समहाराष्ट्र आहे. इतरांना आमचा नमस्कार.

- रवींद्र आंबेकर

Updated : 16 Jun 2019 12:04 PM GMT
Next Story
Share it
Top