Home > News Update > हुलगा माडग्यातून महिलेची उद्योगात भरारी

हुलगा माडग्यातून महिलेची उद्योगात भरारी

हूलगा,मटकी या पिकांची पेरणी खरीप हंगामात केली जाते. जून महिन्यात पडलेल्या पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकरी या पिकाकडे वळतात. या पिकांची पेरणी काही वर्षापूर्वी पाहायला मिळायची. परंतु पावसाच्या अवेळी येण्याने या पिकावर परिणाम झाला आहे. हुलगा,मटकी,तुर,मूग यांची पेरणी प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र,मराठवाडा येथे दिसून येते. परंतु अलीकडच्या काळात बदलत्या काळानुसार या पिकांचे क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे या पिकांवर आधारित असणाऱ्या उद्योगांची संख्या देखील कमी झाली असल्याचे पहायला मिळते. पूर्वी मटकी,मग,तूर, हुलगा याचा वापर अन्नामध्ये केला जायचा. अलीकडच्या काळात मानवाची जशी जीवन शैली बदलली आहे, तशाच प्रकारे त्याच्या खाण्यापिण्यात देखील बदल झाला आहे. पूर्वी हुलगा,मटकी, मुग,तूर आहारात पोष्टीक समजली जात होती. परंतु आताच्या भाज्यांमध्ये यांचा वापर फारच कमी प्रमाणात दिसून येतो. काही वर्षांपूर्वी सर्वच गोष्टी नैसर्गिकरीत्या मिळत होत्या. त्यातून मानवाचे आरोग्य सदृढ होण्यास मदत झाली. त्यामुळेच अनेकांचे आयुष्य वाढले. मटकी,तूर, मूग, हुलगा यामध्ये हुलग्यापासून बनवलेल्या माडग्याला पूर्वी विशेष असे स्थान होते. एखादा मनुष्य आजारी पडल्यास त्याला हुलग्याचे माडगे बनवून खाण्यास देण्यात येत असे. त्यामुळे त्या व्यक्तीला झालेला किरकोळ आजार बरे होण्यास मदत होत होती. परंतु काळाच्या ओघात हा माडग्याचा प्रकार नामशेष झाला आहे. त्याला उर्जिता अवस्थेत आणण्याचे काम सोलापूर जिल्ह्यातील प्राध्यापक स्वाती थिटे आणि त्यांचे पती नित्यानंद थिटे यांनी केले आहे. यातूनच त्यांनी नावीन्यपूर्ण कल्पना विकसित करत माडग्याचा उद्योग उभा केला आहे. माडग्याची उद्योग निर्मिती करून राज्याच्या कोपऱ्यात हुलग्याचे माडगे पॅकिंग करून विकले जात आहे. या उद्योगात त्यांनी यशस्वी वाटचाल सुरू केली आहे.

पूर्वी माडगे कसे बनवले जात होते?

काही वर्षांपूर्वी माडगे प्रत्येक घरी बनवलेले पहायला मिळायचे. माडगे बनवण्यासाठी प्रथम हुलगे व्यवस्थित सुपात पाकडून घेतले जायचे. त्यानंतर त्याला चुलीवर तव्यात भाजून घेतले जात. भाजलेले हुलगे घरातील जात्यावर दळून बारीक करून त्याची भुकटी बनवली जात होती. त्यानंतर चुलीवर पातेले ठेवून गरम पाण्यात हुलग्याची भुकटी टाकली जायची. त्याला व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात तेल, मीठ टाकले जायचे. हुलगा हा काळसर रंगाचा असल्याने या माडग्याचा रंग देखील काळसर दिसत. माडग्याला चांगली उकळी आल्यानंतर चुलीवरून खाली उतरवले जात असे. हे माडगे गरम खाण्यासाठी चांगले असल्याने पटकन खाण्यासाठी घेतले जायचे. माडगे ताटात घेतल्यानंतर त्यावर तेल,तूप, गुळ टाकून खाल्ले जायचे. त्यामुळे खाणाऱ्या मनुष्याला एकदम तर्तरिपणा येत होता.

थिटे दाम्पत्यांनी माडग्याला दिली ऊर्जितावस्था

काळाच्या ओघात अनेक गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत. परंतु जुने ते सोने म्हणत स्वाती थिटे आणि नित्यानंद थिटे यांनी काळाची गरज ओळखून हा व्यवसाय सुरू केला आहे. हा व्यवसाय सुरू करून एक वर्षाचा कालावधी लोटला आहे. हुलग्याचे माडगे घेवून हे दाम्पत्य वेगवेगळ्या प्रदर्शनात देखील गेले आहे. तेथे त्यांना लोकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळाला असल्याचे दोघे पती पत्नी सांगतात. हुलगा माडगे बनवण्यासाठी पूर्वी जसे जात्यावर हुलगे दळले जायचे,अगदी आताही तसेच जात्यावर हुलगे दळून त्याची बारीक भुकटी बनवली जात आहे. भुकटी करण्यासाठी प्रथम हुलगे तव्यावर भाजले जात असून त्यानंतरच जात्यावर भुकटी बनवली जाते. हे दाम्पत्य घरीच हुलगा माडगे बनवत असून त्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यासाठी स्वाती थिटे यांना त्यांच्या सासूचा देखील मोलाचा हातभार आहे.

शेती करत केला जातोय व्यवसाय

स्वाती थिटे यांना शेती असून त्या शेती सांभाळत हा व्यवसाय करतात. त्यांच्या शेतात विविध प्रकारची पिके असून वेळप्रसंगी पिकांना पाणी देण्याचे काम करतात. शेतातील सर्वच कामे स्वाती थिटे करतात. त्यांच्या घरी जनावरे देखील असून त्यांची देखभाल करण्याचे काम त्या करतात. दिवसभरात जनावरांना वैरण,पाणी सकाळ,संध्याकाळ झाडलोट करतात. गुरांच्या विक्रीतून देखील त्यांना फायदा होतो. त्याचबरोबर थिटे दाम्पत्य विविध पालेभाज्यांच्या बिया विकण्याचे काम करतात. या बिया मधून घरीच एक छोटीशी परस बाग लोक तयार करू शकतात. त्याचबरोबर थिटे दाम्पत्य लहान वासरांचे संगोपन करत असून कालांतराने ती विकली जातात. त्यांच्या शेतात विविध प्रकारची पिके असून त्यामध्ये कांदा,सीताफळ बाग,देशी केळी, ज्वारी यांचा समावेश आहे. काळानुरूप शेतीवर विविध संकटे येत असल्याने त्यांनी हुलग्यापासून माडगे बनवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

व्यवसाय सुरू करण्यापूर्वी मार्केटचा अभ्यास केला

स्वाती थिटे यांनी माडग्याचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी बचत गटामार्फत वेगवेगळ्या व्यसायाची माहिती घेतली. त्यांच्या लक्षात आले की, पाश्चत्य संस्कृती पेक्षा भारतीय खाद्य संस्कृती चांगली आहे. हे पदार्थ शरीराला पोषक आहेत. त्यातून माडग्याची कल्पना सुचली आणि हा व्यवसाय जन्माला आला. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती त्यांनी घेतली. या माडग्यात विविध प्रकारची पोषक प्रथिने असून हुलगा पीक पूर्णपणे नैसर्गिक रीत्या येणारे आहे. त्यावर कोणत्याही फवारण्या केल्या जात नाही. पूर्वी गोड माडगे बनवले जात असाचे. स्वाती थिटे यांनी सुरुवातीला गोड माडगे बनवले. परंतु शुगरचा आजार असलेल्या लोकांना हे खाता येत नव्हते. त्यामुळे त्यांनी तिखट माडग्याची पाकिटे बनवून विकली. या माडग्याची पॅकिंग करत असताना त्यावर माडग्याचे सुप बनवण्याची पद्धत देखील देण्यात आली आहे. बाजारात माडग्याचे प्रोडक्ट उपलब्ध असून ग्राहक सहज खरेदी करू शकतात.
माडग्याचे पॅकिंग ऑनलाईन पद्धतीने विकले जात आहे

या माडग्याची सोशल मीडियावर जाहिरात केली जात असून त्याची विक्री ऑनलाईन पद्धतीने केली जात आहे. याला देशाच्या विविध भागातून मागणी आहे. हे प्रॉडक्ट विविध प्रदर्शनात देखील विकले गेले आहे. त्याची टेस्ट देखील चांगल्या प्रकारची आहे. त्यामुळेच लोकांचा कल माडगे खरेदीसाठी वाढत आहे. गेल्या वर्षभरापासून ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. माडग्याचे सूप खाल्ल्यानंतर आराम मिळतो. असे स्वाती थिटे सांगतात. या जुन्याच पदार्थाचा नव्या स्वरूपात आणण्याचे महत्त्वपूर्ण काम स्वाती थिटे यांनी केले आहे.


Updated : 4 Feb 2024 3:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top