सत्ता भिनली..

सत्ता भिनली..
X

सत्ता भिनली की ती काय करू शकते. याचं प्रदर्शन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी घडवून आणलं आहे. नागरी समस्या मांडणाऱ्या महिलेचा हात पिरगळावा इतक्या थराला महापौर पोहोचले. मुंबई या देशाच्या आर्थिक राजधानीचे महापौर लोकांशी असे वागतात, हे धक्कादायक आहे.

राज्याच्या काही भागांमध्ये पूर आहे, काही भागांमध्ये दुष्काळ, अशा वेळी राज्याचे मुख्यमंत्री राजकीय दौऱ्यांवर राहतात. मदत आणि बचाव कार्यावर दुरून आणि बारीक लक्ष ठेवतात. जनतेला वाऱ्यावर सोडून प्रचार करतात. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या आधी शेतकरी विष प्राशन करतात, पंतप्रधानांनी तारिफ केलेल्या शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ येते. हे ही धक्कादायक आहे.

राज्यात सत्ताधारी अशापद्धतीने वागतात आणि राज्यातील मेनस्ट्रीम माध्यमं वाहवाही मध्ये गुंतलेली असतात. पाकिस्तानमधल्या नागरिकांनी काश्मिरी मुलीशी लग्न केलं की त्यांना नागरिकत्व मिळतं पण भारतीयांना मिळत नाही अशा बातम्या पसरवण्यात बिझी असतात. हे ही धक्कादायक आहे.

धक्कादायक गोष्टी आसपास घडत असताना लोक शांतपणे बघत बसतात. सत्ता सर्वशक्तिमान आहे, ते काहीही करू शकतात असं मानून सत्तेला प्रश्न विचारायचं सोडून देतात. विरोध करत नाहीत, प्रतिकार करत नाहीत, मत व्यक्त करत नाहीत.. हे ही धक्कादायक आहे.

लोकांच्या मतांचे विश्वस्त बनलेले त्यांना गृहीत धरतात, आणि लोकांच्या असंतोषाचं जनक ज्यांनी व्हायला पाहिजे ते सत्तेचे गुलाम होतात. राज्यातला विरोधी पक्ष अजूनही मनाने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर बसलेला आहे. तो खाली उतरलेला नाही. त्याच्या पायाला पुराचा चिखल आणि दुष्काळातल्या जमीनीच्या भेगा लागत नाहीत हे सगळ्यात जास्त भयानक आहे.

महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाची जी दुर्दशा झाली आहे, ती बघता मला लोकशाहीची जास्त चिंता वाटायला लागली आहे. सत्ताधारी जसे विश्वस्त आहेत तसेच सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवायला, प्रश्न विचारायला विरोधी पक्षालाही त्याच विश्वस्ताचा दर्जा मिळालेला आहे. या राज्यात आधी विरोधी पक्षच सत्तेत सहभागी झाला, नंतर विरोधी पक्षनेता ही... एकाच कार्यकाळात दोन विरोधी पक्षेनेते सत्तेत सहभागी झाले. लोकांनी आता विरोधी पक्ष म्हणून विश्वास कुणावर ठेवायचा. विरोधी पक्षांनी लोकांशी लोकभावनेशी प्रतारणा केली आहे.

ज्यांना कायम विरोधी पक्ष मानलं जातं त्या माध्यमांनी तर आपला अजेंडा कधीच बदललेला आहे. काँग्रेसच्या काळात काँग्रेसच्या बाजूने भाजपाच्या काळात भाजपाच्या बाजूने.. सरशी तिथे आपण असलं पाहिजे अशी माध्यमांची भूमिका आहे. काही अपवाद आहेत, पण त्यांचा आवाज क्षीण आहे. जबाबदार सत्ताधारी, विरोधी पक्षातील नेते, माध्यमं यांचा आवाज क्षीण होणं देशाला परवडणारं नाही. आज एका विचित्र स्थितीत आपण सापडलो आहोत. प्रत्येक मुद्द्याला राष्ट्रवादाचं कव्हर आहे, त्यामुळे व्यवस्थेला प्रश्न विचारणं राष्ट्रद्रोहाच्या बरोबरीचं झालंय. अशा परिस्थितीत कुणी कुणाचा हात पिरगळावा, कुणा कुणाची जीभ... कुणी कुणाचे विचार.... कुठूनच काहीही प्रतिक्रीया येत नाही. हे खरंच धक्कादायक आहे.

Updated : 8 Aug 2019 3:04 AM GMT
Next Story
Share it
Top