Home > मॅक्स ब्लॉग्ज > अग्रलेख > खराब रस्ते, जबबादारी कुणाची ?

खराब रस्ते, जबबादारी कुणाची ?

खराब रस्ते, जबबादारी कुणाची ?
X

महाराष्ट्रातील रस्त्यांच्या दुर्दशेबद्दल सामान्य माणसं सतत बोलत होती. पण सरकार दररोज रस्तेनिर्मितीची जी आकडेवारी सांगत होतं. त्यावरून सामान्य माणसाला भ्रम निर्माण झाला की आपली तक्रार योग्य आहे की अयोग्य. कदाचित आपल्याच घरासमोरचा रस्ता खराब असेल, आणि राज्यातले सुधारलेले असतील तर सरकारला दोष का द्यावा. पण या भ्रम-वंचना आणि चिंतेतून सरकारच्या समर्थक काही सेलिब्रिटींनी सामान्य माणसांची सुटका केली आहे.

सरकारची मनापासून तारिफ करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी कल्याण-डोंबिवलीच्या खराब रस्त्यांबाबत टीका केली आहे. या शहराला स्मार्ट सीटी करायचा विडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उचलला होता. त्यांची या शहराला विशेष पॅकेज देण्याची घोषणा आजही या शहरासाठी व्हेंटीलेटरचं काम करत आहे. खराब रस्त्यांमुळे हे पॅकेज पोहोचायला वेळ लागतोय असे ही जोक्स सध्या व्हायरल आहेत. कल्याण-डोंबिवलीमध्ये सत्ताधारी पक्षाला अपेक्षित असलेला मराठी, त्यातला त्यात हिंदू माणूस राहतो. त्यामुळे तरी या शहरावर विशेष कृपा होईल असा प्रचंड आत्मविश्वास इथल्या लोकांना होता. काही टिपीकल लोक तर नागरी समस्यांवर बोट ठेवलं तर मिळेल त्या माध्यमांमधून अंगावर यायचे. अशा या आक्रमक कल्याण – डोंबिवलीकरांना गेल्या काही दिवसांपासून आपण वंचित राहिल्याची भावना सतावत आहे. सोशल मिडीयावर डोम्बोंली, कल्याण-डोंबिवली, डोंबिवली यावर अनेक व्हिडीयो-मिम्स व्हायरल आहेत. आओ कभी डोम्बोली असं आजकल मुद्दाम छेडण्यासाठी बोललं जातं.

प्रशांत दामले एकटेच नाहीत. नाटकांच्या निमित्ताने राज्यभर फिरणाऱ्या सगळ्याच कलाकारांनी राज्यातल्या रस्त्यांच्या स्थिती वर बोलायला सुरूवात केली आहे. भाजपाच्या सगळ्यात पॉप्युलर ट्रोल शेफाली वैद्य यांनी ही पुण्याच्या रस्त्यांवरून मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी यांना ट्वीट करून नाराजी व्यक्त केली. बरेच दिवस त्यांनी हे नाराजीचं ट्वीट पीन ही करून ठेवलं होतं, पण हाय.... त्यांना सरकार दरबारातून कुणीच उत्तर दिलेलं टाइमलाइनवर तरी दिसलं नाही. वैयक्तिक संपर्क करून त्यांचं समाधान केलं गेलं असेल तर पुण्याच्या रस्त्यांवर मात्र तसं काही झालेलं दिसलं नाही.

मुंबई महापालिकेत शिवसेनेची निसटती सत्ता आहे, आणि प्रशासनावर भाजपाचं निर्विवाद वर्चस्व. असं असूनही मुंबईत खड्ड्यांमुळे दहा लोकांना जीव गमवावा लागला आहे. आंतरराष्ट्रीय शहरात, आर्थिक राजधानीत काम करणाऱ्या या श्रम-लष्कराचे अब्जोवधी रूपयांचे श्रम वाहतूकीच्या कोंडीत वाया जातात. त्याची गणती एकदा श्वेतपत्रिका काढून करायला हवी. विविध कारणांनी मुंबई वारंवार बंद होते, याचं नुकसान ही मोजलं पाहिजे. वाहनांचे अपघात, त्यातून होणारं नुकसान, आजारपण, प्रदूषण इ इ गोष्टींवर ही लक्ष दिलं पाहिजे. या समस्यांवर मेट्रो-मोनो आहे, त्याला विरोध करू नका असा ही एक सूर असतो. मात्र, चेंबूर ला मोनोच्या कामामुळे पडलेले खड्डे मोनो सुरू झाल्यानंतर दोन वर्षांनंतरही तसेच आहेत. वडाळ्याला मोनोच्या खांबांमुळे रस्त्यांची उंची मध्येच वाढल्याने अर्धा रस्ता वापरयोग्य राहिलेला नाही. काही ठिकाणी या खांबांमुळेच वाहतूकीची समस्या होते. मेट्रोच्या खालीही अंधारच आहे. अंधेरीमध्ये मेट्रोच्या खालच्या रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे.

एकूणच खराब रस्ते हा मोठा गंभीर विषय आहे. यावर कंत्राटदारांना दोषी धरून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचं कठोर पाऊल सरकारने उचललं पाहिजे. सगळ्याच अपघातांना वाहनचालक किंवा पादचारी जबाबदार नसतात. खराब रस्ते ही असतात. प्रशासनातील अधिकाऱ्यांवर पण दोष निश्चित झाला पाहिजे.

प्रशांत दामले, शेफाली वैद्य यांचं मला अभिनंदन करायचं आहे. जे वाईट ते वाईट बोलायला हिंमत लागते. ती हिंमत तुम्ही दाखवली. हा आवाज योग्य ठिकाणी पोहोचून यंत्रणा कामाला लावण्याचं काम आता सरकार-प्रशासनाचं आहे.

Updated : 18 Sep 2019 5:09 AM GMT
Next Story
Share it
Top