Home > रवींद्र आंबेकर > आयडीयाच्या कल्पना आणि नरेंद्र मोदी

आयडीयाच्या कल्पना आणि नरेंद्र मोदी

आयडीयाच्या कल्पना आणि नरेंद्र मोदी
X

नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळाला वर्षे पूर्ण झाली याबद्दल मोदी सरकारचं अभिनंदन! आणि तीन वर्षांत देशातविरोधी पक्ष नेताही होऊ दिला नाही याबद्दल तीव्र निषेध! मी लहानपणापासूनच एक तत्व पाळत आलोय, माझ्या शिक्षण आणि संस्काराचा तो भाग होता म्हणून असेल... जेव्हा तुम्ही सर्वांत जास्त ताकतवर असता, शक्तीमान असता, तेव्हाच तुम्ही जास्त संयम पाळायचा असतो. जेव्हा तुम्ही जास्त रागावलेले असता किॅवा अत्यानंदाने भारलेले असता तेव्हा तुम्ही स्वत:वर नियंत्रण ठेवायचं असतं. एवढं केलं की, आपल्याला चांगल्या वाईट काळात कुणाचं शत्रुत्व पत्करावं लागत नाही. थोडंसं फिलॉसॉफिकल वगैरे वाटेल, पण यातच खरं सौंदर्य आहे. यामुळे तुम्हाला स्वत:ची उंची वाढवता येते. काही माणसांना, संस्थांना, पक्षांना किंवा समूहांना याचं भान राहत नाही, आणि मग मिळालेलं यश उन्मादाचं स्वरूप घेते.

नरेंद्र मोदींच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात अनेक चांगल्या वाईट घटना घडल्या, निर्णय घेतले गेले. प्रत्येक राजकारण्याला ते घ्यावेच लागतात. मोदींच्या निर्णयांची किंवा एकूणच मोदींची चर्चा जास्त होत राहिली. कारण, रणनितीचा भाग म्हणून हे सरकार 'मोदींचे' आहे हे ठसवण्यात आलंय. मोदींनी घेतलेल्या निर्णयांची समिक्षा वेळोवेळी झालेली आहे. तीन वर्षांत मोदींच्या नीतींचा प्रभाव ही आपण पाहिलाय, भोगलाय. तरीसुद्धा लोकांनी सर्व निवडणूकांमध्ये मोदींना मतदान केलंय. हे असं का घडतंय? यावर विचारवंत गडबडलेले आहेत. विचारवंतांच्या डोक्यात पुस्तकी थिअरी असतात, ते आपापल्या थिअरी सध्या सुरू असलेल्या घटनांवर लावून त्यांचं विश्लेषण करत असतात. वैज्ञानिकरित्या अभ्यास करण्याची हीपद्धत असू शकेल, पण या सर्व थिअरी लावून येणारा सारांश आणि बाहेरची परिस्थिती आणि जनमत जाणून घेण्यासाठीची मतदानाची जी प्रक्रीया आहे, या सर्वांचे निकाल एकमेकांच्या विरूद्ध आहेत. मोदींच्या विविध निर्णयांमुळे आतापर्यंत सामान्य जनतेलाच त्रास सहन करावा लागला आहे. गॅस सबसिडीपासून डिमॉनेटायझेशनपर्यंत. आणि डिमॉनेटायझेशननंतर सर्वत्र सुरू असलेल्या नोकरकपातीपर्यंत.

मोदींच्या आवाहनानंतर लोकांनी उत्स्फूर्तपणे गॅस सबसिडी सोडली. कोट्यवधी लोकांनी केलेल्या त्यागावर त्यापेक्षाही जास्त जाहीरातबाजी झाली. विचारवंतांचं तोंड गप्प झालं. परवा आमचा गॅस एजन्सीवाला सांगत होता की, गॅसबुकींगसाठी नंबर दाबा अशी कमांड होती, त्याऐवजी सुरूवातीला सबसिडी सोडण्यासाठी तो नंबर असाईनमेंट करण्यात आला होता. त्यामुळे अनेकांनी अजाणतेपणाने तो नंबर दाबला आणि सबसिडी सोडली. ग्राऊंड रिएलिटीपासून डिस्कनेक्ट असल्यावर अशा गोष्टी लवकर कळत नाहीत. विचारवंतांचं, पत्रकारांचंच काय विरोधी पक्षांच्याही निदर्शनास अशा गोष्टी उशीरा आल्या. कँपेनबाजीमुळे सरकारने जी हव्वाबाजी केली त्यात उडालेल्या धुरळ्यामुळे सर्वांचेच डोळे धूळीने भरून गेलेयत. त्यामुळे चित्रच स्पष्ट दिसत नाहीय अशी काहीशी स्थिती निर्माण झालीय, असं ज्यांना ज्यांना वाटतंय त्यांचं जमीनीशी नाते तुटलंय.

मोदींनी उद्योगपतींच्या साहाय्याने सत्ता मिळवली पण ते उद्योगपतींच्या आहारी गेलेयत असं चित्र निर्माण होऊ दिलं नाही. त्यांनी आपल्या सर्व भाषणांमध्ये पिचलेल्या गरीबांचा आवाज बुलंद केला. या गरीबांना चांगले दिवस येणार आहेत, सर्वकाही ठिक होणार आहे असा विश्वास दिला. या विश्वासावर मोदींनी लोकांमध्ये स्वत:चं स्थान निर्माण केलं, मिडीयाच्या माध्यमातून प्रतिमाही तयार केली. प्रत्येक सत्ताधाऱ्याकडे असतात तीच आयुधं मोदींकडेही आहेत. मोदी २०१२ पासून सतत कँपेन मोडवर आहेत. एकही दिवस असा नाही जिथे ते मिडीया किॅवा लोकांसमोर नाहीत. त्यांनी बंद खोल्यांमध्ये चालणाऱ्या बैठकांनाही इवेन्टसचं स्वरूप दिलं. बरं, असं काही राहुल गांधी ही करू शकतात, पण त्यांना कोणी ऐकेल का? मोदींना लोक ऐकतात. कारण त्यांच्या डोक्यात भरमसाठ आयडियाज आहेत. त्या अस्तित्वात येवोत येवोत पण रोज काहीतरी घडतंय असा आभास त्या निर्माण करतात. उलट विरोधकांकडे कल्पनाशक्तीचाच अभाव आहे. मोदींचं डोकं चाचा चौधरींपेक्षाही वेगानं चालतं. त्यांच्याकडे लोकांना गुंतवून ठेवण्याचे तुफान फंडे आहेत. विरोधकांना नामोहरम करण्याची नित्यनुतन स्ट्रॅटेजी आहे.

डिमॉनेटायझेशननंतर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. खासकरून मजूर वर्गातील लोकांच्या नोकऱ्यांवर गदा आली, हा वरवंटा आता आयटी उद्योगावर पण फिरला. पण लोकांना असं वाटतंय, की उद्योगपतींकडे प्रचंड काळापैसा होता, डिमॉनेटायझेशननंतर त्यांचा सुफडा साफ साफ झाला. आपली नोकरी गेली ठीक आहे, पण त्याचे करोडों रूपये गेले. दुसऱ्याच्या दु:खात सुख शोधण्याची मानवी प्रवृत्ती मोदींनी सतत वापरलीय. काळा पैसा रद्दी झाला वगैरे वगैरे टाइपची चिल्लर भाषा मोदी सहज वापरतात. सामान्य माणसाला ही बोली आपली वाटते. तज्ज्ञ लाख उपटत बसोत, मोदींची लोकप्रियता कमी होत नाही. पर्सेप्शन मॅनेजमेंट करण्यात ते यशस्वी झालेयत.

मी नशीब वगैरे मानत नाही, पण मोदींच्या बाबतीत ते मानायला मी तयार आहे, त्यांच्या नशिबाने सध्याचे विरोधी पक्षही असे पुळचट आहेत की बघायलाच नको. त्यांना अजूनही शुद्ध येत नाहीय. त्यांच्या नेत्यांच्या इतक्या फायली सरकारने गोळा केल्यात की काही बोलायची त्यांची नैतिकताच संपलेली आहे. देशातील विचारवंतांचाही असाच काहीसा प्रॉब्लेम आहे, त्यांचीही विश्वासार्हता लयाला गेलीय. मोदींचं राज्य एखाद्या संगणकीय प्रोग्राम प्रमाणे त्याचमुळे सुरळीत सुरू आहे. या प्रोग्राममध्ये प्रोग्राम बाहेरचं अचानक काही आलं की मग मोदींचं सगळं गडबडतं. रोहित वेमुला, कन्हैय्या कुमार अशा एपिसोडसाठी मोदींचा प्रोग्राम तयार नाही. जे विकले जाऊ शकतं ते सर्व विकत घेण्याची मशीनरी मोदींकडे आहे. जे विकाऊ नाही त्यांच्याशी मोदी लढू शकत नाहीत.

तीन वर्षात जर मला काही समजलं असेल तर ते इतकेच की सत्ता, पैसा, धाक, वकूब, अधिकारांचा वापर - गैरवापर करून पर्सेप्शन मॅनेजमेंट करण्यात मोदी यशस्वी झालेयत, पण असं मॅनेजमेंट चिरकाल टिकत नाही. आणि महत्वाचं म्हणजे मोदी नकोत तर मग कोण ? या प्रश्नाचं उत्तर जोपर्यंत स्वत: विरोधी पक्षांना सापडत नाही तोपर्यंत मोदींच्या सत्तेची वर्षे मोजण्यापलिकडे विरोधकांनाही काही काम राहणार नाहीय.

Updated : 26 May 2017 10:35 AM GMT
Next Story
Share it
Top