Home > रवींद्र आंबेकर > मोदींचा पराभव! 

मोदींचा पराभव! 

मोदींचा पराभव! 
X

गुजरातच्या निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव झाला. निकालांच्या आधीच मोदी हरले. काँग्रेस मुक्त भारत करण्याचा विडा उचललेल्या नरेंद्र मोदी यांना घरच्या विकेटवर खेळताना घाम फुटला. राहुल गांधींची काँग्रेस निवडणूक जिंकेल न जिंकेल पण निदान मोदींसाठी गृहराज्यातलं मैदान तितकं सेफ नव्हतं याची लिटमस टेस्ट मात्र झाली. शेवटच्या दिवसापर्यंत प्रचाराने खालची पातळी गाठली. पाकिस्तानच्या सहभागाच्या मुद्द्यावरून मनमोहन सिंह यांनी मोदींना खडे बोल सुनावले, आणि भाजपच्या मूर्ख कार्यकर्त्यांनी सिंह यांची खिल्ली उडवायला सुरू केली. त्यावर कळस चढवला तो त्यांच्या सरदार अमित शहा यांनी. त्यांनी मनमोहन सिंहांनाच प्रश्न विचारला की त्यांनी त्यांच्या कार्यकाळातील मॉन्युमेंटल लूट वर तेव्हा तोंड का उघडलं नाही. नळावरची भांडणं ज्यांनी ऐकली असतील त्यांना शहा-मोदी यांच्या अशा वक्तव्याबाबत काहीच खटकणार नाही. उलट काय सॉल्लीड बोलले- मस्त सुनावलं अशा अपेक्षित प्रतिक्रिया भक्तांकडून येत आहेत.

एखाद्या पदाची प्रतिष्ठा विसरूनच बोलायचं असं ठरवलं असेल तर अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या सर्व वक्तव्यांबाबत कुणालाच काही खटकण्यासारखं नाही आणि आपण काही गैर बोललेलं नाही असंच दोघांना आणि त्यांच्या पक्षाला वाटत राहतं. मनमोहन सिंह यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर न देता मोदी-शहा जोडी टिंगलटवाळीतच धन्यता मानत आलीय. एखाद्या पदाची यापेक्षा आणखी काय अप्रतिष्ठा असू शकते.

गुजरातच्या दुसऱ्या टप्प्यांचे मतदान १४ तारखेला होतंय. हे मतदान ऐतिहासिक वगैरे काही नाहीय तरी त्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. खुद्द मोदींनीही याला ऐतिहासिक किंवा प्रतिष्ठेचं मानलं नसतं तर ही निवडणूक ही सामान्य निवडणूक झाली असती. त्यांना ही आपलं पद प्रतिष्ठेला लावावं लागलं नसतं.

या निवडणूकीत गुजरातमधल्या विकासाच्या, तिथल्या लोकांच्या आशा आकांक्षांच्या मुद्द्यांवर सुरू झालेली चर्चा वायफळ विषयांवर पोहोचली. काँग्रेसच्या वायफळ नेत्यांनी एका अर्थाने गुजरातच्या जनतेचा अपमानच केला आहे. तो अपमान मोदी- शहा यांच्या जोडीने वाढवत नेला. गुजरातचे मतदार या सर्व अपमानाचा बदला कसा घेतात हे १८ तारखेला कळलेच, पण माझ्या दृष्टीकोनातून निकाल लागलाय. छोट्याश्या लढाईत मोदींचा पराभव झालाय.

Updated : 13 Dec 2017 4:10 PM GMT
Next Story
Share it
Top