Home > मॅक्स रिपोर्ट > पुढच्या राखी पौर्णिमेला पोलीस दारूबंदीची ओवाळणी देणार का?

पुढच्या राखी पौर्णिमेला पोलीस दारूबंदीची ओवाळणी देणार का?

पुढच्या राखी पौर्णिमेला पोलीस दारूबंदीची ओवाळणी देणार का?
X

गडचिरोली : "माझा नवरा दारुडा आहे, पोरांच्या अंगावर नीट कपडा मिळत नाही, संध्याकाळ झाली की गावात भांडणे होतात, दारुविक्रेत्यांच्या विरोधात आवाज उठवला की दारुवाले मारण्याची धमकी देतात. सायेब आमच्या गावातील दारू बंद करून आमची रक्षा करा हीच ओवाळणी या रक्षाबंधन दिवशी आमच्या पदरात टाका", जिल्ह्यातील पोलीस बांधवांना ही आगळी-वेगळी मागणी केली आहे गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो महिलांनी....




जिल्ह्यातील पोलीस दलातील शेकडो पोलिस बंधूंना राखी बांधत आपापल्या गावातील दारू नियंत्रणात आणण्याचीच ओवाळणी या महिलांनी मागितली आहे. यावर्षी रक्षाबंधनाला पोलीस भावाना गडचिरोली येथील महिलांनी बांधलेली राखी ही देशात आगळी वेगळी ठरली आहे. पोलिस भाऊरायांनी देखील बहिणींनी मागितलेल्या ओवाळणीवर त्या त्या पोलीस हद्दीत असणाऱ्या गावातील दारू नियंत्रणात आणून बहिणींचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे पुढच्या रक्षा बंधनाला या महिलांना ओवाळीत दारुबंदी मिळते का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.



दारू पिण्यामध्ये पुरुषांचे प्रमाण सर्वाधिक असते. दारू पिऊन होणाऱ्या घरगुती हिंसाचारात महिलांचा सर्वात जास्त बळी जातो. या कारणाने दारूबंदीच्या चळवळीत सर्वात जास्त महिला सहभागी होत असतात. जिल्ह्यातील शेकडो महिलांनी "राखी विथ खाकी" या उपक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील अहेरी गडचिरोली आरमोरी धानोरा या तालुक्यातील शेकडो महिलांनी पोलीस बांधवांना राखी बांधली.

आरमोरी तालुक्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातून येणाऱ्या दारूवर अंकुश ठेवण्यात यावा, याचबरोबर अद्याप दारू सुरू असलेल्या गावात दारू बंद करण्याची मागणी महिलांनी केली आहे. महिला तसेच गावसंघटनानी अनेक गावात दारूबंदी केली आहे. तरीही काही गावांमध्ये दारू सुरू आहे. या गावांमध्ये सुरू असलेल्या दारूमुळे दारूबंदी झालेल्या गावांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. दारूबंदी असलेल्या गावातील पुरुष अशा गावात जाऊन दारू पित असतात. या त्रासाला कंटाळून या गावात देखील पोलीस विभागाने पुढाकार घेऊन दारू नियंत्रणात आणावी अशी महिलांची मागणी आहे. आरमोरी पोलीस स्टेशनमध्ये महिलांनी सहायक पोलिस निरीक्षक बोंडसे,पोलीस निरीक्षक शिंदे यांच्यासह २० पोलिस कर्मचाऱ्यांना राख्या बांधल्या. धानोरा तालुक्यातील पोलीस मदत केंद्र चातगाव येथे खुटगाव, चातगाव, मेंढाटोला, गट्टेपायली या गावातील २३ महिलांनी पोलीस अधिकारी पाटील यांच्यासह इतर सर्व पोलीस बांधवांना राखी बांधून दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे वचन घेतले. मुरुमगाव,कारवाफा, धानोरा या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन महिलांनी पोलिसांना राख्या बांधल्या.




कोरची तालुक्यातील कोरची पोलिस स्टेशनमध्ये कोचीनारा, भिमपुर, तसेच कोरची शहरातील विविध वार्डातील महिलांनी सी आर पी एफ दलासह तब्बल ८० पोलीस बांधवांना राख्या बांधून दारूबंदीचे वचन घेतले. पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्या बहिणींनी मागितलेली ओवाळणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिलेले आहे.

गडचिरोली जिल्हा हा दारूबंदी असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यात मुक्तिपथ हे अभियान सुरू आहे. या अभियानाअंतर्गत गावागावात गावसंघटना स्थापन झालेल्या आहेत. या संघटना आपापल्या गावातील दारूवर पोलीस विभाग तसेच प्रशासनाच्या मदतीने नियंत्रण ठेवत असतात. महिलांनी अहिसक कृती करत आजपर्यंत हजारो लिटर मोहाची दारू नष्ट केलेली आहे. याचबरोबर देशी विदेशी दारूच्या लाखो रुपयांचा माल पोलिसांना पकडून दिलेला आहे. वेगवेगळ्या उपक्रमातून महिला दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करत असतात. या अगोदर जिल्ह्यातील निवडणुका दारुमुक्त करण्याचा प्रयत्न महिला कार्यकर्त्यांनी केला होता. या अभियानामध्ये महिलांनी " जो पाजेल माझ्या नवऱ्याला दारू, त्याला निवडणुकीत नक्की पाडू" असा नारा देत निवडणुकांमध्ये होणाऱ्या दारूच्या वापराला आव्हान दिले होते. या आव्हानाचा धसका सर्वच राजकीय पक्षांनी घेतलेला होता. महिलांच्या याच दबावातून जिल्ह्यातील सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांना निवडणुकीत दारूचा वापर करणार नाही, असे हमीपत्र लिहिण्याचा आदेश दिला. विधानसभा निवडणुकीत सर्व उमेदवारांनी तसे हमीपत्र लिहून घेतले. ग्रामपंचायत निवडणूक दारुमुक्त करण्याचा प्रयत्न या संघटनांनी केला होता. यामध्ये देखील महिलांना यश आले होते. अनेक गावात दारूच्या मुद्द्यावर निवडणुका गाजल्या. गडचिरोलीत महिलांनी दारुमुक्त निवडणुकीसाठी केलेल्या उपक्रमाची चर्चा महाराष्ट्रभर झाली होती.




जिल्ह्यातील साजरे होणारे सण हे सर्वांसाठी आनंदाचे असतात पण अनेक गावातील महिलांसाठी हे सण केवळ दारूमुळे दुःखदायक ठरतात. ऐन सणाला नवरा दारू पितो. मारहाण करतो मुलांना त्रास देतो. घरातील पैसे चोरून नेतो अशी व्यथा या महिलांनी मांडली आहे. पोळ्यासारखे सण तर दारूचेच समजले जातात. या सणाला दारूचा महापूर ठरलेला असायचा. दारूमुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होते. आर्थिक हानी होते. आणि पिणाऱ्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. दारूचा सर्वाधिक तोटा महिलांना होतो. याच कारणाने जिल्ह्यातील हजारो महिला दारूबंदीसाठी गावागावात संघर्ष करत आहेत. या महिलांना मुक्तीपथ या अभियानामुळे बळ मिळालेले आहे. महाराष्ट्र सरकारच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या अभियानाने आता यशस्वी वाटचाल केलेली आहे. लोकांचा पुढाकार, शासनाचा सहभाग यातून जिल्ह्यातील दारू नियंत्रणात येत आहे.




या अभियानातून राबवलेल्या दारुमुक्त पोळा, दारुमुक्त निवडणूक, दारुमुक्त लग्न या उपक्रमांची चर्चा महाराष्ट्रभर झाली होती. पोळा या सणाला जिल्ह्यात दारूचा महापूर पाहायला मिळत असायचा. परंतु दारुमुक्त पोळा उपक्रम सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील शेकडो गावात दारुशिवाय पोळा साजरा झाला. या अभियानातून प्रेरणा घेऊन अनेक आदिवासींची लग्नही दारुमुक्त पार पडली. गावागावात दारूचा वापर न करण्याचे ठराव देखील झाले. आदिवासी संस्कृतीमध्ये दारूचा बहुतांश वेळा उपयोग केला जातो. परंतु या अभियानातून प्रेरणा घेत आदिवासी गावांनी दारूचा वापर न करण्याचे ठराव घेतले.

दारूबंदीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील महिलांनी पोलिसांना दारूबंदीची मागितलेली ओवाळणी ही राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. भारतीय संस्कृतीत या सणाला मोठे महत्त्व आहे. पोलिस बांधवांना त्यांच्या या बहिणींनी मागितलेली ओवाळणी दारूबंदी करून खरंच देणार का ? येत्या काळात पोलीस स्टेशन हद्दीतील दारूचा महापूर असलेली गावे दारू मुक्त होणार का ? सणासुदीला नवऱ्याचा मार खाणाऱ्या बहिणींची रक्षा हे बांधव खरंच करणार का हा खरा प्रश्न आहे.

Updated : 31 Aug 2021 7:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top