Home > News Update > कर्जत नगरपंचायत निवडणूकीत भाजपच्या उमेदवारांची माघार ; राम शिंदेंचे मौन आंदोलन

कर्जत नगरपंचायत निवडणूकीत भाजपच्या उमेदवारांची माघार ; राम शिंदेंचे मौन आंदोलन

कर्जत नगरपंचायत निवडणूकीत भाजपच्या उमेदवारांची माघार ; राम शिंदेंचे मौन आंदोलन
X

अहमदनगर // अहमदनगर जिल्ह्यातील तीन नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सुरू झाला आहे. यात कर्जत नगर पंचायतीचाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान , या निवडणूक कार्यक्रमात आज उमेवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. भाजपच्या चार ते पाच उमेदवारांनी अचानक उमेदवारी अर्ज माघारी घेतले. यावर संतप्त होत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री राम शिंदे यांनी निवडणूक प्रक्रियेत बळाचा वापर झाल्याचा आरोप केला. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह कर्जत मधील गोदड महाराज मंदिरासमोर मौन आंदोलन सुरू केले आहे.

कर्जत नगरपंचायतच्या 17 जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. मात्र , ओबीसी आरक्षणाच्या प्रलंबित मुद्यांमुळे 17 पैकी 13 जागांवरच निवडणूक होत आहे. निवडणूक जाहीर होण्याआधीच राम शिंदे यांचे समर्थक असलेले प्रसाद ढोकरीकर व नामदेव राऊत यांच्या सारखे दिग्गज भाजपला राम राम ठोकत राष्ट्रवादीत गेल्याने राजकीय गणितं बदलली आणि राष्ट्रवादीचे पारडं जड झाल्याचे बोलले जात आहे. मात्र , राम शिंदे यांनी न खचता निवडणूक प्रतिष्ठेची केली.

राम शिंदे यांनी तरूण व नवख्या कार्यकर्त्यांना बरोबर घेत निवडणुकीसाठी पक्ष बांधणी केली. सर्व जागांवर उमेदवार दिले. पण, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या चार ते पाच उमेदवारांनी उमेवारी अर्ज माघारी घेतले. हे उमेदवारी अर्ज राष्ट्रवादीने दबाव तंत्राचा वापर करत माघारी घ्यायला भाग पाडल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला. याबाबत शिंदे यांनी पंचायत समितीत जाऊन निवडणूक अधिकाऱ्यासमोर तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच राम शिंदे यांनी समर्थकांसह तडक कर्जतचे ग्रामदैवत असलेल्या गोदड महाराज मंदिरासमोर जाऊन ठिय्या मांडला. तसेच मौन आंदोलन सुरू केले. त्यामुळे प्रशासनाचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. तर राज्यभर चर्चेचा विषय होत आहे.

Updated : 13 Dec 2021 12:23 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top