Home > रवींद्र आंबेकर > निष्ठावंत कार्यकर्ते हीच खरी अडगळ

निष्ठावंत कार्यकर्ते हीच खरी अडगळ

निष्ठावंत कार्यकर्ते हीच खरी अडगळ
X

काँग्रेसयुक्त भाजपा ची पुन्हा सुरूवात झालेली आहे. काँग्रेस हा तकलादू आणि राजकीय सोयीचा विचार आहे, त्यावर त्यांच्याच नेत्यांचा, त्यांच्या मुलांचा विश्वास नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.

भारतीय जनता पक्षाला पहिल्यापासून वैचारिकतेशी काही देणं घेणं नसल्यामुळे त्यांना कुठल्याही पक्षाचा जिंकून येण्याची क्षमता असलेला नेता चालतो.

नेत्यांच्या पक्षांतरामुळे कार्यकर्त्यांची गोची होते अशा बऱ्याच पोस्ट वाचल्या. मला तसं वाटत नाही, गोची झालेले कार्यकर्ते पक्षाने दिलेल्या उमेदवारांचं इमानेइतबारे काम करतात. कार्यकर्ते जर पक्षाच्या विचारधारेवर चालणारे असतील तर ते अशा पद्धतीने आयात केलेले उमेदवार स्वीकारणार नाहीत, पण तसं कधी होताना दिसत नाही. राजकीय कार्यकर्ते हे बव्हंशी संधी साधूच असतात. जे प्रामाणिक-निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांची प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर असल्याने पक्षासाठी तेच अडगळीचे वाटत असतात. असे निष्ठावंत कार्यकर्ते हीच पक्षाची गोची आहे.

भारतीय जनता पक्षाने काँग्रेसच्या घराणेशाहीवर वेळोवेळी जोरदार हल्ला चढवलाय, पण काँग्रेसच्या घराण्यांना मात्र रेड कार्पेट अशी भाजपची नीती आहे. भाजपच काय, इतर पक्षांनाही राजकीय अस्पृश्यतेचा विचार मान्य नाही, त्यामुळे जे पक्ष भ्रष्टाचारी-जातीयवादी-देशद्रोही म्हणून टीका केली जाते ते पक्षांतरानंतर एकदम धुतल्या तांदळासारखे स्वच्छ होऊन जातात. जे नेते चोर-दरोडेखोर असतात ते पक्षांतरानंतर पवित्र होऊन जातात. निवडणुका ये राजकीय शुद्धीकरणाचं वॉशिंग मशीनच झालंय.

देशाच्या राजकारणात पक्षांतरांची पद्धत काही नवी नाही. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलायचा, पक्ष बदलल्या बदलल्या लगेच तिकीट, पक्षाची यंत्रणा दिमतीला.. हे सर्व आपोआप होत नाही. गणितं आधीच ठरलेली असतात. बोलणी आधीच झालेली असतात. इथे तिकीट नाही मिळालं तर तिथे.. ही नेत्याची भूमिका ठरलेली असते. त्याची पेरणी आधीच झालेली असते, म्हणून नेता अगदी शेवटच्या क्षणांपर्यंत निवांत असतो.

जिंकण्याची शाश्वती असलेले उमेदवार जसे पक्षाला हवे असतात तसे सत्तेवर कुठला पक्ष येऊ शकतो त्याकडे उमेदवारांना जायचं असतं. या सगळ्या गडबडीत कार्यकर्त्याला गृहीत धरलेलं असतं. निवडून येण्याची क्षमता ही पैसे खर्च करण्याच्या क्षमतेशी निगडीत असल्याने सामान्य कार्यकर्त्याला काहीच बोलायची संधी नसते.

भारतीय जनता पक्षाने काँग्रेसच्या घराणेशाहीवर वेळोवेळी जोरदार हल्ला चढवलाय, पण काँग्रेसच्या घराण्यांना मात्र रेड कार्पेट अशी भाजपची नीती आहे. भाजपच काय, इतर पक्षांनाही राजकीय अस्पृश्यतेचा विचार मान्य नाही, त्यामुळे जे पक्ष भ्रष्टाचारी-जातीयवादी-देशद्रोही म्हणून टीका केली जाते ते पक्षांतरानंतर एकदम धुतल्या तांदळासारखे स्वच्छ होऊन जातात. जे नेते चोर-दरोडेखोर असतात ते पक्षांतरानंतर पवित्र होऊन जातात. निवडणुका ये राजकीय शुद्धीकरणाचं वॉशिंग मशीनच झालंय. अशा वेळी निष्ठावंत कार्यकर्ता हाच खरी अडचण ठरू लागलाय.

- रवींद्र आंबेकर

Updated : 12 March 2019 12:06 PM GMT
Next Story
Share it
Top