Home > रवींद्र आंबेकर > आपापल्या घरात गप्प बसा…

आपापल्या घरात गप्प बसा…

आपापल्या घरात गप्प बसा…
X

भारतीय लोकशाही समोरील सगळ्यात मोठा धोका, इव्हीएम टॅम्पर केली जाऊ शकतात असा दावा एका हॅकरने केला. खरं तर प्रश्न हा फक्त इव्हीएम हॅक करण्याचा नाहीय, प्रश्न तुमचं आमचं मत हॅक करण्याचा आहे. कुणी तरी लोकशाहीच्या मूलतत्वांचाच खून करतंय, असा हा आरोप आहे. भारतीय जनता पक्षाला आता या मुद्द्यावर राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या पलिकडे जाऊन आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे.

हॅकरने आपल्या दाव्यांमध्ये जे जे काही सांगीतलंय, ते आधी समजून घेऊया. हॅकर म्हणतो, भारतीय इव्हीएम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटींग मशीन ब्लू टूथ, वायफाय यांच्या साह्याने हॅक नाही होऊ शकत. इव्हीएम कुठल्याही नेटवर्क शी जोडली गेलेली नसल्याने अशा पद्धतीने ही मशीन हॅक होऊ शकत नाही. ही मशीन हॅक करायची असेल तर या मशीन मध्ये जी चीप आहे तिचं प्रोग्रामींग बदलावं लागेल. साधारणत: सैन्यदल जी फ्रिक्वेन्सी संपर्कासाठी वापरतं, त्या लो फ्रिक्वेन्सीवर संदेश प्रसारित करून इव्हीएम हॅक करता येऊ शकते असं हॅकरचं म्हणणं आहे. यासाठी रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या ( हॅकरने हे नाव आपल्या पत्रकार परिषदेत वापरलंय. ) यंत्रसामुग्रीचा वापर केला गेला असल्याची माहिती हॅकरने दिली आहे.

हॅकरचा दावा आहे की, दिल्लीतली निवडणूक जिंकण्यासाठी ही भाजपने हा प्रयत्न केला होता, मात्र हॅकर्सनी वेळीच ती फ्रिक्वेन्सी इंटरसेप्ट करून निकाल बदलला आणि त्याचमुळे दिल्लीत आपच्या बाजूने अभूतपूर्व असा निकाल लागला.

हॅकरच्या दाव्यातील सगळ्याच खळबळजनक भाग म्हणजे, गोपीनाथ मुंडे यांचा अपघातात मृत्यू झाला नसून त्यांना इव्हीएम बाबत माहिती होती, आणि कमी महत्वाचं मंत्रीपद मिळालं म्हणून नाराज मुंडे ही माहिती उघड करतील अशी भीती वाटल्याने त्यांची हत्या करण्यात आली असं हॅकरचं म्हणणं आहे. इव्हीएम हॅक करण्याबाबत माहिती असलेल्या आपल्या टीम पैकी ( नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडीयात काम करणाऱ्या ) सहकाऱ्यांना भाजपच्या एका नेत्याने ठार केलं असा आरोप ही हॅकरने केला आहे. हॅकरने अमेरिकेत शरणागती पत्करली असून आपण केलेल्या आरोपांत तत्थ्य असल्यानेच आपल्याला शहानिशा केल्यावरच शरणागती मिळाली असा हॅकरचा दावा आहे.

एकूणच, इव्हीएमच्या बाबतीत बाळासाहेब ठाकरेंपासून आत्ताच्या राहुल गांधींपर्यंत सर्वांनीच संशय व्यक्त केला आहे. विरोधी पक्षात असताना खुद्द भाजपानेही इव्हीएमच्या विरोधात आवाज बुलंद केला होता. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना इव्हीएम वर संशय आहे. त्याचमुळे निवडणूक आयोगाने इव्हीएम हॅक करण्याचे आव्हान दिलं होतं, मात्र निवडणूक आयोगाने मशीन ताब्यात न देता हॅकींगचं आव्हान दिलं होतं. या लबाडाघरचं आमंत्रण असंच या आव्हानाबाबत म्हणता येऊ शकेल. अशा परिस्थितीत एकूणच संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे.

आता प्रश्न हा नाहीय की, इव्हीएम हॅकींग करून कुठला पक्ष जिंकतो, कुठला हरतो, प्रश्न हा आहे की लोकशाही जिंवत ठेवण्यासाठी आपण विचारपूर्वक टाकलेलं मत इव्हीएम मशीन मध्ये केवळ एक आकडा बनून जात असेल आणि त्या आकड्याच्या बेरजेला कुणीतरी, कुठेतरी बसून बदलत असेल तर देशाची लोकशाहीची कधीच हत्या झालीय हे आपल्याला लक्षातच आलेले नाही.

दुसरं, जर हे सर्व आरोप खोटे असतील, बनावट असतील तर.. तर या देशाच्या लोकशाहीवरचा, यंत्रणेवरचा, राजकीय प्रणालीवरचा विश्वास उडवण्याच्या या षडयंत्रात सामील असणाऱ्यांना फाशीची शिक्षाच दिली गेली पाहिजे. इव्हीएमच्या निमित्ताने या देशाच्या लोकशाहीचं फायरवॉल अधिक सक्षम करण्याची गरज निर्माण झाली आहे. देशातील सर्व यंत्रणांमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी सजगपणे या विषयावर आपली मते व्यक्त केली पाहिजेत. शेवटी तुम्ही लोकांच्या पैशातून पगार घेताय, तुम्ही लोकांचे सेवक आहात. जर या देशातील निवडणूक प्रक्रीयेशी छेडछाड केली जात असेल तर सर्वांनी आता पुढे येऊन बोललं पाहिजे.

झालेल्या मतदानापेक्षा काही ठिकाणी जास्त मते आढळून आल्याच्या घटना ही मागच्या काळात घडलेल्या आहेत. निवडणूक आयोगापुढे आपली निष्पक्षता सिद्ध करण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी आलीय. आज निवडणूक आयोग जर मानापमानाच्या फेऱ्यात अडकलं, तर कदाचित आपल्याला लोकशाहीचा मुडदाच बघायला मिळेल. लोकशाहीचा मृत्यू तुम्हाला उघड्या डोळ्यांनी बघायचा असेल तर आपापल्या घरात गप्प बसा

Updated : 22 Jan 2019 3:34 PM GMT
Next Story
Share it
Top