Home > रवींद्र आंबेकर > वाजपेयींच्या मृत्यूची वाट पाहणाऱ्या वृत्तवाहिन्या…

वाजपेयींच्या मृत्यूची वाट पाहणाऱ्या वृत्तवाहिन्या…

वाजपेयींच्या मृत्यूची वाट पाहणाऱ्या वृत्तवाहिन्या…
X

१४ ऑगस्ट पासूनच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाच्या अफवा पसरत होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कार्यकालातील अखेरचं ध्वजारोहण लालकिल्यावरून होणार म्हणून अटल बिहारी यांच्याबद्दल माहिती १६ तारखेलाच दिली जाईल असं दिल्लीतून सूत्रांकडून सांगण्यात येत होतं.

लाल किल्लावरून नरेंद्र मोदी यांचं भाषण संपल्या संपल्या वाजपेयी यांच्याबद्दल च्या बातम्या पुन्हा सुरू झाल्या. १६ तारखेला तर सर्व वृत्तवाहिन्या सकाळपासून जणू काही वाजपेयी यांचं निधन झालंय आणि जाहीर केलं जात नाहीय, पण आम्ही तुम्हाला सर्वांत आधी ही बातमी देतोय अशा अविर्भावात कव्हरेज करत होत्या. चर्चेत येणाऱ्या सर्वच पाहुण्यांना आठवणी विचारल्या जात होत्या. ब्रेकींग न्यूज देण्यासाठी उताविळ असल्याचाच भाव या अँकर लोकांच्या चेहऱ्यावर होता. खुर्चीत उड्या मारत, जोरजोरात ओरडत वाजपेयींच्या तब्येतीची बातमी दिली जात होती.

एका प्रतिष्ठीत राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर काही पाहुण्यांनी तर वृत्तवाहिनीच्या अँकरला चार पाच वेळाआप अटकले मत लगाइएअसा सल्लाच दिला. परिस्थिती जर ठीक असती तर त्या पाहुण्याने अँकरला झापलंच असतं. खरंतर अँकरींग हा या जमातीचा व्यवसाय आहे. न्यूज स्टुडीयोतील फारच कमी अँकर्सनी फिल्डवर काम केलेलं आहे. त्यामुळे ते थेट अँकरींगचं ट्रेनिंग घेऊनच येतात, त्यांना आवाजातले चढउतार, स्टोरीचा मूड सर्व समजतं. एखादी व्यक्ती मरणार आहे, किंवा मेलेली आहे असं सांगण्याचा उताविळपणा अँकरनी का करावा, की न्यूज चॅनेल्सचे संपादकच त्यांना तसं ब्रीफ देतायत.. ?

मी स्वत: फिल्ड आणि स्टुडीयो अशा दोन्ही ठिकाणी काम केलंय. रिपोर्टर म्हणून आजारी, किंवा मृत्यूशय्येवर असलेल्या अनेक व्यक्तिमत्वांच्या आरोग्याबाबत रिपोर्टींग ही केलंय. त्यावेळेस मर्यादीत माहितीवर तासन् तास बोलायचं कसब रिपोर्टर ला पाळावं लागतं. अनेकदा मेडीकल बुलेटीन जारी व्हायला वेळ असतो किंवा होतच नाहीत, अशा वेळी बुलेटीन येण्याच्या वेळेच्या आधी पासून लाइव्ह साठी उभं राहावं लागतं, आणि अंदाज व्यक्त करावे लागतात, की मेडीकल बुलेटीन मध्ये नेमकं काय आहे. लाइव्ह कनेक्ट असल्यामुळे ताजी माहिती मिळत नसते आणि स्टुडीयो ला तर सर्व सांगावं लागतं. ही कसरत करताना प्रचंड संयम आवश्यक असतो.

मला आठवतंय एका राष्ट्रीय वाहिनीच्या संपादकाने प्रमोद महाजन मुंबईच्या हिंदुजा रूग्णालयात भर्ती असताना त्यांच्या शरीरात गोळ्या कशा गेल्या, कशा फिरल्या, मग आत त्यांनी कशी दिशा बदलली याचं खूप मोठं विश्लेषण केलं होतं. वास्तविक त्या संपादकाचं रूग्णालयात कुणाशीच बोलणं झालं नव्हतं, फक्त आधीच्या मेडीकल बुलेटीन मध्ये गोळी बरगडीला लागल्याची माहिती समोर आली होती, त्यावरून त्या संपादकाने अंदाज बांधून सर्व चित्र रंगवलं होतं.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या बाबतीतही असंच काहीसं होताना दिसलं.

Updated : 16 Aug 2018 9:43 AM GMT
Next Story
Share it
Top