Home > रवींद्र आंबेकर > अशा प्रार्थनास्थळांचा बहिष्कार करा...

अशा प्रार्थनास्थळांचा बहिष्कार करा...

अशा प्रार्थनास्थळांचा बहिष्कार करा...
X

या देशामध्ये नारीला देवीचं स्वरूप मानण्यात येतं. एकीकडे नारीला आदिमाया, आदिशक्ती अशी विविध विशेषणं चिटकवून दुसरीकडे तिला साधं माणूस म्हणून अधिकार नाकारला गेलाय. हा देश विषमतेने भरलेला आहे. या देशाला ही विषमता गौरवशाली परंपरा म्हणून मिरवायला ही बरं वाटतं. विषमता मिटवावी या साठी विविध ठिकाणी सध्या महिलांचे लढे सुरू आहेत. कोर्ट-कचेऱ्या सुरू आहेत. महिलांच्या या सर्व लढ्यांना माझा मनापासून पाठींबा आहे. कुठल्याही धर्माचं प्रार्थनास्थळ असो, तिथे विषमता असेल तर ती मिटली पाहिजे. त्याही पुढे जाऊन मला असं मांडावंस वाटतं की विषमता जपणाऱ्या – जोपासणाऱ्या ज्या ज्या संस्था, प्रथा, रूढी-परंपरा, देवस्थानं असतील त्यांचा त्याग करण्याची तयारी ही महिलांनी आता ठेवली पाहिजे.

माझा व्यक्तीश: देव या संकल्पनेवर विश्वास नाहीय, तरी सुद्धा ज्यांची श्रद्धा आहे त्यांनी केलेली देवाची मांडणी ही निर्विकार, निराकार, निर्गुण वगैरै वगैरे असेल तर तो देव विकारांनी ग्रासलेला कसा असेल. त्याला महिलांचा विटाळ कसा असेल. त्याला अस्पृश्यतेची भावना कशी रूचत असेल. जर देव गाईच्या मूत्रात आणि शेणातही वास करत असेल तर त्याला अख्खी जीवंत महिला का पटत नसेल. याचं चिंतन करण्याची गरज आहे.

सर्वांना उपासनेचा अधिकार राज्यघटनेने दिला आहे. माणुसकीच्या न्यायाने ही हा सयुक्तिक विचार आहे. उपासनेचा अधिकार कुणाला कमी-कुणाला जास्त असू शकत नाही. कुणाच्या धार्मिक भावनांमध्ये कुणाला अडसर उत्पन्न करण्याचा अधिकार नाही, आपल्या उपासनेचा दुसऱ्यांना त्रास होणार नाही याचीही काळजी घेतली गेली पाहिजे. जात-लिंग-धर्म-पंथ याच्या पलिकडे जाऊन सर्वांना माणूस म्हणून मान्यता दिली गेली पाहिजे. समान हक्कासाठी वेळोवेळी जे लढे पुकारले गेले आहेत त्यांची मुख्य मागणी ही माणून म्हणून मान्यता मिळण्याचीच आहे. शबरीमाला मंदिर असो, हाजीअली दर्गा असो, शनी शिंगणापूरचा चौथरा असो धार्मिक मान्यतांपुढे माणूस म्हणून मान्यतेच्या विचारांचा संकोच करता येणार नाही.

आपल्या हक्कांचे लढे महिलांनी सुरूच ठेवले पाहिजेत. मुलभूत हक्क-अधिकारांसाठी महिलांना मोठा संघर्ष आजही करावा लागतोय ही शोकांतिकाच आहे. दिवसेंदिवस हा झगडा वाढत जाणार आहे. अशा परिस्थितीत महिलांनी आता कात टाकली पाहिजे. देवदेवस्थानांमधला प्रवेश प्रातिनिधीक म्हणून ठिक आहे. हे साध्य असता कामा नये. विषमता पाळणाऱ्या देवस्थानांमध्ये प्रवेशाचा मार्ग मोकळा करून घेतल्यानंतर महिलांनी आता अशा देवस्थानांवर बहिष्कार टाकून पुढे निघालं पाहिजे. हा देश सावरण्याची शक्ती जर कुणात असेल तर ती महिलांमध्येच आहे. ती शक्ती नीट वापरली गेली पाहिजे.

- रवींद्र आंबेकर

Updated : 18 Oct 2018 12:18 PM GMT
Next Story
Share it
Top