पंतप्रधान हरवलाय...
Max Maharashtra | 17 May 2019 5:44 AM GMT
X
X
देशाचा पंतप्रधान हरवलाय. होय, गेली पाच वर्षे सतत कुठल्या ना कुठल्या निवडणुकांमध्ये व्यग्र असलेले देशाचे पंतप्रधान सध्या हरवलेले आहेत. कधी कधी ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा चष्मा पळवतात, तर कधी चरखा.. त्यांच्या कोट्यवधी रूपयांच्या आलिशान लाइफस्टाइल मध्ये गांधी कुठेच बसत नाही. त्यांनी गांधींचा चष्मा पळवलाय पण त्यांना गांधींचं चरित्र आणि चारित्र्य घेता आलेलं नाही. गांधींवर हल्ला होत असताना सोयीस्कररित्या ते गायब झालेयत.
नरेंद्र मोदी, देशाचे पंतप्रधान... ते आपल्या राजकीय कार्यक्रमांमध्ये बिझी असल्याने देशाच्या ज्या व्यक्तिंचा- प्रतिकांचा जगभर गौरव केला जातो, त्या प्रतिकांवर त्यांच्याच समर्थकांनी हल्ला चालवलेला असताना ते सोयीस्कररित्या मौन घेऊन बसलेयत.
पश्चिम बंगालमध्ये ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रतिमेचं भाजपा कार्यकर्त्यांनी नुकसान केल्याच्या घटने पाठोपाठच भाजपच्या उमेदवार आणि मालेगाव बाँबस्फोटातील आरोपी प्रज्ञासिंह यांनी नथुराम गोडसेला देशभक्तीचं सर्टीफिकेट देऊन टाकलं. मोदींची चमची अशी ज्यांची ओळख आहे अशा मधु किंश्वर यांनी तर गोडसे हत्या केल्यानंतर पळून गेला नाही, त्याचं धैर्य अतुनलीय होतं असं सांगत गोडसेचे गोडवे गायलेयत. हे सगळं अशा विचारधारेचे लोक करतायत ते रोज जाहीराती देऊन देऊन देऊन राष्ट्रपिता महात्मा गांधींचा उदो-उदो करतायत. जे सांगतात की आम्हाला गांधी प्रातःस्मरणीय आहे. जे परदेशात गेल्यावर गांधी तत्वज्ञानाची पुस्तकं इतर राष्ट्राच्या प्रमुखांना भेट देतात, जे गांधींच्या नावाची स्वच्छता मोहीम राबवतात...
यांच्या डोक्यातून गांधी कधीच गेला नव्हता. गांधींची हत्या केल्यानंतर गांधी खरतर अमरच झाले. त्यामुळे गांधीहत्येनंतरची गांधीविचारांची हत्या करण्याची सुपारीच संघ आणि संघप्रणित संघटना-पक्षाने घेतलीय. त्याचमुळे सातत्याने अशा प्रकारचे हल्ले या लोकांकडून होत आहेत. एकाने हल्ला करायचा, लगेच दुसऱ्याने सारवासारव करायची, तिसऱ्याने दुःख व्यक्त करायचं पण पहिला कसा बरोबर होता हे सांगत राहायचं, चवथ्याने मेलेला माणूसच कसा वाईट होता याची परत मोहीम राबवायची आणि मग शेवटी संघ आणि भाजपाने या सगळ्यांशी आपला काही संबंध नाही, पण उपस्थित झालेले मुद्दे खरे आहेत, त्याची चर्चा होणे आवश्यक आहे, ७० वर्षात खोटा इतिहास शिकवला असा राग आळपत राहायचं.. एकूण काय.. तर मारला गेलेला माणूस, त्याचं नाव आम्ही वापरत राहणार, पण तो योग्य नव्हता हे ही सांगत राहणार. त्याला मारणारा किती ग्रेट होता हेच आम्ही सांगणार. असलं काम अतिशय नीच तसंच गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकच करू शकतात. ज्यांच्या मनात इतकं कपट भरलंय त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा हा मोठा प्रश्न खरं तर उपस्थित व्हायला हवा.
खरंतर प्रश्न कुणासमोर उभा करायचा, ज्यांना प्रश्न विचारायचा ते पंतप्रधान नरेंद्र मोदी हरवले आहेत. मध्ये मध्ये ते आंबा कसा खायचा सांगायला भेटतात, पर्स का वापरत नाहीत हे सांगायला येतात, पण माणसं का मारली जातात, माणसं मारल्यावर दुःख का होत नाही हे सांगायला ते उपलब्ध होत नाहीत. हरवला आहे, हरवला आहे.. चरखा चालवणारा हा फाइव्ह स्टार मॉडेल हरवला आहे.
- रवींद्र आंबेकर
Updated : 17 May 2019 5:44 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire