Home > राजदीप सरदेसाई > बिहारची सहा असत्य

बिहारची सहा असत्य

बिहारची सहा असत्य
X

राजकीय पत्रकारीता करणाऱ्या कोणत्याही पत्रकाराचे शिक्षण हे बिहारचे राजकारण समजून घेतल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. व्यापार हा जर मुंबईच्या केंद्रस्थानी असेल तर बिहारच्या केंद्रस्थानी राजकारण आहे ! देशाच्या इतर कुठल्याही भागात – अगदी उत्तर प्रदेशमध्येसुद्धा – बिहारच्या तोडीची तीव्र राजकीय जाण दिसून येत नाही. राजकारण हा या राज्याचा प्राणवायू आहे. बिहारचे नेते आणि त्यांचे अतिशय गुंतागुंतीचे असे जातीपातींचे राजकारण हाच या राज्याच श्वास आहे. त्यामुळेच, नितीश कुमार यांच्या ताज्या कोलांटीउडीने संपूर्ण देश जरी आवाक झाला असला, तरी बिहारी जनतेसाठी मात्र हे नेहमीचंच होतं. नितीश कुमार यांनी सहाव्यांदा शपथ घेतल्यानंतर राजभवनाबाहेरच एक वयस्कर गृहस्थ मला म्हणाले की, “देखीये सर, नेता तो दुसरे को ठगता है, जनता को नही ठगना चाहीये.” तुम्ही देशाला मूर्ख बनवू शकता, पण राजकीयदृष्ट्या अतिशय चतुर अशा बिहारींना नाही. म्हणूनच बिहारबाबत या सहा असत्य राजकीय गोष्टी आहेत, ज्यांचा सहजपणे पर्दाफाश होऊ शकतो

असत्य क्रमांक १: भ्रष्टाचार सहन करु शकत नसल्यामुळेच नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यांच्याबरोबरची आघाडी तोडली. खरं म्हणजे, २०१५ च्या बिहार निवडणूकीत लालूंशी युती करण्याआधीपासूनच नितीश यांना लालूंचा कलंकित भूतकाळ चांगलाच माहीत होता. मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत अचानकपणे नरेंद्र मोदींच्या लाटेत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर, २०१५ मध्ये नितीश यांचे राजकीय आयुष्य पणाला लागले होते. अशा वेळी, नितीश यांना लालूंची गरज होती, कारण जरी मुख्यमंत्री म्हणून त्यांची विश्वासार्हता असली, तरी लालूंकडे मतं होती आणि सामान्य लोकांशी त्यांची नाळ जोडली गेली होती. त्यावेळी राजकीय अस्तित्वासाठी महाआघाडीचे निर्माण करण्यामागे मोदी-विरोध हाच एकमेव मंत्र असल्याने भ्रष्टाचार हा महत्वाचा मुद्दा नव्हता. आता मात्र असुरक्षिततेची भावना निर्माण झालेल्या नितीश यांना आणखी वीस महिन्यांनी केंद्र आणि राज्यात संभाव्यपणे शत्रुत्वाची भावना नसलेले भाजप सरकार हे लालू यांच्याबरोबरच्या दीर्घकालीन नात्यापेक्षा जास्त दिलासादायक असल्याची जाणीव झाली आहे आणि त्यामुळेच भ्रष्टाचार हा अचानकपणे महत्वाचा मुद्दा बनला आहे.

यादव घराण्याचे प्रमुख आणि नितीश हे गेली अनेक दशकं परस्परांचे वैयक्तिक प्रतिस्पर्धी राहीले आहेत, अगदी १९७० च्या दशकात विद्यार्थी राजकारणात प्रवेश केल्यापासूनच. भाजप कदाचित त्यांचा वैचारिक विरोधक असेलही, पण लालूंशी असलेले वैर मात्र पूर्वापार चालत आलेले आहे. ‘तेजस्वी यादव एक बहाना था, नितीश को बीजेपी में जाना था!’, हे तेजस्वी यादव यांनी माझ्याशी बोलताना व्यक्त केलेले मत मुळीच चुकीचे नाही. गेल्या नोव्हेंबरपासूनच, पहिल्यांदा नोटाबंदीला जोरदार पाठींबा देत आणि पुढे जूनमध्ये एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला पाठींबा देत, नितीश यांनी मोदी-विरोधी आघाडीपासून स्वतःला दूर करण्यास सुरुवात केली होती. खरोखरच जर नितीश यांना भ्रष्टाचाराचा सामना करायचा होता आणि उच्च नैतिक मूल्यं जपायची होती, तर बेनामी संपत्तीबाबत दोषारोप झाल्याबरोबरच ते एकतर तेजस्वी यादव यांना त्यांच्या सरकारमधून काढून टाकू शकले असते किंवा त्यांनी राजीनाम्यास नकार दिला असता, तर नव्याने निवडणूका घेऊन लोकांच्या न्यायालयात जाण्याचा मार्ग निवडू शकले असते.

असत्य क्रमांक २: २०१५ मध्ये महाआघाडीची स्थापना ही धर्मनिरपेक्षतेचं रक्षण करण्यासाठी झाली. खरं म्हणजे, बिहारमध्ये धर्मनिरपेक्षता म्हणजे अनेक पापं झाकण्यासाठी घेण्यात येत असलेलं सोयीचं सोंग आहे. लालू यांना सत्ता काबीज करण्यासाठी त्याचा उपयोग केला आणि नंतर घराणेशाहीचे राजकारण आणि स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यास प्रोत्साहन दिले. नितीश यांनी त्यांच्यापुढील राजकीय पर्याय खुले ठेवण्यासाठी त्याचा वापर केला, तर कॉंग्रेसनं भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी त्याचा कुबडीसारखा आधार घेतला. खरीखुरी धर्मनिरपेक्षिता ही भाजपविरोध किंवा संघाच्या ‘भूताच्या’ भितीपेक्षा निश्चितच अधिक काही आहे. भाजपबद्दल भीती निर्माण करुन मुसलमानांना तुमच्यासाठी मतदान करण्यास सांगणे ही काही धर्मनिरपेक्षता नाही तर हे धर्मनिरपेक्ष ‘ब्लॅकमेल’आहे.

असत्य क्रमांक ३: नितीश कुमार यांनी कॉंग्रेसचा ‘विश्वासघात’ केला. खरं म्हणजे, कॉंग्रेस नेतृत्वाने समजूनउमजून नितीश यांचा अनुनय केला होता, अगदी प्रसंगी लालू यांना सोडण्याची तयारी दाखवत, जे लालू एकदा म्हणाले होते, “ऐसा कोई सगा नही जिसको नितीश ने ठगा नही!” राहूल गांधी यांना प्रसिद्धीपासून दूर रहाणाऱ्या आणि सुसंस्कृत अशा नितीश यांच्याबरोबर काम करणे, हे करीष्मा असलेल्या पण वादग्रस्त अशा लालूंबरोबर काम करण्यापेक्षा नेहमीच जास्त सुखकर होते. २०१३ चा तो प्रसंग आठवा जेंव्हा स्वतःची राजकीय ताकद दाखवण्यासाठी राहूल यांनी त्यांच्याच युपीए सरकारचा भ्रष्टारावरचा अध्यादेश अमान्य केला होता, ज्याने लालू यांना वाचवले. कॉंग्रेसला या गोष्टी चांगल्याच माहीत होत्या की, नितीश हे कॉंग्रेस-विरोधी लोहीया विचारधारेत तयार झाले आहेत, त्यांनी केंद्रात आणि राज्यात सतरा वर्षं भाजपबरोबर घालवली आहेत, २००२ च्या गुजरात दंगलींनंतरही त्यांनी वाजपयी सरकारमधील मंत्रीपद सोडले नव्हते आणि त्याचबरोबर कोणत्याही क्षणी बाजू बदलू शकणारा नेता अशी त्यांची ख्याती आहे. आणि तरीही, ते ज्या क्षणी मोदी यांच्या विरोधात बोलले त्या क्षणी ते अचानकपणे ‘धर्मनिरपेक्षतेचे’ विश्वासू कैवारी ठरले. कॉंग्रेसने केलेले विश्वासघाताचे आरोप हे आता पोकळ ठरतात. सुसाट सुटलेल्या भाजपशी लढण्याच्या आणि खऱ्या राजकीय परिवर्तनासाठी ठोस दिर्घकालीन अजेंड्यापेक्षा अल्पकालीन फायद्यावर लक्ष केंद्रीत करण्याच्या प्रयत्नात हा त्यांच्याकडूनच झालेला मूर्खपणा म्हणावा लागेल.

असत्य क्रमांक ४: मोदी यांनी केंद्रीय अंमलबजावणी संस्थांना हाताशी धरुन रचलेल्या एका राक्षसी षडयंत्रात लालू यांचे कुंटुब ‘बळी’ ठरले. खरं म्हणजे, लालू यांनी वर्षानुवर्षं आपला पक्ष हा कोणताही नैतिक आधारा नसलेल्या एखाद्या खासगी कौटुंबिक व्यवसायाप्रमाणे चालवला आहे. त्यांच्या कुटुंबाविरोधातील दोषारोप हे सविस्तर आणि निश्चित स्वरुपाचे आहेत. या गोष्टी उघड होण्यासाठी लागलेला वेळ पहाता हेच दिसून येते की सीबीआय हा युपीए सरकारच्या ‘पिंजऱ्यातला पोपट’होता. आणि आता मोदी सरकारच्या हाताखाली हा पोपट एक रॉटविलर बनला आहे जो भुंकतो आणि चावतोही आणि आश्चर्यकारकरीत्या केवळ विरोधी पक्षांचे सरकार असलेल्या राज्यातला भ्रष्टाचार शोधून काढताना दिसतो, पण अर्थातच तुमच्या स्वतःच्या आर्थिक ‘गुन्ह्यांसाठी’ हे काही कारण होऊ शकत नाही.

असत्य क्रमांक ५: नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार हे ‘शत्रू’ आहेत. खरं म्हणजे, नितीश आणि मोदी यांचे संबंध भूतकाळात ताणलेले असतीलही पण राजकारणात कधीही कायमचे शत्रू नसतात, तर असतात फक्त कायमचे हितसंबंध. खरं म्हणजे नितीश आणि नरेंद्र मोदी यांच्यात कल्पनेपलीकडं साम्य आहे. दोघंही जण कुटूंबियांचा गराडा नसलेले एकांडे शिलेदार आहेत, दोघांमध्येही तीव्र अधिकारवादाची झलक आहे, दोघांचीही प्रतिमा ‘विकास’ पुरुष अशी आहे, दोघंही जण मतभिन्नता सहन करु शकत नाहीत आणि बारा महिने चोविस तास सत्तेची लालसा असलेले असे महत्वाकांक्षी राजकारणी आहेत. अतिशय वेगाने भूतकाळ विसरण्याचा त्यांनी निवडलेला मार्ग हे राजकारण हा अंतिमतः अनैतिक धंदा असल्याचाच आणखी एक पुरावा आहेः मग काय झालं जर कधी काळी नितीश यांनी मोदी यांना ‘हिटलर’ शैलीतील नेता म्हटलं होतं आणि ‘संघ मुक्त’ भारतासाठी लढत असल्याचा दावा केला होता; मग काय झाले जर अमित शाह यांनी बिहारी मतदारांना इशारा दिला होता की, नितीश यांना मत दिल्यास पाकिस्तानमध्ये फटाके वाजवून आनंद साजरा केला जाईल किंवा मोदी यांनी बिहारच्या डीएनएबाबतच प्रश्न उपस्थित केला होता. नितीश आणि मोदी (शाह) यांच्यासारखे राजकारणी हे अशा प्रकारचे निर्दयी राजकारण करतात, जिथे नैतिकता मुळीच महत्वाची नसते, तर महत्वाचा असतो अंतिम परीणाम. नितीश यांच्या राजीनाम्यानंतर अवघ्या काही मिनिटांत एकमेकांचे कौतुक करणारी मोदी आणि नितीश यांची ट्विटस् म्हणजे सोयीच्या राजकारणाचे वर्णन करणाऱ्या बिहारी वाक्प्रचाराचा पुरावाच आहेः ‘सेटींग’हो चुकी है! कदाचित, आता आपण नितीश आणि मोदी यांना ‘फ्रेनिमिज’म्हणायला हवे का?

असत्य क्रमांक ६: राज्यपाल हे घटनात्मक प्रक्रीयांचे तटस्थ रखवालदार असतात. खरं म्हणजे, आज बिहार असू दे किंवा अगदी काही महिन्यांपूर्वी गोवा आणि मणिपूर, राज्यपालांनी वाकडी वाट करुन भाजप सरकारच्या स्थापनेचा मार्ग सुकर केला, हे वास्तव आहे. नाहीतर या गोष्टीचे स्पष्टीकरण कसे देता येईल की, बुधवारी संध्याकाळी जेंव्हा राजदनं राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितली नेमकं तेंव्हाच काळजीवाहू राज्यपाल केसरी नाथ त्रिपाठी हे अचानकपणे तपासणीसाठी रुग्णालयात गेले आणि मध्यरात्री मात्र जदयु-भाजपच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन त्यांना ताबडतोब सरकार स्थापनेचे आमंत्रण दिलं आणि तेदेखील राजद हाच बिहार विधानसभेत सर्वात मोठा पक्ष असतानाही? शेवटी त्रिपाठी हे आधी भाजपचे जुनेजाणते नेते आहेत आणि त्यानंतर राज्यपाल. काँग्रेस काल जे राजभवनांमध्ये करत होती, तेच आज भाजप करताना दिसत आहे !

ता.क: एक आठवडा हा राजकारणातला मोठा कालवधी असल्याचं एकदा एका ब्रिटीश पंतप्रधानांनी म्हटलं होतं, बिहारमध्ये मात्र, २४ तास पुरेस आहेत. जेंव्हा एक मुख्यमंत्री एका आघाडी सरकारचा राजीनामा देतात आणि तेच मुख्यमंत्री नव्या सहकाऱ्यांसह दुसरे आघाडी सरकार स्थापन करतात, आणि तेसुद्धा अवघ्या सोळा तासांच्या आत, तेंव्हा तुम्हाला सहज समजून येतं की बिहारचे राजकरण हे ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यासारखे आहेः वेगवान, आवेशपूर्ण आणि नेहमीच थरारक. म्हणूनच मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे, राजकारण समजून घेण्यासाठी बिहारसारखे राज्य नाही. शेवटी, ही जन्मभूमी आहे चाणक्यची, राज्यकारभाराचा आद्यगुरुची...

राजदीप सरदेसाई

Updated : 28 July 2017 2:39 PM GMT
Next Story
Share it
Top