आधी जानवं तोडा

आधी जानवं तोडा
X

काँग्रेसच्या इतिहासात पहिल्यांदाच आपला नेता हिंदू आहे आणि तो ही जानवंधारी आहे हे सिद्ध करण्यात काँग्रेस गुंतलेली आहे. आजपर्यंत धर्मनिरपेक्षतेचा झेंडा मिरवणाऱ्या काँग्रेसला हिंदुत्वाचा आधार घेण्याची वेळ आलीय. एखादा उमेदवार उभा केला तर काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूकही भाजपा जिंकू शकेल अशीच स्थिती आज देशात आहे. अशा कठीण स्थितीत राहुल गांधी यांच्याकडे हरलेल्या सेनेचं नेतृत्व येणार आहे. या सेनेचं नेतृत्व तसं राहुल यांनी मागील निवडणूकीत केलेलंच आहे. असं असलं तरी राहुल गांधी अध्यक्ष बनल्यानंतर काँग्रेसला 'अच्छे दिन' येतील अशी भोळी-भाबडी आशा काँग्रेसच्या नेत्यांना लागून राहिली आहे.

राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर सगळ्यात आधी त्यांना गुजरात निवडणुकीचा हिशोब द्यावा लागणार आहे. अख्ख्या काँग्रेस पक्षाला भ्रष्टाचाराची कीड लागलीय. राहुल यांच्या समोरील सर्वांत मोठ्या आव्हानांपैकी एक आव्हान पक्षातील हे असे भ्रष्टाचारी ज्येष्ठ नेतेही असणार आहेत. वर्षानुवर्षे काँग्रेसच्या इमारतीवर कब्जा करून बसलेल्या नेत्यांना घरी पाठवून देशभर फिरू शकतील अशा तरूण नेतृत्वावर जबाबदारी सोपवण्याचा कडक निर्णय त्यांना घ्यावा लागणार आहे. अशा वेळी आहे त्याच नेत्यांच्या पोरा-बाळांना वारसा हक्काने संधी देण्याऐवजी पक्षातून सच्चे कार्यकर्ते शोधून त्यांना ताकद देण्याचं काम त्यांना करावं लागणार आहे. हे काम जर ते करू शकले नाहीत तर राहुल गांधी यांच्याकडे अध्यक्षपद येऊनही ते फारसे काही करू शकणार नाहीत.

सर्वांत महत्वाचं म्हणजे काँग्रेस पक्ष नाही, विचार आहे असं जे सांगितलं जातं ते सिद्ध करावं लागणार आहे. पक्षाकडे विचार शिल्लक तरी आहे का? यावर राहुल गांधी यांना मंथन करावं लागणार आहे, नवीन आर्थिक धोरण बनवावं लागणार आहे. राहुल गांधी यांचा प्रशासनावरचा वकुब तसा कमजोरच आहे. आपल्या या कमजोरीवर ही त्यांना मात करावी लागणार आहे. अशा अनेक फ्रंटवर राहुल गांधी यांना सध्या काम करावं लागणार आहे.

राहुल गांधी यांनी काय करावं अथवा करू नये हे सांगण्यासाठी हा अग्रलेख नाहीय. राहुल गांधी अध्यक्षपदाची सुत्र स्वीकारतील तो काळ फार महत्वाचा आहे म्हणून त्याचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे. जेव्हा देशातील सर्वच राजकीय पक्ष सत्तेसमोर शरणागत होत होते तेव्हा राहुल गांधी यांनी आपल्या कुवतीप्रमाणे का होईना भाजपा आणि संघपरिवाराशी लढा कायम ठेवला. चहुबाजूंनी हल्ला होत असतानाही राहुल यांनी किल्ला लढवला. बालिश-पप्पू म्हणून संभावना केली गेल्यानंतर राहुल गांधी यांना पहिला सूर सापडला तो थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्येच. 'विकास वेडा झालाय' ही काँग्रेसची कँपेन मोदींसाठी चिंताजनक बनली आणि राहुल गांधी यांना राष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी प्राइम टाइममध्ये जागा द्यायला सुरूवात केली. अशातच जानवं प्रकरणाने राहुल गांधी यांना थोडं मागे रेटलं. गुजरातला हिंदुत्वाची प्रयोगशाळा म्हटलं जातं. या प्रयोगशाळेत जेव्हा विकासाचा मुद्दा घेऊन राहुल लढत होते तोपर्यंत त्यांना वजन मिळत गेलं, पण गाडी आता हिंदुत्वावर आल्यानंतर राहुल गांधी यांना आता नव्या आव्हानांना तोंड द्यावं लागणार आहे.

काँग्रेस जरी धर्मनिरपेक्षतेचा डंका पिटत असली तरी या पक्षात जात-धर्माच्या आधारावरच तिकीट वाटप आजपर्यंत होत आलं होतं. सॉफ्ट हिंदुत्व आणि मुस्लीम दाक्षिण्याच्या मुदद्यावर आजपर्यंत काँग्रेसचं राजकारण चाललं होतं मध्यंतरीच्या काळात या सॉफ्ट हिंदुत्वापासून काँग्रेस लांब गेली आणि तिचा ऱ्हास सुरू झाला. अशा वेळी बहुसंख्य हिंदू समाजाला पुन्हा आपल्याकडे आकर्षित केलं पाहिजे असं राहुल गांधी यांच्या टीमला वाटणं स्वाभाविक आहे. मात्र त्यासाठी शर्टाच्या आत लपलेलं जानवं बाहेर काढण्याची गरज का वाटावी हा मोठा प्रश्न आहे. जानवं हे हिंदुत्वाची एकमेव निशाणी आहे का? काँग्रेस सारख्या पक्षाला धर्माधारित राजकारण करण्याची गरज वाटावी हा या पक्षाचा पराभव नाही का? या संपूर्ण प्रकरणात भारतीय जाती आणि धर्मव्यवस्थेचं काँग्रेसचं आकलन किती तोकडं आहे हेच या प्रकारावरून काँग्रेसने सिद्ध केलंय.

अतिशय बिकट परिस्थितीत पक्ष सांभाळायला घेणाऱ्या राहुल गांधी यांनी आधी आपलं आकलन सुधारून घेतलं पाहिजे. अध्यक्षपदाची धुरा स्वीकारत असताना राहुल गांधी आपलं जानवं तोडण्याची ताकद दाखवू शकले तरच त्यांना पुढे राजकीय प्रगती करता येऊ शकेल, अन्यथा आपल्या चुकीच्या रणनितीमध्ये ते गुरफटून जातील.

Updated : 4 Dec 2017 1:52 PM GMT
Next Story
Share it
Top