Home > रवींद्र आंबेकर > साहित्यिक आहात की ‘मांडवली भाई’

साहित्यिक आहात की ‘मांडवली भाई’

साहित्यिक आहात की ‘मांडवली भाई’
X

नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करण्यामागे बोलविता धनी कोणीतरी वेगळाच असल्याची बातमी सर्वप्रथम मॅक्समहाराष्ट्र ने दिली होती. श्रीपाद जोशी यांनी फक्त बैलासारखं इंग्रजी ड्राफ्ट केला होता. ड्राफ्ट करतानाच त्यांचा स्वाभीमान का नाही जागला, कारण साफ आहे, संमेलनाच्या आर्थिक नाड्या आवळल्या जातील अशी भीती घालण्यात आल्याने महामंडळाने सहगल यांचं निमंत्रण रद्द केलं.

दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्यांसारखीच ही पण एक वैचारिक हत्याच आहे, असं आम्ही आधीच म्हटलं होतं. इतर हत्या झाल्यानंतर आपण हजारोंच्या संख्येने मोर्चे काढून मारेकऱ्यांचा निषेध केला, आता याच विचारधारेने साहित्यिकांच्याच बैठकीत दिवसा-ढवळ्या हत्या केल्यानंतर आमचे साहित्यिक ‘रसपान’ करण्यात गुंतलेले आहेत. नयनतारा सहगल यांचं निमंत्रण आर्थिक नाड्या आवळल्या जातील या भीतीपोटी रद्द करणे ही हत्याच आहे, आणि या वेळी ती हत्या साहित्यिकांच्या बंदूकीने झालीय. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ ठरलाय. हे जास्त गंभीर आहे.

शेतकऱ्यांची थट्टा

राज्यातील सर्वांत जास्त शेतकरी आत्महत्या झालेल्या यवतमाळ मध्ये साहित्य संमेलन भरवत असताना साहित्यिकांना इथल्या वेदनांचा आसरा आपली लाज वाचवायला घ्यावीशी वाटली हे ही अत्यंत निषेधार्ह आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीला हा मान (?) देण्याचं दातृत्व अचानक महामंडळाला सुचलं. मला कळत नाही, पापक्षालन करण्यासाठी महामंडळ किती पापं करणार आहे. जर तुमची प्रामाणिक भूमिका असती तर तुम्ही सुरूवातीलाच आत्महत्यांच्या मुद्द्यावर संवेदनशीलता दाखवली असती, असं ऑप्शन म्हणून हा विषय पाहिला नसता. आता कोणच नाही तर बोलवा अशा पद्धतीचं हे वागणं म्हणजे समस्त शेतकऱ्यांचा अपमानच आहे. मराठीतले साहित्यिक जर संवेदनशील असते तर संमेलनासाठी सरकारचा निधी नाकारून शेतकऱ्यांच्या बांधावर हे साहित्य संमेलन भरवलं असतं. आणि या बांदावरच्या संमेलनाला जर नयनतारा सेहगल आल्या नसत्या तर त्यांच्यावर टीकेची झोड उठवता आली असती. यवतमाळ मध्ये मी अनेकदा आत्महत्याग्रस्त गावांना भेटी दिल्या आहेत. मराठी साहित्यिकांनी एक दिंडी या गावांमध्ये काढली असती तर त्यांना सरकारचे पैसै किती क्षुल्लक आहेत याची जाणीव झाली असती. इथे दोन-पाच हजारांसाठी ही शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. पैशापैक्षा जास्त लाख मोलाचे जीव इथे सरकारी व्यवस्थेने आणि अनास्थेने मारलेले आहेत. त्या मारेकऱ्यांच्या पैशाची इतकी चिंता तुम्हाला वाटलीच नसती.

साहित्यिक आहात की मांडवली भाई

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरूणा ढेरे यांनी या संपूर्ण वादावरची आपली भूमिका वेळीच स्पष्ट करायला हवी होती. बूँद से गई वो हौद से नहीं आती, अशी म्हण आहे. तुम्ही आता लाख बोलाल, पण इतिहास कायम तुमच्या मौनावरच भाष्य करेल. जेव्हा वेळ असते तेव्हाच बोललं पाहिजे, वेळ गेल्यावर खूप लोकं बोलतात, त्याला किंमत नसते. जेव्हा कुणाची हिंमत नसते बोलायची, तेव्हा जे आवाज उठवतात, तेच खरे बहाद्दूर. आपल्या डोळ्यादेखत झालेल्या विचारांच्या हत्येवरही तुम्ही जर बोलणार नसाल, तर काय उपयोग आहे. तुमच्या मोठेपणाचा. दरवेळेस असं काही झालं की चार-दोन विद्रोही साहित्यिकांनी बोलायचं, मोर्चे काढायचे आणि इतर बोलघेवड्या साहित्यिकांनी सामोपचाराने विषय मिटवण्याची पत्रकं काढायची, अरे तुम्ही साहित्यिक आहात की ‘मांडवली भाई’

साहित्यिक बैल आहेत का?

काही वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी साहित्यिकांना बैल म्हटलं होतं. त्याची सर्व थरातून तीव्र प्रतिक्रीया उमटली होती. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे संपूर्ण भारतात अतिशय मानाचं समजलं जातं. इतकी वर्षे सातत्याने असं भव्य-दिव्य संमेलन भरवलं जाण्याची परंपरा इतर भाषांमध्ये नाही, याचा खेद इतर भाषिक साहित्यिक सतत बोलून दाखवत असतात. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सद्यस्थिती तसंच भविष्याचा वेध घेतला जावा अशी सर्वांची अपेक्षा असते. मी व्यक्तीश: गेली अनेक वर्षे साहित्य संमेलनाला आवर्जून उपस्थित राहात आलोय, मला हा फक्त सोहळा वाटत आलाय. यात भूमिकांचा अभाव आवर्जून जाणवत असतो. सगळं कसं छान छान आहे. असं म्हणत बैलासारख्या माना डोलवण्याचाच धंदा साहित्य संमेलन भरवण्यापेक्षा थेट एखाद्या थिएटरात गाण्याची मैफिल भरवलेली काय वाईट?

देशातील साहित्यिकांचं सगळ्यात मोठं संमेलन म्हणून मराठी साहित्य संमेलनाचं नाव आहे, तरी सुद्धा हल्ली विविध ठिकाणी होत असलेली लिट फेस्टिव्हल्स ही जास्त व्हायब्रंट, तीक्ष्ण आणि चौफेर असतात. त्यातून वादाच्या पलिकडे चर्चा होतात, नवनवीन विचारांची देवाणघेवाण होते, जागतिक साहित्य किंवा सद्यस्थितीवर काटेकोर भाष्य होतं, प्रहार होतात. मराठी साहित्य संमेलनाने ही संधी केव्हाच गमावली आहे. सरकारी अनुदानासाठीचा हा सरकारी कार्यक्रम अशीच याची स्थिती झाली आहे. शेवटी दूरदर्शनवर दाखवण्यासाठी तितक्याच सौम्यतेचं ‘सॉफ्टवेअर’ इतकीच या संमेलनाची औकात राहणार आहे.

Updated : 11 Jan 2019 8:51 AM GMT
Next Story
Share it
Top