Home > रवींद्र आंबेकर > नोटबंदीने काळ्याचं पांढरं झालं का..?

नोटबंदीने काळ्याचं पांढरं झालं का..?

नोटबंदीने काळ्याचं पांढरं झालं का..?
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तडकाफडकी नोटबंदी केली आणि देशातील काळापैसा, दहशतवाद आणि नक्षलवाद एका क्षणात संपुष्टात आला. देशात प्रामाणिकपणा वाढीस लागला. कर देणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली, वाहनं घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली, विमानप्रवासात वाढ झाली, कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या खात्यांमध्ये वाढ झाली, जनधन खात्यांमध्ये वाढ झाली... इ.इ..

रोज नवनवे आकडे तोंडावर मारून विरोधकांची बोलती बंद करत या सरकारने नोटबंदी कशी यशस्वी झाली याचा ढोल वाजवत ठेवला. या ढोलाच्या आवाजात या देशातील बेरोजगार झालेले असंघटीत कामगार, बुडालेले छोटे-मध्यम उद्योग, गरीब यांचा आवाज दबून गेला. कुणी आवाज उठवण्याचा प्रयत्न केलाच तर त्याला काळा पैसै वाला, काँग्रेसवाला म्हणून हिणवणं सुरू झालं. देशात खूप काळा पैसा असून लाखों कोटींचा काळा पैसा ‘कागज का टुकडा’ होऊन गेला असं खुद्द पंतप्रधानांनी सांगीतलं. देशाची करन्सी कागज का टुकडा करून टाकायला ५६ नाही ५६० इंचाचीच छाती लागत असावी, नाही तर तीन चार फुटांची जीभ. सात-आठ इंचाचा मेंदू असलेला माणूस असं करूच शकत नाही, असं माझं मत आहे.

रिजर्व बँक ऑफ इंडियाने जाहीर केलंय की ९९.३ टक्के नोटा परत जमा झाल्यायत. या सर्व नोटबंदीच्या कामात १६ हजार कोटींचा चुराडा झाला म्हणे. झोपलेला राजा आणि माकडाच्या हातात तलवार वाली गोष्ट मी लहानपणी खूप वेळा वाचलीय. मला खूप गंमत वाटायची. असं कधी होऊ शकतं का. एखादा राजा माकडाच्या हातात कशाला तलवार देईल ना.. राजाला अक्कल असते. तो हुशार असतो. स्टोऱ्या लिहिणारे काही-बाही लिहितात असं वाटायचं मला. माझं अख्खं बालपण असं वाटण्यात गेलं.

गेल्या काही दिवसांत मला ती स्टोरी खरी वाटायला लागलीय. खासकरून जेव्हा जेव्हा मतदार’राजा’ … मतदार’राजा’ …लिहिलेल्या जाहिराती समोर येतात.

-रवींद्रआंबेकर

Updated : 29 Aug 2018 10:41 AM GMT
Next Story
Share it
Top