मेंदूतला बिघाड

मेंदूतला बिघाड
X

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी अनेक विद्वान लेख-लेखमाला लिहून आंबेडकरी जनतेला उपदेशाचे डोस पाजतात किंवा चळवळीचं मूल्यमापन करतात. विविध प्रकारचे सल्ले दिले जातात. हा समाज कसा सुधारला नाही, नेते कसे नेभळट-सेटींगबाज राहिले, जातीयवादी राहिले आणि एकूण आंबेडकरी समाजाचं रिपब्लिकन पक्षाच्या अवतीभोवती मूल्यमापन केलं जातं. आजच्या दिवशी मला या मोहात पडायचं नाहीय.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकूणच योगदानाबाबत दलितेतर आणि ज्याला आपण आंबेडकरी जनता म्हणतो त्या व्यतिरिक्त भारतीय समाज काय विचार करतो याचं मूल्यमापन करायची गरज निर्माण झाली आहे. राज्यघटनेचे शिल्पकार म्हटल्यानंतर जे लोक, घटना समितीत केवळ बाबासाहेबच नव्हते तर इतर लोक ही होते अशी पुस्ती लगेच जोडतात, हा अग्रलेख त्यांच्यासाठी आहे. आजच्या मॉर्डर्न लाइफस्टाईलमध्ये वावरणाऱ्या युथला 8 तासांची ड्युटी, घर आणि ऑफिस सांभाळणाऱ्या महिलांना प्रसूतीची रजा, इथपासून शेती-पाणी, धरणं, समाजिक न्याय, अर्थव्यवस्थेतील महत्वाचा हिस्सा असलेली रिजर्व्ह बँकेची मांडणी इथपर्यंत विविध क्षेत्रात ज्या व्यक्तीने आपलं बहुमुल्य योगदान दिलं त्याच्याबद्दल जुजबी ही माहिती नसणं ही आपल्या भारतीय समाजाची शोकांतिका आहे.

आंबेडकरी जनता मोठ्या संख्येने चैत्यभूमीवर गोळा होते. जगभरात एखाद्या व्यक्तिच्या मृत्यूनंतर समाजाचं देणं फेडायला स्वत:च्या मर्जीने (कुणीही गाडी-घोड्याची व्यवस्था) केलेली नसताना लाखों लोकं न चुकता येतात हे जागतिक आश्चर्य नव्हे काय? बाबासाहेबांना पाहिलेल्या लोकांनी-त्यांच्या मुलांनी चैत्यभूमीवर येणं एकवेळ समजून घेता येईल. पण तिसरी आणि चौथी पिढी ही चैत्यभूमीवर का येते, ते ही तितक्याच आत्मियतेने हा अभ्यासाचा विषय असायला हवा.

शिवाजी पार्कात घाण करणाऱ्या जनतेवर टीका अनेकांनी केली असेल. नाकं मुरडली असेल. पण लाखोंच्या संख्येने येणाऱ्या लोकांना साध्या शौचालयांची व्यवस्था ही करू न शकलेल्या महापालिका आणि शासनाची मानसिकता नेमकी काय होती हे कुणीच कधी का तपासलं नाही? काही तरी बिघाड आपल्या मानसिकतेतच आहे, त्याचमुळे शिवाजी पार्कावरील लाखांची सभा पहिल्या पानावर हेडलाईन तर ६ डिसेंबरची गर्दी मागच्या पानावर कशाला छापली गेली असती.

मानसिकतेतला हा बिघाड केवळ ६ डिसेंबर पुरताच नाही. तो आपल्याला सतत आसपास दिसत असतो. कुठलीही द्वेषभावना वाढील लागू न देता सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या दिशेने बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या माध्यमातून प्रयत्न केले. आज पावलो-पावली आपल्याला जातीविद्वेष दिसतो, आरक्षणाचा टोमणा मारून गुणवत्ताही चॅलेंज केली जाते. माणसाला माणूस म्हणून स्वीकारण्याच्या भूमिकेकडे आपण अजून येऊ शकलो नाही. गप्पांमध्ये समानतेचा ढोल पिटणारे वास्तविक जीवनात आजही देशातील एका मोठ्या लोकसंख्येला मुख्य प्रवाहात येऊ द्यायला विरोध करतायत.

काही तरी बिघाड आपल्या मेंदूत जरूर आहे. जो आपल्याच देशातील एका मोठ्या लोकसंख्येला अजूनही दुय्यम नागरिक असल्यासारखं वागवण्याचा प्रयत्न करतो. हा बिघाड आपल्या मेंदूत खोलवर आहे. त्याचमुळे जातीय अत्याचाराच्या घटना कमी होऊ शकलेल्या नाहीत. त्याच मुळे रोटी-बेटी व्यवहारासाठी जातीच्या बाहेर पडायला कुणी तयार नाही. आता जात ही केवळ दलित-मागासवर्गीयांचीच समस्या राहिलेली नाही. तथाकथित उच्च जाती-पोटजातींच्या ही अस्मिता आता टोकदार झाल्या आहेत. धार्मिक उन्माद ही वाढीस लागला आहे. या देशाची जडण-घडण ज्या सहिष्णुतेवर आहे ती सहिष्णुता आज जणू एक शिवी झालीय.

देशाच्या अर्थव्यवस्थेला वळण लावण्याचं काम ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलं त्यांच्या पश्चात संपूर्ण आंबेडकरी चळवळीत तितका विद्वान कोणी झाला नसल्याचे टाळीबाज वाक्य अनेकांनी फेकली असतील, पण बाबासाहेबांच्या पश्चात या अर्थव्यवस्थेचं आपण काय केलं? रिझर्व बँके सारखी स्वायत्त व्यवस्था आपण तिचं स्वायत्तता टिकवू शकलो नाही, तिची स्वायत्तता आपल्या डोळ्यांसमोर गहाण टाकली गेली आणि आपण बघत बसलो.

अशा एक ना दोन, हजारों प्रश्नांचे आज आपण जबाबदार बनलो आहोत. आंबेडकरी जनतेची राजकीय चळवळ विस्कळीत झालीय हे मान्यच करावं लागेल, पण त्याचा अर्थ आंबेडकरी चळवळ संपलीय किंवा आंबेडकरी जनता संपलीय असा होत नाही. नवीन पिढी नव्या प्रकारे ही चळवळ पुढे घेऊन जाईल. जरूरी नाही ती रिपब्लिकन पार्टीच्याच माध्यमातून पुढे जावी. आज एकूणच आंबेडकरी जनता शिक्षणाच्या माध्यमातून नवनवीन क्षेत्रात पदार्पण करत आहे. नेतृत्व केवळ राजकारणातच चमकलं पाहिजे अशातल भाग नाही, विविध क्षेत्रात नेतृत्व उभं राहीलं पाहिजे. ते राहायला आता सुरूवात होतेय. अशा वेळी प्रश्न उपस्थित करणाऱ्या सर्वांनींच एका प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर दिलं पाहिजे, आपण या मार्गातले काटे तर होत नाहीयत ना.

या ६ डिसेंबर ला आपल्या मेंदूतला बिघाड शोधून तो दुरूस्त करूया. तीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरी आदरांजली ठरू शकते.

Updated : 5 Dec 2017 7:00 PM GMT
Next Story
Share it
Top