Home > रवींद्र आंबेकर > कायद्याचं राज्य आहे का?

कायद्याचं राज्य आहे का?

कायद्याचं राज्य आहे का?
X

भाजपाचे नेते कैलास विजयवर्गीय यांचा मुलगा आकाश विजयवर्गीय ने एका अधिकाऱ्याला बॅट ने मारहाण केली. त्यानंतर त्याची जामीनावर सुटका झाल्यानंतर आकाशच्या समर्थकांनी भाजपा कार्यालयाबाहेर गोळीबार करत आनंद व्यक्त केला. दुसरा एक व्हिडीयो आज आला जिथे टीआरएस च्या आमदाराच्या भावाने वन आणि पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांवर ऊसाने हल्ला केला. यात एका महिला अधिकाऱ्याला जबर मार लागला आणि ती बेशुद्ध होऊन पडली.. मध्यंतरी ‘जय श्री राम’ कॅटेगरीतले हल्ले सुरूच आहेत.

या अत्यंत स्वतंत्र घटना आहेत, देशात कुठे ना कुठे घडलेल्या एखाद घटनेला घेऊन काही पुरोगामी लोक बोंबा मारत राहतात आणि देशाचं नाव खराब करत राहतात, असा एक सर्वसामान्य समज लोकांमध्ये पेरण्यात आलेला आहे. अशा घटना करणारे लोक देशाचं नाव खराब करतायत. यावर या लोकांचा विश्वासच नाहीय. उलट अशा घटनांमुळे व्यथित झालेल्या लोकांनाच आरोपी करण्यात येतंय. असं असलं तरी बहुमताचं मानलंच पाहिजे अशातला भाग नाही. या बहुमतामध्ये असंख्य असे लोक असतात. ज्यांना हे जे काही चाललंय ते पसंत नाही. मात्र, त्या बद्दल उघड बोलण्याची त्यांची हिंमत होत नाही. काही ही असो, बहुमत विरोधात असलं तरी या घटना चिंताजनक आहेत आणि देशाच्या एकूण सुरक्षा-स्वातंत्र्य यासाठी घातक आहेत हे मांडायलाच हवं.

कायदा हातात घेणारे कुठल्याही पक्षाचे, कुठल्याही जातीचे-धर्माचे असोत त्यांचा आपण कडाडून विरोध केला पाहिजे. राज्यघटनेने सगळ्यांना अभिव्यक्ती, संचार, धर्म स्वातंत्र दिलं आहे. राज्यघटनेने आपल्याला समानतेचा अधिकार दिलाय, उपासनेचा अधिकार दिलाय, आपली मतं व्यक्त करण्याचा अधिकार दिलाय. जे लोक भारतात राहतात आणि ज्यांचा या देशाच्या संविधानावर विश्वास आहे, प्रेम आहे ते सर्वच भारतीय आहेत. अशा एखाद्या भारतीयाला एखाद्या सत्तेच्या माजाने धुंद झालेल्या टवाळांनी-गुंडांनी छेडलं-मारलं-ठेचलं-छळ केला तर आपलं रक्त भारतीय म्हणून खवळलंच पाहिजे.

देशात सध्या विविध ठिकाणी जय श्री राम म्हणण्याची सक्ती करून नागरिकांना त्रास देण्याचा प्रकार सुरू आहे. मी या आधीच म्हटलंय की अशी सक्ती करणाऱ्या निर्बुद्धांना समाजातल्या सुशिक्षित घटकांकडून मिळणारं समर्थन हे जास्त घातक आहे. मला वाटलं तर मी म्हणेन जय श्री राम नाही वाटलं तर कशाला म्हणू इतकं साधं स्वातंत्र्य मला नसावं का...?ज्यांची उपासना पद्धती वेगळी आहे. त्यांना वेगळी उपासना करण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही. माझ्या सोबत शिकलेल्या कुठल्याच विद्यार्थ्याने वंदे मातरम म्हणण्याला खळखळ केलेली मला आठवत नाही. टीव्ही स्क्रीन वर येऊन जोरजोराने बोलणारे पेड मौलाना या माझ्या मुस्लीम मित्रांना नेहमीच सत्तेचे दलाल वाटत आले आहेत. मी ओळखत असलेल्या बॅलन्स विचार करणाऱ्या मुस्लीम नेत्यांना टीव्ही वाले कधीच चर्चेला बोलवत नाहीत. सतत टोकाची भूमिका मांडणाऱ्या पेड धर्मगुरू किंवा नेत्यांना दाखवून ध्रुवीकरण केलं जातं, आपला समाज ही अशा प्रचारांना बळी पडतो. ज्या प्रमाणे टीव्हीवर येणारे हिंदू धर्मगुरू किंवा नेते हे व्यापक हिंदू समाजाचं प्रतिनिधीत्व करत नाहीत तसंच या मुस्लीम नेत्यांबाबत आहे.

या देशातला टीव्ही तसंच मुख्य प्रवाहातील माध्यमं सतत धार्मीक-जातीय ध्रुवीकरणाची प्रक्रीया राबवत असतात. या लोकांना आपण देशद्रोह करतोय हे लक्षात येत नाहीय, असं नाहीय. अतिशय जाणीवपूर्वक हा अजेंडा राबवला जातोय. हा अजेंडा सत्तेच्या सोयीचा आहे.

देशातील अंतर्गत सुरक्षेचा मुद्दा जितका ज्वलंत राहिल तितकं सत्तेतल्या पक्षाला सोयीचं आहे, असं असलं तरी यामुळे या देशाच्या विकासाला खीळ बसणार आहे. देशाचा विकास थांबला तर या देशाच्या भावी पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. साधं उदाहरण घ्या, ज्या राज्यांमध्ये सतत जातीय-धार्मीत तेढ किंवा अशांतता असते त्या राज्यांमध्ये विकास होत नाही, उद्योग जात नाही. महाराष्ट्र-तामिळनाडू सारख्या राज्यांमध्ये शिक्षणाचं प्रमाण चांगलं आहे, अशांतता नाही म्हणून इथे विकास होतो. जात-धर्माची नशा केलेल्यांनी यावर विचार करायला हवा.

राहिला दुसरा मुद्दा, कोणी हातात बॅट घेतयं, कोणी शस्त्र तर कोणी ऊसाने कोणाला तरी मारतंय. सत्तेचा इतका माज का चढतोय लोकांना? तुम्हाला कायदेमंडळात पाठवलंय. कायदा हातात घ्यायला नाही. कायदेमंडळ हे सर्वोच्च आहे, जर इतर यंत्रणा काम करत नसतील तर त्यांना वेसण घालायचं काम कायदेमंडळाचं आहे. हातात बॅट घेऊन मारामारी करायचं नाही.

एक गोष्ट लक्षात ठेवा ही बॅट आज इतर कुणावर चाललीय म्हणून आपण टाळ्या पिटतोय, उद्या कदाचित या बॅटचं लक्ष्य तुम्ही ही असू शकता. त्या दिवशी लोकांनी टाळ्या वाजवाव्यात की बॅट हातात घेणाऱ्याला रोखावं याचा फैसला तुम्हाला आज करायचाय.. नंतर कदाचित वेळ निघून गेलेली असेल

Updated : 30 Jun 2019 1:07 PM GMT
Next Story
Share it
Top