Home > रवींद्र आंबेकर > राहुल गांधींची सॉफ्ट हिंदुत्वाची यात्रा

राहुल गांधींची सॉफ्ट हिंदुत्वाची यात्रा

राहुल गांधींची सॉफ्ट हिंदुत्वाची यात्रा
X

राहुल गांधी यांच्या कैलास मानसरोवर यात्रेवरून बराच गदारोळ सुरू आहे. भारतीय जनता पार्टी ला वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींपेक्षाही राहुल गांधी यांच्या कैलास मानसरोवर यात्रेची जास्त चिंता आहे. त्याचमुळे भाजपाचे धुरंधर राहुल गांधी यांच्या फोटोमधल्या काठीच्या सावलीपासून ढगांचे आकार शोधत फिरतायत.

राहुल गांधींनाही देशासमोरील विविध प्रश्नांपेक्षाही धर्माचा शॉर्टकट जास्त भावलाय. आपल्या देशातील एकूण राजकारणात जात आणि धर्म यांचा पगडा किती घट्ट आहे हे यावरून दिसून येतं. २०१४ च्या निवडणूकीत नरेंद्र मोदीं यांची पोझीशन अतिशय स्ट्राँग असूनही त्यांनी प्रियांका गांधी यांच्या ‘नीच’ राजनीती वालं स्टेटमेंट जातीशी जोडून आपण खालच्या जातीतील आहोत म्हणून आपल्यावर टीका होतेय असा आरोप केला आणि निवडणूकांचा रंग पालटवला.

यंदाही देशात ज्या विविध समस्या आहेत त्यावर मोदींच्या कार्यकाळाच्या अवघ्या चवथ्या वर्षांत टीका व्हायला लागलीय. विविध तज्ज्ञ बोलायला लागलीयत. वाद झडायला लागलेयत. चर्चा होतेय. ज्यांनी छातीठोकपणे मोदी चमत्कार करतील असं सांगीतलं होतं ते आता कुजबुजत ‘ठीक आहे, अजून वेळ द्यायला पाहिजे’, असं म्हणत सर्व काही ठीक नाहीय असं मान्य करू लागलेयत. नरेंद्र मोदी यांच्या कामांपेक्षा त्यांच्या भक्तांचा दहशतवाद खूप मोठा आहे. माझं ठाम मत आहे, येत्या काळात जर मोदींचा ऱ्हास झाला तर तो त्यांच्या या भक्तांमुळे होणार आहे.

एखाद्या राजकीय पक्षाला जर देशात राजकारण करायचं असेल तर यापेक्षा सुपीक परिस्थिती काय असू शकते. मात्र असं असलं तरी पोल मॅनेजर्सच्या विळख्यात अडकलेले राजकीय नेते आणि पक्ष, सोयीच्या आणि मळलेल्या वाटेनेच नाविन्यपूर्ण पद्धीतने चालण्याचा अट्टाहास धरताना दिसतात. राहुल गांधी अशा विविध समस्यांनी ग्रासलेला देश आणि त्यातील देशबांधव मागे सोडून तीर्थ यात्रेवर निघाले. स्वत:ला शिवभक्त घोषीत केल्यानंतर, आपण जानवं धारी असल्याचं जाहीर करत, रक्तात ब्राह्मण डीएनए असल्याचा घोषा लावत आता काँग्रेसला धर्मच आपल्याला तारू शकतो असा साक्षात्कार झाला आहे.

भारतीय जनता पार्टीने संपूर्ण देशात आपले पंख पसरवयाला सुरूवात केली ती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर. इथला हिंदू सहिष्णु आहे, मात्र इतर पक्ष अल्पसंख्यांकांच्या नादी लागून हिंदूंवर अत्याचार करतायत असा प्रचार भारतीय जनता पक्षाने चालवला. त्यातच भारतीय जनता पक्षाने आरक्षणामुळे हिंदू हिताला बाधा येत असल्याचा प्रचार करत रान उठवून दिलं. या सर्व गदारोळात देशातील सेक्युलर विचारधारेचे पक्ष आणि विचारवंत यांचं पद्धतशीर खच्चीकरण होत गेलं. बरेच विचारवंत हे नवीन पिढीच्या आशा-आकांक्षा आणि विचारांपासून तुटलेले असल्याचं दिसून आलं. आपल्या विचारांची नव्या काळाप्रमाणे नव्याने मांडणी करणं गरजेचं आहे, हे न समजल्यामुळे अनेक पुरोगामी हे जड वागू-बोलू लागले. हा जड विचार तुलनेने हलका असलेल्या अति-हिंदुत्वासमोर ढेपाळला. नरेंद्र मोदींच्या यशात याचा मोठा वाटा आहे.

नरेंद्र मोदी सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत बोलतात. ते नाला गॅस सांगतात. नोटा बंद केल्यामुळे धनदांडग्यांचा काळा पैसा बाहेर येईल असं सांगतात. बाजारात मसाला घ्यायला गेल्यावर आपण थोडा कडीपत्ता, दोन मिरच्या जास्त टाक म्हणून सांगतो असं उदाहरण देऊन ते देशाचं अर्थकारण किती सोप्पं आहे याची मांडणी करतात. डाळी स्वस्त करणं चुटकी सरशी होऊ शकतं असं टीव्हीवरच्या मुलाखतीत मांडणी करतात. देशातील सर्व समस्या चुटकीसरशी सुटण्यासारख्या आहेत, सव्वाशे कोटी लोक एकत्र आले तर काय होऊ शकत नाही असा सवाल ते विचारतात, पण त्याचवेळी आपल्या संपूर्ण सत्ताकारणातून मुस्लीम आणि इतर घटकांना जाणीवपूर्वक लांब ठेवतात.

नरेंद्र मोदी हा देशासमोरील चकवा आहे. पण वास्तवात अपेक्षाभंग झालेल्या लोकांना चकव्याची तक्रार नसते. तितकाच टाइमपास झाला, नाहीतरी पुर्वी कुठे फार काही चांगलं होतं ही भावना सामान्य लोकांची आहे. नरेंद्र मोदी हे हिंदुत्वाच्या फॅक्टरीचे प्रॉडक्ट आहेत. या फॅक्टरीत हिंदुत्वाचा रावण घडवला जातो. जो रोज दहा तोंडांनी तुमच्या समोर येतो. हा रावण दुसऱ्यांच्या पोरी-बाळींनी काय घालायचं याचे फतवे जारी करतो. कुण्या आमदाराने मुलींच्या अपहरणाचं जाहीर वक्तव्य केल्यावर कान बंद करतो पण दुसऱ्या आरोपींवर लव्हजिहाद चा ठपका ठेवतो. कुणावरही गोहत्येचा आरोप लावून तो कुणाचाही जीव घेऊ शकतो, कुणाच्याही विज्ञानवादी बुद्धीला हा रावण पुराणातल्या कथा ऐकवू शकतो, हा कुणालाही धर्मभ्रष्ट ठरवू शकतो, कुणाच्याही जीव घेण्याचा फतवा काढू शकतो, हा सतत तुम्हाला एक शत्रू दाखवून घाबरवत राहतो.

या रावणाचा बिमोड करायचा असेल तर त्याच्याशी लढलं पाहिजे. त्याच्या समोर उभं ठाकलं पाहिजे. सध्या राहुल गांधींवर विरोधी पक्ष म्हणून ही जबाबदारी आहे. या देशाच्या राज्यघटनेत धर्मनिरपेक्षता या शब्दाचा समावेश याच सर्व धोक्यांना ओळखून झाला होता. आज धर्मनिरपेक्ष असणं ही शिवी झालीय. अशावेळी राहुल गांधी यांनी धर्मनिरपेक्षतेच्या रक्षणार्थ उभं ठाकलं पाहिजे. जानवं, आणि सॉफ्ट हिंदुत्वाचं कव्हर घेणं म्हणजे प्रतिक्रीयावादी होणं आहे. यामुळे राहुल गांधी फारतर चर्चेत राहतील, निवडणूक ही जिंकतील, पण या देशाची बांधणी च्या चौकटीवर झालीय त्या चौकटीला जे धक्के पोहोचलेयत त्याच्या रक्षणाचं काय... आज ती चौकट टिकणं गरजेचं आहे.

आज धर्मनिरपेक्षता ही जरी शिवी वाटत असली, तरी भारताची पुढची प्रगती याच वाटेवरून होऊ शकते. त्याला अन्य पर्याय नाही.

- रवींद्र आंबेकर

Updated : 9 Sep 2018 7:21 AM GMT
Next Story
Share it
Top