Home > राजदीप सरदेसाई > ‘नवा’ भारत नक्की आहे तरी कुठे ?

‘नवा’ भारत नक्की आहे तरी कुठे ?

‘नवा’ भारत नक्की आहे तरी कुठे ?
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे असलेले आणखी एक जबरदस्त कौशल्य म्हणजे आकर्षक शब्दप्रयोगांचा वापर... एक राजकीय संवादक म्हणून सातत्याने आकर्षक शब्दप्रयोग करण्याची त्यांच्याकडे प्रचंड क्षमता आहे. २०१४ हे वर्ष ‘अच्छे दिन’, मेक इन इंडिया’ आणि ‘स्वच्छ भारत’ चे होते... २०१५ हे ‘स्टार्ट अप आणि स्टॅंड अप इंडिया’ बाबत होते... नि २०१६ ‘डिजिटल इंडिया’चे होते तर आता २०१७ आहे ‘न्यू इंडिया’ अर्थात ‘नवा भारत’ चे! हे धूर्त संदेशण तूर्त बाजूला ठेवू... प्रश्न अस आहे की,‘नवा भारत’ चा खरा अर्थ आहे तरी काय?

‘नवा भारत’ हा आहे का जिथे सत्तरहून अधिक दुर्दैवी बालके गोरखपूरच्या सरकारी रुग्णालयात मृत्युमुखी पडतात...? की ही देशातल्या अधिक मागास भागात दर पावसाळ्यात घडणारी घटना म्हणायची? पंतप्रधान आपल्याला हमी देतात का की, जपानी एन्सेफलायटीसवर आपण मात करू... आरोग्य क्षेत्रातील सार्वजनिक गुंतवणूक दुप्पट केली जाईल... किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रे आणखी सक्षम केली जातील याची हमी देतात का? वस्तुस्थिती अशी आहे की, या देशातील सार्वजनिक आरोग्यव्यवस्था ही आयसीयू अर्थात अतिदक्षता विभागात आहे!

‘नवा भारत’ हा आहे का जिथे आसाम व शेजारील राज्यांमध्ये दरवर्षी भयानक पूरस्थिती निर्माण होते आणि या वार्षिक संकटात हजारोंना विस्थापित व्हावे लागते?आपल्याला या गोष्टीची खात्री दिली जाते का की, नदीकाठावरील अतिक्रमणे रोखण्यासाठी, जलनिःसारणाचा अभाव दूर करण्यासाठी, सर्रास वृक्षतोड थांबवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील...? कारण याच गोष्टी ब्रह्मपुत्रेला ‘सूज’ आणण्यास कारणीभूत ठरतात... असहाय्य लोकांच्या दुःखात भर घालतात...

‘नवा भारत’ हा आहे का जिथे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण पुरवण्यासाठी सरकारी शाळांना झगडावे लागत आहे? सरकारी प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या १८ टक्के जागा रिक्त असून माध्यमिक शाळांमध्ये हाच आकडा १५ टक्के एवढा असल्याची कबुली मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी डिसेंबर २०१६ मध्ये संसदेत केलेल्या निवेदनात दिली होती. शिक्षकांसंदर्भातला हा गंभीर पेच नजिकच्या भविष्यकाळात दूर करण्याची खात्री सरकार देत आहे का?

‘नवा भारत’ हा आहे का जिथे शेतीखालील जमिनी कमी होत चालल्या आहे, जिथे लहान शेतकरी गावातील सावकारांच्या कर्जाच्या पाशात अडकले आहेत... जिथे कृषीक्षेत्रातील तीव्र दुःख हे आहे की, चांगले पीक आलेल्या वर्षीही फायदेशीर किंमत मिळत नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत? ‘नवा भारत’ हा आहे का जिथे उत्पादन मंदी आणि बेरोजगारीतील वाढ हे वास्तव स्वीकारण्यास सरकार नकार देत आहे, खास करून निश्चलनीकरणानंतर...? सेंटर फॉर मॉनिटरींग द इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) ने नुकत्याच केलेल्या एका पाहणीत असे दिसून आले आहे की, निश्चलनीकरणानंतर २०१७ च्या पहिल्या चार महिन्यांत १५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत.

‘नवा भारत’ हा आहे का जिथे नगरपालिकेचे अधिकारी हे खड्डे-मुक्त रस्ते देण्यात नियमितपणे अपयशी ठरत असतात... जिथे दर वर्षी अनेक नागरिक अशा रस्ते अपघातांत बळी पडतात जे केवळ पायाभूत सुविधा सुधारून व थोड्या अधिक जबाबदारीने कर्तव्ये निभावून सहज टाळता येऊ शकतात? ‘नवा भारत’ हा आहे का जिथे न्यायालयांमध्ये जुन्या खटल्यांच्या फायलींचा ढीग वाढतच चालला आहे, जिथे जलद न्यायदानाची कल्पना म्हणजे लाखो याचिकाकर्त्यांसाठी एक क्रूर विनोद आहे?

‘नवा भारत’ हा आहे का जिथे भीतीच्या सावटाखालील अल्पसंख्याक समाजाला नियमितपणे आपल्या ‘देशभक्ती’ची परीक्षा द्यावी लागते...? जिथे एक टोपी घालणे,दाढी वाढवणे किंवा गोमांस खाणे, मदरशामध्ये शिक्षण घेणे, अजान पठण करणे किंवा वंदे मातरम् न गाणे या गोष्टी तुम्हालाआपोआपच ‘राष्ट्रविरोधी’ क्लबमध्ये प्रवेश देऊ शकतात? गोवंश हत्येबाबत चुकीच्या पद्धतीने बनवल्या गेलेल्या नियमांच्या पायावर - जे फक्त गुराढोरांच्या व्यापाऱ्यांविरुद्ध आपली ताकद दाखवणाऱ्या दक्षता गटांना प्रोत्साहित करतील असेच वाटतात... नव्या भारताची उभारणी होऊ शकते का? ‘इंडिया स्पेंड’ या वेबसाइटवर नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, २०१० पासून गोवंश हत्येसंबंधात जमावाकडून ठेचून मारण्याच्या ६३ प्रकरणांत २३ भारतीयांचा बळी गेला असून त्यापैकी ८६ टक्के मुसलमान होते. यापैकी ९७ टक्के घटना या मे २०१४ नंतर नोंदवल्या गेल्या आहेत.

‘नवा भारत’ हा आहे का जिथे पंतप्रधान हे नोकरशाही आणि राजकीय भ्रष्टाचार संपवण्याचे वचन देतात पण ‘स्थानिक’ भ्रष्टाचार व लाल फितीचा कारभार आजही सर्वसामान्य नागरिकाला त्रस्त करतो. ‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल करप्शन परसेप्शन इंडेक्स’च्या किमान भ्रष्टाचार असलेल्या देशांच्या यादीत १७५ देशांमध्ये भारत ७९ इतक्या खालच्या क्रमांकावर आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल की मंत्र्यांचा भ्रष्टाचार कमी झाला आहे तर फक्त माझ्या गोव्यात एकदा प्रवास करुन बघा, जिथे सरकार बनवण्यासाठी दलबदलू आमदारांच्या ‘रेटस्’ बाबत उघड चर्चा होते!

सत्य हे आहे की, ‘नवा’ भारत हे सध्या तरी धूसर पण मोहक असे, भविष्यासंबंधीचे एक स्वप्न आहे. ते अतिशय धोरणीपणाने अशा एका नेत्याने गुंफले आहे, ज्याला हे माहीत आहे की २०१४ ची निवडणूक त्याला जिंकून देणाऱ्या ‘अच्छे दिन’ च्या वचनातून निर्माण झालेल्या प्रचंड अपेक्षा कधीच पूर्ण होऊ शकत नाहीत. भूतकाळातील गाजावाजामुळे नुकसान होण्यापेक्षा, भावी पिढीतील मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणखी एका फील-गुड प्रवासाला सुरुवात करून, पंतप्रधान हे हुशारीने लक्ष्य बदलत आहेत. त्यामुळेच ‘नवा’ भारत ही युक्ती काही झटपट समाधान देऊ करत नाही, तर २०२२ च्या दृष्टीने पाच वर्षांचे लक्ष्य निश्चित करते. या काळात आणखी एक निवडणूक, ज्याची पूर्ण शक्यता आहे, जिंकलेली असेल!

ता.कः ‘नवा’ भारत हा कल्पनेचा ‘अविष्कार’ असला तरी ‘इंडिया टुडे’च्या ‘मूड ऑफ द नेशन’ या सर्वेक्षणातून असा अंदाज व्यक्त झालाय की मोदींच्या नेतृत्वाखालील आघाडी ही आता निवडणुका झाल्या तर ३५० च्या आसपास जागा जिंकू शकेल. मोंदीच्या करिष्माई व्यक्तिमत्त्वातून व्यक्त होणारी अधिक चांगल्या भारताची आशा आजही आकर्षक आहे, हे स्पष्टच आहे. जोपर्यंत विभाजित आणि मरगळलेले विरोधक त्यांचा स्वतःचा पटेल असा पर्याय देणार नाहीत, तोपर्यंत तरी हेच चित्र राहील.

-राजदीप सरदेसाई

Updated : 18 Aug 2017 10:01 AM GMT
Next Story
Share it
Top