Home > रवींद्र आंबेकर > ‘जी ललचाएँ, रहा न जाएँ’ राष्ट्रवादीची आत्मघातकी अवस्था

‘जी ललचाएँ, रहा न जाएँ’ राष्ट्रवादीची आत्मघातकी अवस्था

‘जी ललचाएँ, रहा न जाएँ’ राष्ट्रवादीची आत्मघातकी अवस्था
X

पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी भारतीय जनता पक्षाला मदत करण्याची भूमिका घेतली, याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींना नोटीसा बजावण्यात आल्या असून चौकशीअंती कारवाई करू अशी भूमिका घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने आपली उरलीसुरली विश्वसनीयता ऐन लोकसभा निवडणूकांच्या आधी पणाला लावली आहे. वास्तविक महापालिका आणि राष्ट्रीय राजकारण यांचा थेट संबंध नाही, पण शीतावरून भाताची परीक्षा करता येते. राष्ट्रवादी काँग्रेस संधी मिळाल्यावर काय करू शकतं याचा पुन्हा एकदा पुरावा मिळाला आहे. आमची वैचारिक बैठक पक्की आहे, प्रसंगी विरोधी पक्षात बसू पण वैचारिक विरोध असलेल्या पक्षाला मदत करणार नाही अशी ठाम भूमिका घेण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने नगरमध्ये भारतीय जनता पक्षाला मदत करून आपला खरा अजेंडा उघड केला आहे. राज्यात भारतीय जनता पक्षाचं सरकार टिकवण्यामागचा अदृश्य हात राष्ट्रवादी काँग्रेसचाच होता हे सर्वांना माहीतच आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे जाणते नेते सतत लोकशाही, धर्मनिरपेक्षता याची रेकॉर्ड लावत इतरांना उपदेशाचे डोस पाजत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूणच जडणघडणीत या पक्षाच्या वैचारिक बैठकीबाबत नेहमीच कार्यकर्त्यांमध्ये साशंकता होती. अनेक कार्यकर्ते तर उघड उघड याबाबत बैठकांमध्ये बोलत आलेयत. काही वर्षांपूर्वी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीमध्ये काही कार्यकर्त्यांनी जाहीररित्या याबाबत प्रश्न विचारला होता.

सत्तेत राहण्याबाबत किंवा सत्तेच्या केंद्रस्थानी राहण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचं धोरण सगळ्यांना माहित आहे. त्याला अनुसरूनच भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसने बिनशर्त पाठींबा दर्शविला होता. शिवसेनेच्या अवास्तव मागण्यांना वेस घालण्यासाठी राज्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली ही खेळी यशस्वी ठरली आणि भाजपाचं सरकार तरलं. शिवसेनेला हात बांधून सरकारमध्ये सामील व्हावं लागलं. त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने एकदम राज्याच्या युनिटने निर्णय घेतलेला असू शकतो अशी राष्ट्रीय भूमिका घेतली होती.

तीन राज्यात काँग्रेसला सत्ता मिळाल्यानंतर कधी नरेंद्र मोदींचा गुरू असलेला पक्ष आता काँग्रेसच्या सोबतीने वावरतोय. वेळ आलीच तर राहुल गांधींचं नेतृत्व स्वीकारायला घटक पक्षांनी विरोध केला तर शरद पवार पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणूनही मान्यता पावू शकतात. अशावेळी धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत, मंद्र-मशीदीच्या अजेंड्याच्या बाहेर असलेल्या विचारधारेसोबत एकनिष्ठतेने निदान काही काळ राहण्याचं व्रत राष्ट्रवादीला का पाळता येत नाही, हा खरा प्रश्न आहे. सतत ‘जी ललचाए, रहा न जाए’ अशा भूमिकेत राष्ट्रवादी काँग्रेस का असते हा मोठा प्रश्न आहे.

भारतीय जनता पक्षाच्या धोरणांच्या विरोधात आक्रमक भूमिका घ्यायची आणि कृती करायची वेळ आली की मवाळ व्हायचं असं धोरण राष्ट्रवादी काँग्रेसने सतत घेतलंय. येत्या लोकसभा निवडणूकीत लोक १०० टक्के प्युअर विरोधी पक्षांच्या ओंजळीत मतं टाकणार आहेत, इतकं साधं सोप्पं गणित सध्या दिसतंय. भेसळयुक्त, ड्युप्लिकेट पक्ष निवडण्यापेक्षा लोक सत्तेतील, ओरिजिनल पक्षाला मतं देणं पसंद करतील. राष्ट्रवादी काँग्रेसला या भेसळीतून स्वत:ला सोडवता आलं तरच त्यांना लोकांचा विश्वास कमवता येईल. वेळ कमी आहे, त्यातही अशा चुका करून पक्षाने मोठं नुकसान करून घेतलंय. शेवटी बूँद से गई वो हौद से नहीं आती!

Updated : 29 Dec 2018 4:48 AM GMT
Next Story
Share it
Top