Home > राजदीप सरदेसाई > भाजपचं होतंय काँग्रेसीकरण...

भाजपचं होतंय काँग्रेसीकरण...

भाजपचं होतंय काँग्रेसीकरण...
X

भारतीय जनता पार्टीत नव्याने दाखल झालेले मुकूल रॉय यांचे पक्ष कार्यालयात केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ज्या प्रकारे फुले देत उत्साहात स्वागत केले, त्याचे हे चित्र बरेच काही सांगत आहे. तृणमूल कॉंग्रेसचे माजी नेते मुकूल रॉय हे शारदा आणि नारदा घोटाळ्यातील आरोपी असले तरी आता त्यांच्याकडे एक मोठा मासा गळाला लागल्यासारखे आणि कायदा मंत्र्याइतकेच महत्वाचे अशा नजरेतून पाहीले जात आहे. जणूकाही रॉय यांनी सत्तारूढ भाजपामध्ये प्रवेश करताच ते त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपातून मुक्त होऊन पवित्र झाले आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे जवळचे आणि विश्वासू समजले जाणारे रॉय यांनी पक्षबदल केल्याने ममता यांना मोठा धक्का बसला हे जरी खरे असले तरी राजकीय भ्रष्टाचारावरून भाजपा मिरवत असलेल्या “आम्ही इतरांपेक्षा वेगळे आहोत”, या टेंभ्याचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण खुद्द पंतप्रधानांनाच त्यांनी दिलेल्या “ना खाऊंगा.. ना खाने दूंगा” या घोषणेवर काम करू न देण्यासारखा हा प्रकार आहे.

ज्या राज्यांमध्ये लवकरच निवडणूका होणार आहेत, अशा गुजरात आणि हिमाचल प्रदेशचा विचार करूया. गुजरातमध्ये भाजपाने माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला यांचे अनेक समर्थक पक्षात घेतले आहेत. याच वाघेलांना भाजपाने कॉंग्रेसमध्ये भ्रष्टाचार रूजवण्याचे जनक असे संबोधले होते. हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाने वरिष्ठ कॉंग्रेस मंत्री आणि सुखराम यांचे पुत्र अनिल शर्मा यांना पक्षात घेतले आहे. याच सुखराम यांच्यावर १९९० च्या दशकात त्यांच्या टेलिकॉम घोटाळ्यातील कथीत सहभागावरून भाजपाने टिकेची झोड उठवली होती.

यावरून असे दिसते की, जून्या भाजपाची विचारधारा आणि नव्या भाजपाचे सत्तेचे राजकारण यात खूप तफावत आहे. वाजपेयी-अडवाणी यांच्या काळातील भाजपा हिंदूत्व आणि नैतिकतेच्या जून्या विचारधारेचा अभिमान बाळगून होती. यातही काहीवेळा ही नैतिकता फसवी ठरली. १९९८ मध्ये भाजपाने हिमाचल प्रदेशात सत्ता स्थापन करण्यासाठी सुखराम यांच्या पक्षाबरोबर हातमिळवणी केली होती. पण त्यातही थोड्या काळासाठी मिळणाऱ्या आघाडीचा फायदा घेण्यासाठी नैतिकतेला फाटा देण्याचा विचार त्यामागे नव्हचा. जैन हवाला डायरी प्रकरणात नाव समोर आल्यानंतर अडवाणी यांनी लोकसभेतून राजीनामा दिला तर वाजपेयी यांना लोकसभेतील अविश्वास ठरावाला सामोरे जाताना केवळ एका मताने ऐतिहासिक पराभव पत्करावा लागला होता.

याच्या अगदी उलट नव्या भाजपाने राजकीय हातमिळवणी करताना व्यावहारिक मोजमाप करणारा दृष्टीकोन बाळगला आहे. बेबंध सत्तेच्या भूकेसाठी नव्या भाजपाने सत्ता वाढवण्यासाठी नैतिक मूल्ये बाजूला ठेवण्याचे धोरण स्विकारले आहे. मग ते उत्तरपूर्व असो जेथे भाजपाने सत्ता स्थापन करण्यासाठी पक्ष फोडले अथवा गोवा जेथे दुसऱ्या क्रमांकावर असूनही रातोरात सत्ता स्थापन करण्यासाठी ठिगळ लावण्याचा केलेला प्रकार असो किंवा तामिळनाडू जेथे पक्षाने सर्व पर्याय खुले ठेवण्याचा घतलेला निर्णय असो, यातून हा पक्ष एक सुस्पष्ट संदेश देत आहे की, सत्ता काबीज करण्यासाठी भाजपा राष्ट्रीय राजकारणातील प्रभावी अधिकाराचा वापर करण्यास मागेपुढे बघणार नाही.

यापूर्वी इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसने आपली एकाधीकारशाही शाबूत ठेवण्यासाठी विविध राज्यांमधील सत्तेच्या प्रभावाचा यशस्वी वापर केला होता. हा वापर विरोधी पक्षांच्या ताब्यात असलेली राज्य सरकारे पाडण्यासाठी किंवा आपल्या नियंत्रणात असलेले मुख्यमंत्री नेमण्यासाठी केला गेला. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसच्या राजवटीत संभाव्य डोकेदूखी ठरू शकणाऱ्या नेत्यांना पक्षातील सर्वात वरच्या व्यक्तिपुढे मान तुकवण्याच्या रणनितीचा प्रभावीपणे वापर केला गेला. विरोधकांमध्ये कायम फूट पाडणे आणि आपल्याव्यतिरिक्त इतर कोणालाही पक्षात शिरजोर होऊ न देणे, या इंदिरा गांधी यांच्या राजकीय खेळीचा वापर आत्ताची भाजपा करताना दिसत आहे. सन २०१४ च्या निकालामुळे हे काम अधिक सोपे झाले आहे.

परंतू पक्षात कॉंग्रेसी विचारसरणी वाढवताना भाजपासमोर क्षणिक काळाच्या सत्तेसाठी राजकीय तडजोडी करताना मूळ विचारधारा सोडावी लागण्याचा मोठा धोका आहे. नाही म्हणायला भाजपाकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी संघटना आहे, जी मूळ विचारधारा सोडावी लागली तर त्याची भरपाई करेल. पण भाजपा नेतृत्वाने हे देखील लक्षात घेतले पाहीजे की, राजकीय मान्यता म्हणजे कुठल्या बॅंकेत ठेवलेली मुदत ठेव नाही. आज नाही तर उद्या जनताच अरूण शौरी यांनी अलिकडेच उपस्थित केलेला भाजपा म्हणजे कॉंग्रेस अधिक गाय आहे का, हा प्रश्न विचारणारच!

ता.क. – पंतप्रधानांनी अलिकडेच चेन्नईमध्ये द्रमुक नेते एम. करूणानिधी यांची घेतलेली भेट म्हणजे कबुतरांच्या कळपात मांजराने प्रवेश केला आहे. जो पक्ष टू जी घोटाळ्यात अडकला आहे, तो भविष्यात भाजपाचा संभाव्य सहकारी पक्ष बनू शकतो.

Updated : 13 Nov 2017 11:20 AM GMT
Next Story
Share it
Top