Home > रवींद्र आंबेकर > 5 ट्रिलीयन अर्थव्यवस्था आणि आव्हानं

5 ट्रिलीयन अर्थव्यवस्था आणि आव्हानं

5 ट्रिलीयन अर्थव्यवस्था आणि आव्हानं
X

मला माहित नाही, ५ ट्रिलीयन इकॉनॉमी म्हणजे नक्की काय होणार आहे. मोदी म्हणाले आहेत, हे अशक्य वाटतं अनेकांना आणि अशक्य कामं करण्यातच खरी मजा आहे. नरेंद्र मोदी खतरों के खिलाडी आहेत. सर्व प्रकारच्या तज्ज्ञांना अचंबित करण्यात त्यांचा हातखंडा आहे. मी काही तज्ज्ञ नाही आणि भक्त ही नाही त्यामुळे त्यांचं कुठं चुकतंय आणि चुकलं असलं तरी तो कसा मास्टरस्ट्रोक होता या दोन्हींपासून मी लांब आहे.

नरेंद्र मोदींनी ५ ट्रिलीयन इकॉनॉमीचं स्वप्न देशाला दिलंय. त्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची असल्याचंही सांगितलंय. ५ ट्रिलीयन हे केवळ अंबानी-अदानींचं नाही तर आपलंही ध्येय या पुढे असायला हवं. इतकं मोठं स्वप्न ठेवल्यानंतर काही लोकांनी सध्याच्या अर्थव्यवस्थेचं मध्यमवर्गीय रडगाणं सुरू केलं आहे. मला आठवतंय, मी जेव्हा वृत्तवाहिनीत काम करत होतो तेव्हा आमचे संपादक मुंबईला बैठकीला आले की इथले रिपोर्टर त्यांना ट्रॅफिक जामची समस्या सांगायचे. टॉयलेट पुरेसे नाहीत सांगायचे. संपादकाचा मुद्दा चॅनेल नंबर वन कसं करायचा हा असायचा, तर स्टाफ रोजच्या समस्या मांडत बसायचा. नंतर त्यांनी मुंबईला यायचंच सोडून दिलं. आले तरी ऑफिसला यायचे नाहीत, बाहेरुनच मिटींग करून निघून जात. सांगण्याचा मुद्दा कुणाचं काय तर कुणाचं काय... त्यामुळे मोदींच्या आकांक्षा, स्वप्न मला समजतात. तर लोकांच्या मध्यमवर्गीय दुखणीही मला समजतात.

गेल्या ७०-७२ वर्षांत देशात काहीच झालं नाही असा नरेंद्र मोदींचा दावा आहे. त्यात सरदार पटेल उपपंतप्रधान असल्यापासून ते स्वतः पंतप्रधान झाल्यापर्यंतचा काळ आहे. त्यांची पहिली टर्म पण ते यात मोजतात. वाजपेयींची टर्म पण मोजतात. इतकं सगळं करून ते आजही काँग्रेसला बोल लावतात आणि लोक टाळ्या पिटतात. माझे एक बांधकाम व्यावसायिक मित्र आहेत. ते मोदी समर्थक आहेत. धंद्यामुळे असं सिझनल समर्थन करावं लागतं काही लोकांना. तर गेल्या पाच वर्षांत बांधकाम व्यवसाय झोपलेला आहे. तरी त्यांना अर्थव्यवस्था सुधारतेय असं वाटतं. त्यांच्या स्वतःच्या कंपनीतल्या पन्नास टक्के लोकांना त्यांनी काढलंय. तरी रोजगार वाढतोय असं त्यांना वाटतंय.

आज तर एक पोस्ट ही व्हायरल केली की अर्थव्यवस्थेत मंदी नाहीय तर धंद्याचं पॅटर्न बदललंय. क्लाएमेट चेंज झालं नाहीय तर आपण म्हातारे झालोयत अशाच छापाची ती पोस्ट आहे. पोस्टमध्ये म्हटलंय की, कार विक्री कमी झालीय म्हणून बोंब मारतायत लोकं पण त्याचवेळी उबर-ओला च्या व्यवसायात वाढ झालीय. रेस्टाँरंटमध्ये मंदी सांगितली जातेय त्याचवेळी झोमॅटो आणि बाकी कंपन्यांच्या नफ्यात वाढ झालीय.... इ. इ. मंदीत असलेल्या सर्व व्यवसायांची नावं घेऊन त्या ऐवजी ऑनलाइन बिझनेस वाढलाय असं त्यात सांगितलं गेलंय, आणि मंदीचं एकदम भक्ताळ खंडन केलं गेलंय.

घरांची विक्री कमी झालीय, मी कुणी कुणाला ऑनलाइन राहायला गेल्याचं पाहिलेलं नाही. पेट्रोल-डिझेलचे भाव वाढल्यावर कुणाला मी ऑनलाइन प्रवास करताना पाहिलेलं नाही. उत्पादन कमी झाल्यावर ऑनलाइन काय मागवणार? आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. भक्ताळ विश्लेषकांना एकच गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की, उत्पादनच घटलंय. बेरोजगारी वाढलीय, अशा वेळी १३० कोटी जनतेने घरात बसून अशा पोष्टी फिरवाव्यात का?

आपली भक्ती ठीक आहे, पण अर्थव्यवस्थेवर गंभीर चिंतन व्हायला पाहिजे. जर खरोखरच व्यवसायांचा पॅटर्न बदलतोय तर हा बदलणारा पॅटर्न गुप्त ठेवायचाय का. हात गाडी ओढणाऱ्याला, ओझी वाहणाऱ्यांना, श्रमाचं काम करणाऱ्यांना हा पॅटर्न कधी शिकवणार. हातगाडी ओढणारं ऍप कधी येणार, रिक्षा चालवणारा रोबो कधी येणार.. देशात १३० कोटी जनता आहे. ती काही ऑनलाइन सुखी करण्यासाठी आहे का...

मोदींनी अर्थव्यवस्थेचं गंभीर चिंतन केलंच असेल यात मला शंका नाही. ५ ट्रिलीयन इकॉनॉमीचं लक्ष्य मला कठीण वाटत नाही. १३० कोटी जनतेने ठरवलं तर काय होऊ शकत नाही. या विश्वासावर एक नवा भारत घडवला नक्कीच जाऊ शकतो. अजून लोक हे आव्हान उचलायला तयार नाहीत, गरीब आदिवासी कसं काय हे करू शकतील, ते अजून मुख्य प्रवाहात आले नाहीत असं रडणारे लोक खरं तर देशद्रोहीच आहेत ही भावना ही इथल्या बहुसंख्याकांची आहे. काहींना हे घटक नसले तरी चालतात. जे सक्षम आहेत तेच जगू शकतात अशी भावना असलेलेही बरेच लोक आहेत आपल्या आसपास. सर्व्हायवल ऑफ फिटेस्ट ची थिअरी लावून समाजाकडे बघणारे अनेक जण आहेत.

स्वातंत्र्याच्या ७० वर्षात हे झालं नाही ते झालं नाही असा तुलनात्मक अभ्यास सतत करणारे लोक विसरतात की जन्माला आलो तेव्हा आपल्याला चड्डी घालता येत नव्हती. ती घालण्याची कला किंवा क्षमता निर्माण व्हायला एक किमान वय जावं लागतं. २ ट्रिलीयनची अर्थव्यवस्था हा तुमचा पाया आहे, त्यावर ५ ट्रिलियनची इमारत तुम्हाला बांधायची आहे. पाया तयार आहे, आणि तुम्ही अजून पाया खणणाऱ्याला शिव्या देत बसलाय. पाया खणणाऱ्याने इमारत बांधली नाही, आता आम्ही अशी इमारत बांधू आणि तशी इमारत बांधू करत तुम्ही आहे तो पाया ही खोदायला लागलाय...

मला हा सगळा प्रकारच गंमतीचा वाटतोय. हे सर्व समजायला अर्थव्यवस्था वगैरे समजायलाच पाहिजे अशातला भाग नाही. बघितलं तरी समजतंय, पण बघायला डोळे नीट उघडे ठेवायला पाहिजे. सध्या जी परिस्थिती आहे त्यासाठी मोदींना दोष दिला पाहिजे अशातला भाग नाही. जागतिक अर्थव्यवस्थाच हललेली आहे. त्याचमुळे अनेक देश परत युद्धखोरीची भाषा बोलतायत. शस्त्रास्त्र स्पर्धा सुरू करण्याकडे वळताना दिसतायत. मला अर्थव्यवस्थेच्या चिंतेपेक्षा आपण या मार्गाकडे वळणार नाही ना याची जास्त चिंता वाटतेय.

- रवींद्र आंबेकर

Updated : 16 Aug 2019 6:48 PM GMT
Next Story
Share it
Top